Sunday, October 2, 2022

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 10 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे 1 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 2 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 5 वाई 0 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 9 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ; शिंदेंच्या जीवाला धोका -गुप्तचर विभागाची माहिती

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे. 

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 
यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार ज्या दिवसापासून राज्यात आलं आहे तेव्हापासून अनेकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आता ठेचून काढली जाईल. याच्या मुळाशी कोण आहे याचा तपास केला जाईल."
आषाढी वारीच्या वेळीही एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता पीएफआयवर बंदी घातल्यानंतर अशा प्रकारची धमकी आली आहे. या अनुषंगाने पोलिस आता तपास करत आहेत

Saturday, October 1, 2022

महाराष्ट्र राज्याला एकूण 23 पुरस्कार ; पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर...

वेध माझा ऑनलाइन -  ‘स्वच्छ सर्वेक्षण -२०२२’ अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक तर कराड  शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती  द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज  एकूण २३ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-२०२२’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम १२ पुरस्कारांचे यावेळी  वितरण करण्यात आले. 
 महाराष्ट्रातील तीन शहरांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
देशातील १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत सातारा जिल्हयातील पाचगणी शहराने उत्तम कामगिरी करत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत कराड नगरपरिषदेला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या उभय शहरांनी शहर स्वच्छता आणि सुशोभीकरणात उत्तम कामगिरी केली असून स्थानिकांचाही त्यास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई शहराला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज  एकूण २३ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

      

तुम्हाला दोन वेळा अस्मान दाखवले आहे याचे भान ठेवा ; मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकराना करून दिली आठवण ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - आमच्यात हिम्मत असल्यानेच मतदार संघातील सर्व सामान्य जनतेच्या पाठबळावर तुम्हाला विधानसभा निवडणूकीमध्ये सलग दोन वेळा मोठ्या फरकाने आस्मान दाखवले आहे, याचे भान सत्यतिसिंह यांनी ठेवावे. ज्या गद्दारीची भाषा आपल्या तोंडून आता येत आहे. मग ज्यावेळी आपल्या नेत्यांनी काँग्रेसमधून बंडाळी करत बाहेर पडून वेगळ्या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पहिल्यांदा तुमच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आपले पिताश्रीं यांनी नेमके काय केले होते. याचेही उत्तर तुम्ही अगोदर जनतेला द्यावे. तसेच उठाव आणि बंडळी यातला फरकच ज्यांना कळत नसेल अशा बालिश निष्क्रीय तसेच जनतेने दोन वेळा नाकारलेल्या नेतृत्वाला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारी आहे का? असा सवाल राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांतुन विचारला आहे.

प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, काहीच काम शिल्लक नसलेल्या मंडळी ह्या केवळ प्रसिध्दीसाठी मोठ्या आवेशात बेताल वक्तव्य करत असून त्यांचे कार्यकर्ते टिकून रहावे म्हणून त्यांची करमणूक करण्याचा हा प्रकार असल्याने मतदारसंघातील सर्व सामान्य जनता याकडे गांभीर्याने नक्कीच बघणार नाही. कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये या निष्क्रिय नेतृत्वाने तालुक्यातील जनतेला माझे प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांची खोटी पत्रके काढून निव्वळ करमणूकीचा खेळ केला. त्यामुळे आपण केलल्या करमणूकीमुळे आपल्या सोबत किती जनता आहे, हे येणाऱ्या काळातच कळेल. केवळ मोठ्या नेत्यांची नावे घ्यायची आणि त्यांचे नावे पत्रक काढून लोकांची दिशाभूल करायची, हा प्रकार तालुक्यासाठी नविन नाही. अशा प्रकारे केलेला प्रयत्न तालुक्यातील सुज्ञ जनतेने त्यावेळी हाणून पाडला आहे, हेही चांगलेच ज्ञात आहे. निवडणूक आली की वाड्याच्या बाहेर पडायच आणि जनतेमध्ये दिशाभूल करणे हा तुमचा एककल्ली कार्यक्रम आता तालुक्यातील जनतेला चांगलाच माहिती झाला आहे,मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील गावे व वाड्या वस्त्यांच्या प्रलंबित विकास करण्याचा नेहमीच प्रयत्नशील असून गावां-गावांमध्ये विकासाची कामे सध्या सुरु आहेत. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये मतदारसंघातील आम जनतेने नेहमीच विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ दिले आहे. . दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या व ग्रामपंचायतीच्या फंडातून पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजनासाठी जाण्याची आजपर्यत वेळ आली नसून मतदारसंघामध्ये मंजूर असलेल्या विकास कामांची भूमिपूजने ही विभागा-विभागातील गावा-गावातील माझे सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाची कामे सुरु आहेत की नाही हे झोपेच्या सोंगत असलेल्या व काविळ झालेल्यांना दिसणारच नाहीत. परंतु सर्व सामान्य जनता मताच्या रुपाने नक्कीच याचे उत्तर येणाऱ्या काळात देईल. समोरा-समोर येण्याचे आव्हान देताना आपण ज्या आवेशात बोलत आहात किमान आपण आपली राजकीय उंची तपासून अशा प्रकारची व्यक्तव्य करावीत.  समोरा- समोर येण्याचे आपण जे आव्हान करत आहात ते आम्ही यापूर्वीच आपल्याला केले आहे. आपणच ठिकाण तारीख व वेळ सांगा जरुर समोरा समोर येऊन दूध का दूध  व पाणी का पाणी केले जाईल. ज्या धनशक्तीचा उल्लेख केला ती कोणाकडे आहे व तालुक्यात निवडणुका आल्या की त्याचा वापर तुमच्याकडून कसा होतो हे तालुक्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे धनशक्ती  कोणाकडे आहे व जनतशक्ती कोणाकडे आहे वेगळे सांगण्याची गरजच नाही.  असेही प्रसिध्दीपत्रकांत म्हटले आहे 

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 9 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे 7 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 1 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 7 वाई 0 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 9 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 7 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण - कराड नगरपालिकेचा देशात तिसरा क्रमांक...

वेध माझा ऑनलाइन - यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला आहे.पालिकेचे मुख्याधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांनी त्यासाठी दिलेले भरगोस योगदान आणि शहरातील नागरिकांचा मिळलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हे शक्य झाले आहे

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दोन नेते रिंगणात; तिसऱ्याचा अर्जच बाद ; वाचा बातमी

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याच्यावरून शह काटशहाचे राजकारण सुरु होते. या सर्व राजकारणाची आचा फायनल ठरली आहे. काँग्रेस हायकमांडचे विश्वासून मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे शशी थरूर असा हा सामना रंगणार आहे. तिसरे उमेदवार झारखंडचे माजी कॅबिनेट मंत्री के एन त्रिपाठी यांचा अर्ज रद्द झाला आहे. 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे, यामुळे त्याच दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, तुर्तास तरी दोन्ही गट पाहता ही निवडणूक अटळ असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये 20 पैकी 4 फॉर्ममधील स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आल्याने ते नाकारण्यात आले आहेत. आता या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर आमनेसामने असतील, असे ते म्हणाले. या दोन्हीपैकी एकानेही अर्ज मागे न घेतल्यास निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरु केली जाईल, असेही ते म्हणाले. 
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. नामांकनाच्या शेवटच्या दिवशी झारखंडमधील काँग्रेस नेते केएन त्रिपाठी यांनीही शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह उमेदवारी दाखल केली होती. कृष्णानंद त्रिपाठी उर्फ ​​केएन त्रिपाठी हे राजकारणात येण्यापूर्वी ते हवाई दलात होते. लष्कराची नोकरी सोडून राजकारणात आले. 2005 मध्ये डाल्टनगंजमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 मध्ये पुन्हा डाल्टनगंजमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री करण्यात आले. २०१४ मध्ये ते पुन्हा पराभूत झाले.