Tuesday, April 9, 2024

समोसामध्ये बटाटा ऎवजी कंडोम आढळून आले ,आणखी काय काय सापडले समोसामध्ये...कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?

वेध माझा ऑनलाईन। 
पुण्यातील एका ऑटोमोबाईल कंपनीला देण्यात आलेल्या समोसामध्ये बटाटाऐवजी कंडोम, गुटखा आणि दगडी मिळाली आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका उपकंत्राटदारासह कंपनीच्या 2 कामगारांचाही समावेश आहे. 

मिळालेल्या  माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील एका ऑटोमोबाईल कंपनीने कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे खाद्यपदार्थ पुरवण्याची ऑर्डर दिली होती. याच फर्मने एका दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. या कंत्राटानुसार, उपकंत्राटदार कंपनीने ऑटोमोबाईल कंपनीला समोस्यांची ऑर्डर पुरवली. परंतु समोसे खात असताना कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना त्यामध्ये कंडोम, गुटखा आणि दगडी सापडली. यामुळे कंपनीत चांगलाच गोंधळ उडाला.
पुढे घडलेल्या या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, तीन भागिदारांना त्यांचे कंत्राट गेल्यामुळे राग आला होता. यामुळे त्यांनी ऑटोमोबाईल कंपनीला खाद्य पुरवत असलेल्या पुरवठादारांना बदनाम करण्यासाठी सर्व कट रचला. या कटामध्ये त्यांनी आपल्या दोन कर्मचाऱ्यांना नव्या कंत्राटदाराकडे कामाला लावले. यानंतर फिरोझ शेख आणि विकी शेख या दोन कर्मचाऱ्यांनी समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगडी भरली.
दरम्यान, फिरोझ शेख आणि विकी शेख या दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, ते एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारीत आहेत. त्यांना मनोहर एंटरप्रायझेस पुरवठा करत असलेल्या अन्नात भेसळ करण्यासाठी कंपनीकडून पाठवण्यात आले होते. आरोपीने दिलेल्या या माहितीनंतर त्यांच्या विरोधात पोलिसांनी विविध कायमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Saturday, April 6, 2024

उद्या महायुतीचा कराडात संवाद मेळावा ; कोण काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष ; उद्याच महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता ?

वेध माझा ऑनलाईन। 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधील घटक पक्षांच्या कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कराड येथे उद्या सोमवारी (ता. ८) आयोजित करण्यात आला आहे. विजयनगर (ता. कराड) येथील पार्वती लॉन येथे होणाऱ्या या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.दरम्यान उद्याच महायुती कडून उमेदवार कोण...हे कळणार  का? अशी चर्चा आहे , कोण काय बोलणार याकडेेही उद्या सर्वांचे लक्ष असणार आहे...

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्यावतीने सातारा लोकसभा मतदारसंघात सोमवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उद्या सोमवारी (ता. ८) सकाळी १० वाजता विजयनगर येथे कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, भाजपचे रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे आणि माजी आमदार आनंदराव पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान उद्याच महायुती कडून उमेदवार कोण...हे कळणार  का? अशी चर्चा आहे , कोण काय बोलणार याकडेेही उद्या सर्वांचे लक्ष असणार आहे...

या संवाद मेळाव्याला कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

Friday, April 5, 2024

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार ? आणखी कोण करणार शरद पवार गटात प्रवेश? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। 
माढा लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार गटाकडून संजीवराजे निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील आणि रामाराजे निंबाळकर यांचा विरोध होता. दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. भाजप आणि अजित पवार गटाकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नदेखील केले गेले. पण तरीही भाजप पक्षासाठी जे अनपेक्षित होतं तेच आता घडण्याची शक्यता आहे. हे डॅमेज कंट्रोल करणं भाजपला आता शक्य होतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छादेखील व्यक्त केली होती. पण पक्षाने विद्यमान खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. विशेष म्हणजे त्यांची मनधरणी करण्यासाठी स्वत: मंत्री गिरीश महाजन अकलूजला गेले. त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण गिरीश महाजन यांच्यासमोर मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केलं.

माढ्यात मोठा राजकीय भूकंप होणार
दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज होते. यामुळे रामराजे आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या होत्या. या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना भेटून नाराजीदेखील व्यक्त केली. पण तरीही उमेदवार बदलण्याचा निर्णय न झाल्याने आता माढ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

शरद पवार गट कुणाला उमेदवारी देणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत माढ्याची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार गट या जागेतून धैर्यशील मोहिते पाटील किंवा संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी याबाबत खासगीत बोलताना माहिती दिली आहे. माढ्यात कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर कुटुंब एकत्रित निर्णय घेऊन कळवणार आहेत. पण संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

बारामतीत राजकीय वातावरण तापलं , फडणवीसांनी घेतली सुप्रिया सुळे यांच्या प्रचार प्रमुखांची भेट ,;

वेध माझा ऑनलाईन। 
बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. दोन्हा बाजूंनी जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीतील दिग्गज नेते या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरात सभा घेतली. या सभेच्या आधी खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूर प्रचार प्रमुख असलेले प्रविण माने यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, प्रवीण माने, उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 
इंदापूरच्या राजकारणात प्रविण माने हे महत्वाचे नेते मानले जातात. प्रवीण माने हे जिल्हा परिषदेत सभापती होते. सोनाई परिवाराच्या माध्यमातून त्यांचं मोठं काम आहे. या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. ते शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केला होता. पण, काही दिवसापूर्वी इंदापूरातील झालेल्या सभेला त्यांनी दांडी मारली होती.  यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या.  प्रविण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुका प्रचार प्रमुख आहेत.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यामुळे प्रविण माने आता शरद पवार यांची साथ सोडणार का अशा चर्चा सुरू आहेत. 



सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा ? ; म्हणाले...

वेध माझा ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या जागेवरून सध्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात घमासान सुरू आहे. जागा वाटपाचा तिढा कायम असताना शिवसेनेने चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सांगलीच्या जागेवर काँग्रेससने दावा केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सांगलीत कोणी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करू नये, असा गंभीर इशारा काँग्रेसला दिला आहे. इथे विरोध केला तर जर त्याचे पडसाद राज्यातील 48 जागावर उमटतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Breaking/

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन कलह, विश्वजीत कदम दिल्लीला जाताना काय म्हणाले

वेध माझा ऑनलाईन। 
"शिवसेनेनं काय करावं? हा प्रश्न माझा नाही. मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न करतोय. ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला मिळावी", अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली.

महाविकास आघाडीत लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरुन पेच निर्माण झाला आहे. या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना लोकसभेची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सांगलीत वसंतदादा पाटील गट, कदम गट आणि मदनभाऊ गट एकत्र आले आहेत. तसेच जिल्ह्यातलं वातावरण हे काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. पण तरीही ठाकरे गटाने सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या या भूमिकेला सांगलीतील काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. यासाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम सांगलीच्या काँग्रेस नेत्यांसोबत दिल्लीला पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. विश्वजीत कदम यांनी दिल्लीत जाण्याआधी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“विशाल पाटील माझ्यासोबत आहेत. मी, विशाल पाटील आणि सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही दिल्लीत जावून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहोत”, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली. “माझ्या माहितीनुसार, शिवसेनेची सांगली जिल्ह्यातील अंतर्गत बैठक आहे. म्हणून त्यांचा तो पक्षांतर्गत विषय आहे. बाकी आम्हाला अधिकृत सूचना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून मिळालेल्या नाहीत. माझी भूमिका ठाम आहे. काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगलीच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगावा”, असं मत विश्वजीत कदम यांनी मांडलं.

अशोक चव्हाण यांच्यामुळे तिढा निर्माण झाला?
काँग्रेस नेत्यांकडून खासगीत भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांच्यामुळे जागावाटपात घोळ झाल्याचा दावा करण्यात आलाय. याबाबत विश्वजीत कदम यांना प्रश्न विचारण्यात आला. “मला त्याची कल्पना नाही. गेल्या तीन-चार महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका चालू होत्या. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि त्या काळात निश्चितच अशोक चव्हाण हे सामील होते. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड होते. तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि इतर काही नेते होते. या बैठकांमध्ये ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आवश्यकता होती तेव्हा ते देखील होते. त्या चर्चांमध्ये काय झालं आणि अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडली ते मला माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली.

वरिष्ठांकडून फॉर्म्युला समजून घेऊ’
“शिवसेनेनं काय करावं? हा प्रश्न माझा नाही. मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न करतोय. ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला मिळावी”, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली. तसेच “आमच्याकडे कोणताही फॉर्म्युला नाही. फॉर्म्युल्याची चर्चा शिवसेना करत आहे. फॉर्म्युला काय हे त्यांनी वरिष्ठांना कळवलं आहे. नेमका काय फॉर्म्युला आहे ते वरिष्ठांकडून समजून घेऊ”, असं विश्वजीत कदम म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी हातच जोडले, नारायण राणे प्रचाराला लागले...वाचा...काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असूनही काही जागांवर अद्यापही उमेदवार निश्चित झाले नाहीत. महाविकास आघाडी आणि महायुती असा महाराष्ट्रात राजकीय सामना होत आहे. राज्यातील ४८ पैकी बहुतांशी जागांवरील दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. मात्र, अद्यापही काही जागांवर उमेदवारीवरुन राजकीय खलबतं सुरू आहेत. त्यात, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, हातकणंगले, ठाणे, कल्याण या जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यातच, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपा आग्रही असून शिवसेनेनंही दावा केला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, त्यांनी उत्तर देणे टाळले. 

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला होता. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील इच्छुक होते. अशातच मंगळवारी रात्री उशिरा किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माघार घेतली. त्यामुळे नारायण राणेंचा मार्ग मोकळा झाला आहे, अशीही चर्चा रंगली आहे. यापूर्वी माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनीही या जागेवर दावा केला होता. त्यावरुन, भाजपाला आपल्या शैलीत फटकारलेही होते. मात्र, त्यांचाही आवाज कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे, भाजपाने ही जागा शिंदेंकडून खेचून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, नारायण राणेंनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हेही महायुतीच्या उमेदवारासाठी मतदारसंघात जोमाने फिरत असल्याचे दिसून येते. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भाजपाकडून दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच, एका ठिकाणी उमेदवार बदलल्याची आणि काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यावर, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे, काही जागांबाबत वेगळे निर्णय झाले आहेत. मात्र, ज्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं नाही, त्यांचाही पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरील उमेदवारीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी हात जोडून उत्तर देणे टाळल्याचे दिसून आले.