Wednesday, October 2, 2024

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित ? : कोण किती जागा लढणार?

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे 8 ते 10 दिवस शिल्लक आहेत. येत्या आठ दिवसांत आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. महाविकास आघाडीच्याही गेल्या काही दिवसांमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. खात्रीलायक सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे. जवळपास निश्चितही झालेला आहे. यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील समाजवादी पक्ष आणि शेकाप सारख्या पक्षांना 3 ते 5 जागा सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मविआची आज बैठक पार पडली. त्यानंतर पुढच्या आठवड्यात सलग तीन दिवस मविआच्या मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत. या तीन बैठकांमध्ये जागावाटप अंतिम होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

कोण किती जागांवर लढणार?
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 80 ते 85 जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत 7,8 आणि 9 तारखेला बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनुसार जागावाटप पार पडत आहे. स्ट्राईक रेट महत्त्वाचा मानला जातोय. लोकसभा निवडणुकीत 17 जागांवर लढून काँग्रेसने 13 खासदार जिंकले आहेत. तसेच काँग्रेसचा एक अपक्ष खासदारही आहे. तर ठाकरे गटाने 21 जागा लढवून 9 खासदार जिंकले. शरद पवार गटाने 10 जागा लढवून 8 खासदार निवडून आणले. मुख्यमंत्रीपदाचा दावा मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेस सर्वाधिक जागा लढत आहे. तर ठाकरे गटही मुख्यमंत्रीपदासाठी तसा प्रयत्न करत आहे.

No comments:

Post a Comment