Thursday, February 10, 2022

डिस्चार्ज मिळाल्या, मिळाल्या नितेश राणेंचा ठाकरें सरकारवर जोरदार हल्लाबोल...

वेध माझा ऑनलाईन - शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना काल (9 फेब्रुवारी) न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. त्यानंतर आज नितेश राणे यांना कोल्हापुरातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून सिंधुदुर्गात आलेल्या नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तपास कार्यात माझ्याकडून सातत्याने मदत

आमदार नितेश राणे म्हणाले, पहिल्या दिवसापासून म्हणजेच 18 डिसेंबर (ज्या दिवशी ही घटना झाली) ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना जी-जी माहिती हवी होती, तपासकार्यात मी सातत्याने मदत करत होतो. तशीच मदत पुढेही पोलिसांना तपासकार्यात जी मदत लागेल, न्यायालयाने ज्या अटी शर्थी सांगितल्या आहेत आणि संबंधित तपास अधिकारी जेव्हा-जेव्हा बोलावतील तेव्हा-तेव्हा मी जाऊन तपासकार्यात मदत करणार
नितेश राणे पुढे म्हणाले, मी कुठल्याही तपासकार्यातून दूर गेलो नव्हतो. मला जेव्हा-जेव्हा फोन आले, संपर्क केला गेला तेव्हा-तेव्हा मी त्यांच्याशी संपर्क केला. कुठल्याही तपासकार्यात मी अडथळे आणले नाहीत. कुठलीही माहिती लपवली नाही. मला जी-जी माहिती मागितली त्या संदर्भातील सर्व माहिती मी देत होतो आणि यापुढेही देत होतो.

सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून...

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पोलिसांना सहकार्य करत होतो. पळण्याचा कधीही विषय आला नाही. पळण्याचा कुठलाही विषय आला नाही. मला पोलिसांनी अटक करण्याचीही गरज भासली नाही. ज्यादिवशी मी सरेंडर केलं त्यादिवशी अजून चार दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण होतं. पण तरिही एक दिवस अगोदर न्यायालयाच्या बाहेर घडलं, माझी गाडी अडवण्यात आली. माझ्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू झाला. मी विचार केला की, सिंधुदुर्गातील जनतेला माझ्यामुळे कोणताही त्रास नको म्हणून मी माझ्या कुटुंबासोबत, वकिलांसोबत चर्चा करुन सरेंडर केलं. मला पोलिसांनी अटक केलेली नाहीये असंही नितेश राणे म्हणाले.

हे राज्याच्या संस्कृतीला शोभतं का?

मला दोनच दिवसांची पोलीस कोठडी दिली आणि त्यानंतर मी न्यायालयीन कोठडीत होतो. पण त्यानंतर माझ्या तब्येतीबाबत जे काही सुरू होतं. मला आश्चर्य असं वाटतं, मला आजही जो त्रास होतोय. मी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी पुढे मी दोन दिवस रुग्णालयात अॅडमिट होणार आहे अधिक उपचारासाठी मुंबईला जाणार आहे. मला पाठीचा, मणक्याचा त्रास आधीही होता आणि आता तो वाढला आहे. ब्लड प्रेशरचा त्रास आहे. ज्या काही तपासण्या माझ्या झाल्या ते खोटे होते का? कुणाच्याही तब्येतीवर अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं किती नैतिकतेत बसतं? राज्याच्या संस्कृतीला हे शोभतं का? हा विचारही आपण करायला हवा असंही नितेश राणे म्हणाले.

No comments:

Post a Comment