Wednesday, March 12, 2025

सैफ अली खानवर उपचार झालेल्या रुग्णालयात सुरू आहेत काळ्या जादूचे प्रयोग ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरावर 16 जानेवारी 2025 मध्ये हल्ला झाला. अचानक एक व्यक्ती अभिनेत्याच्या घरात घुसला. मुलांना आणि घरातील महिलांना वाचवण्यासाठी सैफ अली खान आणि हल्लेखोरामध्ये हाणामारी झाली. तेव्हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेव्हा अभिनेत्याला रात्र तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं, त्या रुग्णालयाबाबत धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. रुग्णालयात काळी जादू होत असल्याची माहिती समोर येत आहे. लिलावती रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं होतं.
लिलावती रुग्णालयाचे ट्रस्टी प्रशांत मेहता यांनी दावा केला की, माजी ट्रस्टींनी रुग्णालय परिसरात नव्या ट्रस्टी बोर्ड विरोधात काळी जादू केली. आता परमबीर सिंग, जे लीलावती हॉस्पिटल ट्रस्टचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी प्रशांत बसलेल्या खोलीत काळी जादू केल्याचं त्याने उघड केलंय.

फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, प्रशांत यांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली आठ कलश आढळून आले ज्यात मानवी केस, कवटी, हाडे आणि तांदूळ होते… असे परमबीर यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीदारांच्या उपस्थितीत व्हिडीओग्राफी करताना पूर्ण खबरदारी घेत संबंधित जागा खोदण्यात आली.
खोदल्यानंतर जमिनीतून आठ कलश सापडले आहेत. ज्यात काही मानवी अवशेष, केस आणि हाडे होती. अशा वस्तू काळ्या जादूसाठी वापरल्या जात असल्याचं आढळून आलं आहे. रिपोर्टनुसार, रुग्णालयाचे माजी ट्रस्टी आणि अन्य संबंधीत व्यक्तींना 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप नव्या ट्रस्टने केलाय.

याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्र कायद्यान्वये काळी जादू आणि दुष्कृत्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला.

‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ ; जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या ;

वेध माझा ऑनलाइन।
शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचा समावेश होता. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले. ते म्हणाले, ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्या वक्तव्याचा अर्थ काय, त्यांचा रोख कोणाकडे यासंदर्भात स्पष्टपणे काहीच जयंत पाटील भाषणात बोलले नाही. मात्र, यावेळी राजू शेट्टी यांनी आपले ऐकले असते तर ते खासदार राहिले असते, असे वक्तव्य केले.लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाहीत. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. , असे  जयंत पाटील यांनी म्हटले.

पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी जाहीरपणे बोलल्या, काय म्हणाल्या?

वेध माझा ऑनलाइन
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी पक्षातील नेतेच आमने-सामने आले आहेत. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आता आमदार पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी जाहीरपणे बोलल्या आहेत.

“वृत्तपत्रातील एका पत्रकाराने माझी मुलाखत घेतली. त्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्यावर मी त्यांना सांगितलं, मी यावर उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्याने उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही” असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज द्यावी, असं तुम्ही बोललात का? त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. “ते माझ नाव घेऊन जी चर्चा करतायत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहूच नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
विधान सभेला तुम्ही पक्षविरोधी भूमिका घेतली असा त्यांचा आरोप आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा . या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे” “त्यांनी असा आरोप करायला नको होता. प्रचार करताना त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे निकाल लागल्यावर असे आरोप करणं, जो व्यक्ती 75 हजार मतांनी निवडून आलाय, काम केलं नाही, तर कसं शक्य होईल याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं” असं पंकजा मुंडे म्हणाल्या

कराडात स्व चव्हाणसाहेबांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन ;

वेध माझा ऑनलाइन
दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती असून त्यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी उपस्थित राहून अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजितदादा कराडला येणार असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानले जात होते. दरम्यान, समाधीस्थळी अजितदादांच्या गटासोबत खासदार शरद पवार गटातील नेते मंडळी देखील एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. खासदार शरद पवार यांच्या गटातील नेते माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देखील उपस्थित राहत याठिकाणी अभिवादन केले. 

कराड येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदींनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले. 
यावेळी शरद पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित दिसले


Thursday, March 6, 2025

शेवटच्या दिवशी एकूण 157 अर्ज दाखल ; सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक अपडेट ;

वेध माझा ऑनलाईन –  सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  एकूण 157 अर्ज पत्र दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर 234 उमेदवारांचे एकूण 251 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
गट /मतदार संघ निहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे- गट क्रमांक 1 – कराड मधून एकूण 14 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. गट क्रमांक 2- तळबीड 32 उमेदवारांचे 34 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 3- उंब्रज 30 उमेदवारांचे 31 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 4– कोपर्डे हवेली 46 उमेदवारांचे 49 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 5- मसूर 40 उमेदवारांचे 42 नामनिर्देशन पत्र दाखल. गट क्रमांक 6- वाठार किरोली  28 उमेदवारांचे 33 नामनिर्देशन पत्र दाखल.अ. जा. /अ. ज. राखीव – 9 उमेदवारांचे 9 नामनिर्देशन पत्र दाखल. महिला राखीव – 14 उमेदवारांचे 14 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
इ.मा.व. राखीव मधून 11 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. वि. जा. /भ.ज./वि.मा.वर्ग राखीव मधून 10 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. त्यामुळे पाच दिवसांत 234 उमेदवारांचे 251 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, संजय जाधव, उपनिबंधक अपर्णा यादव काम पहात आहेत.


Tuesday, March 4, 2025

जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान ; नवी दिल्ली येथे झाला सन्मान ;

वेध माझा ऑनलाइन
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन, उच्च दर्जाची साखर निर्मिती करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेकडून ‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘जयवंत शुगर्स’ला मिळालेला हा १७ वा पुरस्कार असून, या सन्मानामुळे जयवंत शुगर्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयवंत शुगर्स’ने नेहमीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करत, साखर उद्योग क्षेत्रात मोलाची कामगिरी बजाविली आहे. ‘जयवंत शुगर्स’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साखरेच्या उत्पादनातील वाढ, अन्य उपपदार्थांची निर्मिती व वाढत्या साखर उताऱ्यात सातत्य राखून, साखर उद्योगात उत्तुंग भरारी घेत एक आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेत, राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथड्स ऑफ शुगर अ‍ॅनालिसिस’च्यावतीने भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात, अध्यक्ष डॉ. मार्टिजन लीजडेकर्स, जनरल सेक्रेटरी डॉ. डायर्क मार्टिन व असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय अवस्थी यांच्या हस्ते जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमवेत कारखान्याचे चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाला वसंतदादा शुगर्स इन्स्टिटयूटचे डायरेक्टर जनरल संभाजीराव कडू-पाटील, मार्क लॅबच्या डॉ. वसुधा केसकर, डॉ. एस. एस. निंबाळकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय किर्तीचे तंत्रज्ञ, तसेच भारतातील साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते. 

या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले, मार्गदर्शक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले यांनी ‘जयवंत शुगर्स’चे सर्व सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार अशा सर्वांचे अभिनंदन केले आहे. 
 

Monday, March 3, 2025

अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा : राज्याच्या राजकारणात खळबळ

वेध माझा ऑनलाईन

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या बातमीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्टी दिली आहे.
दरम्यान सोमवारी (3 मार्च) रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोंडींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच 'देवगिरी' या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दीड तास या सर्वांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले.