Sunday, September 6, 2026

पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर राहुल गांधींसोबत चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
 लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. खा. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान नाशिक येथे भेट देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २४ ऑगस्टपासून आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी सविस्तर चर्चा करून महाराष्ट्रासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांचा आढावा घेतला.

या प्रसंगी माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्याशी राज्यातील सद्यस्थिती तसेच जनतेसमोरील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सखोल चर्चा केली. बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया, शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, महिला व बालकांवरील गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील कथित अनियमितता व भ्रष्टाचार या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. या समस्यांबाबत काँग्रेस पक्षाने अधिक प्रभावीपणे जनतेच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष हा जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून विरोधी पक्ष म्हणून लोकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढा देईल तसेच जनतेच्या आवाजाला अधिक बळ देण्याचे काम करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवर झालेल्या या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील वास्तव परिस्थिती राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून देत जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्याची गरज अधोरेखित केली. काँग्रेस संघटना अधिक मजबूत करून राज्यातील जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 
यावेळी राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये त्यांचा अनुभव व मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

बैठकीत मंत्रि गिरीश महाजन दाखल होताच, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा काढता पाय ; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ;

वेध माझा ऑनलाईन।
मोठी बातमी समोर येत आहे. आज जळगावमध्ये भाजपच्या जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत मंत्रि गिरीश महाजन दाखल होताच, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काढता पाय घेतल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

breaking...news...

महासंकटाची चाहूल; भारतासाठी काय धोका? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
प्रशांत महासागरात सध्या एकाच वेळी तीन चक्रिवादळे सक्रिय असून त्यांचा कहर सुरू आहे. त्यातच आणखी एक चौथे वादळ तयार होण्याची शक्यता वाढली आहे. यापैकी एका वादळाच्या वाऱ्यांचा वेग तब्बल 241 किलोमीटर प्रतितास इतका नोंदवण्यात आला आहे. या वादळामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जवळपास दशकभरानंतर पहिल्यांदाच प्रशांत महासागरात एकाच वेळी तीन वादळे सक्रिय झाली आहेत. त्यामुळे मेक्सिकोपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियापर्यंत चिंता वाढली आहे.

यंदा प्रशांत महासागरातील वादळांची सक्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामागे एल निनोची स्थिती हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, एल निनोची स्थिती लवकरच विक्रमी पातळीपर्यंत मजबूत होऊ शकते. सध्या सक्रिय असलेल्या तीन वादळांमध्ये चक्रिवादळ लोवेल सर्वात शक्तिशाली आहे. हे सध्या कॅटेगरी -4 चे अत्यंत धोकादायक वादळ आहे. त्याच्या वाऱ्यांचा कमाल वेग सुमारे 241 किलोमीटर प्रतितास नोंदवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते,लोवेल पुढील काही दिवस मोठ्या चक्रि‍वादळात परावर्तित होऊ शकते.

तुमचं काय दुखतंय? बापटांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला ;

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यातील गणेशोत्सवात डिजेबंदी या प्रकरणामुळे विद्यानंद बापट चर्चेत आले. काही लोकांनी त्यांचे समर्थन दाखवले तर काही लोकांनी असमर्थन केले. विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेल्या मुद्यासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा होते ती म्हणजे त्यांची भाषा.

मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व पाहता सगळ्यांनाच त्यांच्या मराठीची भुरळ पडली आहे. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बापटांच्या मराठीचे कौतुक केले पण त्यांना काही सल्लाही दिला.

फडणवीस यांनी केलेल्या कौतुकावर विद्यानंद बापट म्हणाले की " भाषा हे साधन आहे, ते साध्य नाही. आपला मुद्दा मांडण्याचे आणि दुसऱ्यासोबत संवाद साधण्याचे ते एक माध्यम आहे. भाषेवर तुमचे प्रभुत्व असेल आणि त्याचा वापर तुम्ही योग्य ठिकाणी करत असाल तरच त्याला काही अर्थ  उरेल. "

दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले, "दुसऱ्याला त्रास न होता तुम्ही तुमचा मुद्दा मांडायला हवा. म्हणजे दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाही. पण भावना दुखतात म्हणजे यांना नेमकं काय झालं? नेमकं कुठं यांना दुखलं? डीजेमुळे होणाऱ्या त्रासामुळे लोकांचं डोके दुखते, ह्रदयाला त्रास होतो. तसे यांच्या भावना दुखल्यावर नेमके काय दुखते " असा खोचक टोला बापट यांनी लगावला आहे.

Saturday, September 5, 2026

आयजींच्या वाहनाची नंबरप्लेट चर्चेत ; आय. जी. म्हणाले... करून घेतो... ;

वेध माझा ऑनलाइन।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापासून ते वाहतूक नियमांचे पालन, ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक शांतता राखण्यापर्यंत नागरिकांना नियमांची आठवण करून देणारे पोलीस प्रशासन स्वतःच्या बाबतीत किती काटेकोर आहे? हा सवाल आज कराडातील एका घटनेने ऐरणीवर आणला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा हे शहर व परिसरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीसाठी आज कराडात आले होते. बैठकीच्या निमित्ताने प्रशासनाकडून गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेचे धडे त्यांच्याकडून दिले जात असतानाच बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्याच वाहनावरील  नंबरप्लेट कॅमेऱ्यात कैद झाली

वाहनाच्या नंबरप्लेटकडे बारकाईने पाहिल्यानंतर ती सध्या अपेक्षित असलेल्या विहित स्वरूपाशी सुसंगत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. विशेष म्हणजे, वाहन नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च स्तरावरील अधिकाऱ्याच्या वाहनाबाबतच असा प्रश्न निर्माण झाल्याने या प्रकाराची चर्चा होणे स्वाभाविक ठरले.
कारण... काल (शुक्रवारी) कराडच्या पोलीसानी परीसरातील गाड्यांच्या नियमबाह्य नंबरप्लेटस व सायलेन्सर बुलडोझर खाली चिरडले आणि आज कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शर्मा यांच्या गाडीची नियमाला धरून नसलेली नंबरप्लेट कराडात पहायला मिळाली

सवाल थेट आयजींना; उत्तरही स्पष्ट!

पत्रकारांनी याबाबत थेट आयजी रंजनकुमार शर्मा यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी “नंबरप्लेट आवश्यक त्या प्रोसेसमध्ये आहे. लवकरच करून घेऊ,” असे स्पष्ट केले.
आयजींच्या या उत्तरामुळे एक बाब स्पष्ट झाली—नंबरप्लेटबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ नंबरप्लेटचा राहत नाही; नियम सर्वांसाठी समान आहेत का आणि नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतही त्याच निकषांचा अवलंब केला जातो का? हा मूलभूत प्रश्न पुढे आला आहे.

केवळ सामान्य नागरिकांकडून नियमांची अपेक्षा; 

गणेशोत्सव काळात एखाद्या नागरिकाच्या वाहनावर नियमबाह्य नंबरप्लेट आढळल्यास त्याच्यावर कारवाईची शक्यता असते. वाहनचालकांकडून कागदपत्रे, नंबरप्लेट, वाहतूक नियम आणि इतर बाबींचे काटेकोर पालन अपेक्षित केले जाते. मग याच नियमांच्या चौकटीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांकडे पाहिले जाते का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने स्वतःच्या वाहनांबाबतही त्याच कायदेशीर निकषांचे पालन करणे अपेक्षित असते. कारण कायद्याची ताकद केवळ कारवाई करण्यात नसते; तर तो कायदा स्वतःपासून लागू करण्याच्या नैतिक भूमिकेतही असते.
आयजी शर्मा यांनी नंबरप्लेट आवश्यक प्रक्रियेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या प्रक्रियेबाबत पारदर्शकता ठेवणे अपेक्षित आहे. 
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराडात शांतता, शिस्त आणि कायद्याचे पालन याचा संदेश देण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनामुळेच ‘नियम आधी कोणासाठी?’ हा प्रश्न चर्चेत आला आहे.
दरम्यान आयजी शर्मा यांनी स्वतः “लवकरच करून घेऊ” असे आश्वासन दिल्याने आता त्यांच्या वाहनावर नियमानुसार नंबरप्लेट कधी झळकते, याकडे कराडातील पत्रकारांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

Friday, September 4, 2026

जखिणवाडी व कालवडे येथे ८८.५० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन ;

वेध माझा ऑनलाईन:
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जखिणवाडी (ता. कराड) येथे ५६.५० लाख; तर कालवडे येथे ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. 

जखिणवाडी येथे २५ लाखांच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच ९.५० लाख खर्चून संत रोहिदास नगर येथे काँक्रीटीकरण व पेव्हर्स बसविण्याचे काम आणि ७ लाखांच्या निधीतून अंतर्गत रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. याचबरोबर १५ व्या वित्त आयोगातून ८ लाखांच्या निधीतून रस्ता काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या कामांचे भूमिपूजन आ.डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावात ७ लाखांच्या निधीतून करण्यात आलेल्या अंतर्गत रस्ता सुधारणाचे कामाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

तसेच कालवडे येथे २५ लाखांच्या निधीतून ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम केले जाणार आहेत. तसेच ७ लाखांच्या निधीतून गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या कामांचेही भूमिपूजन आ.डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, माजी उपसभापती पै. दादासाहेब थोरात, सरपंच सुदाम मोटे, उपसरपंच शुभम थोरात, बालिश थोरात, जखिणवाडीच्या सरपंच शोभा नलवडे, उपसरपंच शंकर झिंब्रे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोहर थोरात, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तडाखे, पै. आप्पासो पाटील, हिंदुराव पाटील, सचिन मोहिते, अशोक पाटील, भास्करराव पाटील, महेश गुरव, अधिकराव पवार, शिवाजी कणसे, पै. श्रीकांत थोरात, हरिश शेठ, शंकर थोरात, पै. धनाजी थोरात, पै. मनोहर थोरात व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


कराडात "मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर' वर पोलिसांनी फिरवला बुलडोझर...कराडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई ;

वेध माझा ऑनलाईन ।
मॉडिफाईड सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर करून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या वाहनचालकांना आता वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. सातारा आणि कराडमध्ये पहिल्यांदाच सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वय साधत एकाच वेळी कारवाईचा धडाका लावला. जप्त केलेले मॉडिफाईड सायलेन्सर कराडच्या विद्यानगर येथे बुलडोझरखाली अक्षरशः चिरडून नष्ट करण्यात आले. साताऱ्यातही पोवई नाका येथे जप्त सायलेन्सर अशाच पद्धतीने नष्ट करण्यात आले.

या विशेष कारवाईत मॉडिफाईड सायलेन्सरचे २८१, फॅन्सी नंबर प्लेटचे १७०, प्रेशर हॉर्नचे १८३ आणि सायरनचे ४३ अशी एकूण 677 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस, कराड शहरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे तसेच सातारा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.
मॉडिफाय सायलेन्सरमुळे निर्माण होणारा कर्णकर्कश आवाज, नियमबाह्य हॉर्न, सायरन आणि फॅन्सी नंबर प्लेटमुळे होणारे नियमांचे उल्लंघन याविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

कारवाई करून सोडणार नाही, तर जप्त केलेले सायलेन्सरच नष्ट करू असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. यापुढेही मॉडिफाय सायलेन्सर बसविणे, नियमबाह्य आवाजाचे हॉर्न अथवा सायरन वापरणे आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणे सुरूच ठेवल्यास संबंधित वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

विशेष म्हणजे सातारा आणि कराडसह जिल्हा वाहतूक शाखेच्या समन्वयातून पहिल्यांदाच अशा पद्धतीने एकाच वेळी कारवाई करण्यात आल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.