माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सुमारे दहा तास सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी झाडाझडती घेतली. यानंतर अनिल देशमुख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अगदी मोजक्या शब्दांत अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली.
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसेच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे. दिवसभर सीबीआयची कारवाई सुरू होती. मात्र, त्यानंतर सायंकाळी अनिल देशमुख यांनी या प्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असं मी मानतो. पण जर तसं काही असेल, तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment