Friday, April 16, 2021

कोल्हापुरातील राजकीय संघर्षाचे लोण सोलापूर, सातारा जिल्ह्यात - मूळ वाद आहे तो पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे राजकीय स्पर्धक माजी खासदार धनजंय महाडिक यांच्यात

कोल्हापूरच्या राजकीय संघर्षाचे पडसाद सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात उमटत आहे. मूळ वाद आहे तो पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे राजकीय स्पर्धक माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यातील.  दोघातील स्थानिक वादाने उचल खाल्ली असून त्याचे पडसाद अन्य दोन जिल्ह््यांत उमटत आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने आश्वाासने देऊनही एकाचीही पूर्तता न केल्याने आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बंटी – मुन्ना यांचा वाद सर्वश्रुत आहे. पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि पाटील परिवाराच्या मालमत्तांचा थकीत घरफाळा या विषयावरून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी टीकेची तोफ डागली.
गोकुळ निवडणुकीचे पडघम वाजत असताना हा आघात झाल्याने पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी महाडिक यांच्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या ६४ कोटी रुपये थकबाकीचा मुद्दा उचलत प्रत्युत्तर दिले
महाडिक यांनी मोहोळ तालुक्यातील भीमा कारखान्याच्या वार्षिक सभेत विरोधकांना थकबाकीचे कारण स्पष्ट करताना त्यात सहकारमंत्र्यांना गोवले.  ‘राज्यातील बहुतांशी साखर कारखान्याची एफआरपी या हंगामात थकीत आहे. इतकेच नव्हे तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील सह््याद्री सहकारी साखर कारखान्याची एफआरपी थकीत असल्याने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी  आंदोलन केले, याकडे महाडिक यांनी लक्ष वेधले. अन्य कारखान्यांवर कारवाई होत नसताना भीमा कारखान्यावर महसुली जप्तीची कारवाई झाल्याची खंत महाडिक यांनी व्यक्त केली. कोल्हापूरचा हा वाद सातारा जिल्ह्यात गेल्यावर सहकार मंत्र्यांना उत्तर देणे भाग पडले. बाळासाहेब पाटील यांनी ‘शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन भीमा कारखान्याला राज्य शासनाने २० कोटीची मदत केली आहे हे महाडिक यांनी विसरू नये, ‘असा पलटवार केला. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार, असेही निक्षून बजावले. सहकारमंत्री पाटील यांचे हे विधान माध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर सतेज पाटील समर्थकांनी ते कोल्हापुरातील समाज माध्यमात आणि माध्यमांकडे पाठवून महाडिक यांना कोंडीत पकडले.
गोकुळ निवडणुकीचा प्रचार करताना धनंजय महाडिक यांनी ‘दोन मंत्री, दोन खासदार, सात आमदार असलेल्या विरोधकांच्या ताब्यात गोकुळ दूध संघ गेला तर ते मोडून खातील,’ अशी भीती व्यक्त करीत विरोधकांच्या आमिषाला बळी न पडता उत्तम चाललेला गोकुळ सत्तारूढ गटाकडे सोपवावा, असे आवाहन केले. त्यांची ही टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना चांगलीच झोंबली. मुश्रीफ यांनी ‘माझा संताजी घोरपडे, पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा डी. वाय. पाटील कारखाना सक्षम चालला आहे. ‘गोकुळ’मधील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली तर महाडिकांना जड जाईल. त्यांनी भीमा कारखान्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा पळता भुई थोडी होईल,’ असे परखड बोल सुनावले. या वादातूनही दोघातील कोल्हापुरातील वाद सोलापूरच्या सीमेवर जाऊन पोचला.
लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी  शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उभय काँग्रेसकडे यावेत, यासाठी कोल्हापुरातील नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार त्यांनी नव्या समीकरणाला हात घातला. निवडणुकीत हाती काहीच न लागल्याने ते नाराज झाले होते. त्यांना विधान परिषद सदस्य करण्याची घोषणा झाली. त्यांची आमदारकी राजभवनात धूळ खात पडली असून महा विकास आघाडीची सारी आश्वाासने हवेत विरली आहेत. नाराज शेट्टी यांनी भाजप आणि आघाडीवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर आघाडीचे घटक असूनही त्यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानीचा उमेदवार उभा करून आघाडीच्या  मतातील विभागणीची रणनीती आखली आहे. तर, कोल्हापुरात गोकुळमध्ये तिन्ही मंत्र्यांनी सत्तेत सामावून न घेतल्याने त्याचे उट्टे काढत कोल्हापुरातील राजकीय वादाचे अस्तित्व सोलापुरात दाखवून देण्यास सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment