Wednesday, February 8, 2023

औरंगजेबाच्या जुन्या महालाचे संवर्धन करा ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वादग्रस्त मागणी ;

वेध माझा ऑनलाईन - जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य ताजं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने वादग्रस्त मागणी केली आहे. औरंगाबाद शहरामध्ये औरंगजेबाचा जुना महाल आहे, त्याचं संवर्धन करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. शहरामध्ये G20 अंतर्गत अनेक रिपेअरिंगची काम सुरू आहेत, त्यातच औरंगजेबाच्या महालाची दुरूस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
'औरंगजेबाच्या महाल मोठा आणि सुंदर आहे. ऑक्सफर्ड आणि पेनसिलव्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये या महालाची नोंद आहे, त्यामुळे या महालाला चांगलं करण्यात यावं. कलेक्टर आणि कमिशनर जिकडे राहत आहेत ती जागाही मुघल शासकाच्या जमान्यातली आहे. हा महाल अधिकाऱ्याला द्या किंवा सरकारी कार्यालय बनवा. मुसलमान शासक होता म्हणून हे तोडायचं का? हीच आपली मानसिकता आहे का? हेरिटेज म्हणून याचा वापर करा, अशी आमची मागणी आहे,' असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एलियास किरमाणी यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या मागणीवर शिंदे गटाकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. औरंगजेबाची कबर खोदणारा महाराष्ट्र आहे, असं शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई म्हणाले आहेत. 'सर्वसामान्य माणसं जशास तसं उत्तर देतील. क्षणभर मलाही चीड आली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबाने हाल करून वध केला, मात्र अशा माणसाच्या कब्रेला सुशोभिकरण करणं योग्य नाही. मी एक मंत्री असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही,' असं शंभुराज देसाई म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, त्यांनी केलेल्या मागणीचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड वादात
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काहीच दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. 'मोघलांचा इतिहास पुस्तकातून काढणार असं तावडेंनी विधानसभेत जाहीर केलं. पण समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. त्याच्यातून ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना,' असं आव्हाड म्हणाले होते.
'रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा,' असं प्रत्युत्तरही आव्हाडांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना दिलं होतं.

No comments:

Post a Comment