Saturday, April 24, 2021

चुकीची माहिती पसरवू नका”; अनिल देशमुख प्रकरणावरून संजय राऊत, जयंत पाटलांवर भाजपाचा निशाणा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये झाडाझडती देखील सीबीआयने घेतली आहे. या कारवाईवरून सत्ताधारी पक्षाचे नेते व भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सीबीआयकडून करण्यात आलेल्या या कारवाईबाबत शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आदी नेत्यांनी शंका उपस्थित करत, भाजपावर निशाणा साधला आहे. यावर आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले आहे

“उच्च न्यायालयाने सीबीआयला कधीही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले नाहीत. त्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास सीबीआयला कायद्यानुसार पुढे जाण्याचे निर्देश दिलेत. म्हणून चुकीची माहिती पसरवू नका, आम्ही आपल्यासारख्यां प्रतिष्ठित व्यक्तींकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा करत नाही.” असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्देशून म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी न्यायालयच्या आदेशातील मजकूर देखील पाहण्यासाठी जोडला आहे.

No comments:

Post a Comment