Friday, February 17, 2023

पंतप्रधान मोदींनी देशात लोकशाही संपवून बेबंदशाही सुरू करावी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल ;

वेध माझा ऑनलाईन - निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे राहणार असल्याचा निर्णय दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह विरोधकांवर हल्लाबोल केला. तसंच पंतप्रधान मोदी यांचे नाव घेत थेट आव्हानही दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी की ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलंय आणि देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे.

आजपर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत जिथे सरकारची दादागिरी चालली आहे. अगदी न्याययंत्रणासुद्धा आपल्या दबावाखाली कशी येईल याच्याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री आणि त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. असंच सुरू राहिलं तर लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत असं बोलण्याचं धाडस पंतप्रधानांनी दाखवायला हवं असं उद्धव ठाकरे म्हणाले.आजचा निर्णय हा अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोवर निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असं आम्ही म्हणत होतो. पक्ष कुणाचा हे केवळ आणि केवळ निवडून आलेल्या आमदार, खासदारांच्या जोरावर ठरवलं तर कुणीही धनाढ्य माणूस या आमदार, खासदारांना विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा , मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ शकतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.निवडणूक आयोगाबद्दल इतकंच बोलेन की प्रशांत भूषण यांनी निवडणूक आयोगावरच शंका व्यक्त केलीय. जसं न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया आहे तशीच निवडणूक आयुक्त नेमायला हवेत. आज जी दयनीय अवस्था गद्दारांची झाली आहे त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. मला शक्यता वाटते की ज्या पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला दिले याचाच अर्थ महिन्या दोन महिन्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या जातील. त्यांना कोणत्याही परिस्थिती मुंबई महापालिका जिंकायची आहे. मुंबईच्या हातात भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

No comments:

Post a Comment