Wednesday, April 7, 2021

दिलीप वळसे पाटलांनी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला ; अनिल देशमुखानी केलं ट्विट,म्हणाले...



मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्विकारला. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद घेतले. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी जबाबदारी स्विकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “आज माझे स्नेही दिलीपराव वळसे पाटीलजी यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!,” असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. “पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही. बदल्यांच्या बाबतीत जी व्यवस्था ठरली आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. माझ्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलीस हाऊसिंगसाठी घरं बांधून घेणं या गोष्टी करायच्या आहेत”, असं ते म्हणाले आहेत.

सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असल्याचं वळसे पाटील यांनी यावेळी मान्य केलं. “काळ आव्हानात्मक आणि अवघड आहे. करोनामुळे सर्व पोलीस दल रस्त्यावर किंवा फील्डवर कार्यरत आहे. पोलीस दलाचं काम कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच करोना काळातल्या बंधनांची अंमलबजावणी करणं ही जबाबदारी देखील पोलीस विभागावर आहे. याच महिन्यात गुढी पाडवा, रमजान, आंबेडकर जयंती, राम नवमी आहे. हे दिवस त्या त्या धर्मीयांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत. सगळ्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा त्यात आहेत. करोनाचा अंदाज पाहिला, तर या महिन्यात परिस्थिती अधिक आव्हानात्मक असणार आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलीस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील”, असही त्यांनी पत्रकार परिषदेतुंन सांगितल आहे.

No comments:

Post a Comment