वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान अंतर्गत कराड तालुक्यातील तासवडे गावचा सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला असून विभागीय समितीकडून नुकतीच तासवडे गावची पहाणी करण्यात आली आहे.
यापूर्वी झालेल्या पहाणीत कराड तालुक्यात तासवडे गावचा प्रथम क्रमांक आला होता. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडून या गावचे परीक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये या समितीने सातारा जिल्ह्यातील संपूर्ण गावातून द्वितीय क्रमांक दिला होता. त्यामुळे गावची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार गावातून फक्त दहा गावे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत.
तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये आणी जिल्हास्तरावरील द्वितीय क्रमांकासाठी तीन लाख रुपये आणी सन्मानचिन्ह गावास प्राप्त होणार आहे.
या विभागीय समितीत सहायक आयुक्त मा. विकास मुळीक, उपायुक्त सिमा जगताप मॅडम, माहिती विभागाचे उपसंचालक पुरषोत्तम पाटोदकर, सहायक प्रशासन अधिकारी प्रकाशकुमार बोबले, मिलींद टोनपे आदी सदस्यांचा समावेश होता. या सर्वांनी संपूर्ण गावची व प्रकल्पांची गावामध्ये फिरून आणी ग्रामस्थांकडून माहिती घेतली.
या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, स्वछता, गावची करवसुली, शाळा, अंगणवाडी, गटर, रस्ते, सांडपाणी व घनकचरा यांची व्यवस्था व विल्हेवाट , लोकसहभागातील कामे, पानंद रस्ते आदी आदी निकषांची तपासणी करण्यात आली आहे.
तासवडे गावास सीएसआर फंडातून घंटागाडी मिळाली असून त्याद्वारे कचरा संकलन केले जाते. तसेच गावातील सुमारे चारशे कुटुंबाना ग्रामपंचायती मार्फत ओला व सुका कचरा संकलनासाठी प्रत्येकी दोन डस्टबिन वाटप करण्यात आले आहे. गावात ठिकठिकाणी सार्वजनिक कचरा कुंड्या, मुताऱ्या, शौचालय उभरण्यात आले आहे. सार्वजनिक सांडपाणी संकलनासाठी विहीर घेण्यात आली असून त्यात संपूर्ण गावातील सांडपाणी सोडले जाते व नंतर ते शेतीस देण्यात आले आहे.गावात गेल्या पाच वर्षात एकही जलजन्य साथीचा रोग न उद्भवल्याने गावास सातारा जिल्हा परिषदेकडून नुकतेच चंदेरी कार्ड हा सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. गावची करवसुली ब्यान्नव टक्के आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा कराड तालुक्यातील पहिली आय.एस.ओ मानांकन प्राप्त शाळा आहे. तसेच अंगणवाड्या असून त्यातील तीन अंगणवाडी सुद्धा आय.एस.ओ. मानांकन प्राप्त आहे.
यावेळी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी कांबळे, विस्तार अधिकारी पोतदार साहेब, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, बालविकास प्रकल्प आदिचे पदधिकारी, सरपंच लता जाधव, उपसरपंच सुभाष जाधव सर्व ग्रा.पं. सदस्य, राजेंद्र जाधव, विकास जाधव, सुनील जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत ग्रामसेवक संजय लिंबळे व प्रास्ताविक अमित जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका इंगुळकर मॅडम यांनी केले.
No comments:
Post a Comment