Monday, March 20, 2023

पेन्शनचं मिशन संपलं ; संप मागे ;

वेध माझा ऑनलाईन - जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे.

आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी 28 मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामिल होण्याचा इशारा दिला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास 18 लाख सरकारी- निम सरकारी कर्मचारी संपावर होते. आज सुकाणू समितीच शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधान भवनात पोहोचले. एकूण 16 जणांचे शिष्टमंडळ विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली.

काय आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या  प्रमुख 18 मागण्या?
- नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा
- कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे, सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा
- सर्व रिक्त पदे तत्काळ भरा. (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या) तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेल्या मज्जाव तात्काळ हटाव
- अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचान्यांच वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादित सूट द्या
- सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा. (वाहतूक, शैक्षणिक व इतर भत्ते)
- चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नका. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा.
- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचान्यांचे प्रश्न ( सेवतंर्गत आशवासित प्रगती योजना १०:२०:३० वर्ष व इतर) तत्काळ सोडवा.
- निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.
- नवीन शिक्षण धोरण रद्द करा.
- नर्सेस/ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक समस्यांचे तत्काळ निराकरण करा
- मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सद्या रोखलेले पदोन्नती सत्र तत्काळ सुरु करण्यात यावे
- उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ववत सुरु करण्यात यावी. या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करण्यात यावे
- वय वर्षे ८० ते १०० या वयातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी
- कामगार-कर्मचारी-शिक्षकांच्या हक्कांचा संकोच करणारे कामगार कायद्यातील मालकधार्जिणे बदल रद्द करा
- आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजने व्यतिरिक्त एकस्तर वेतनवाढीचा लाभ कायम ठेवण्यात यावा व संबंधित कर्मचान्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावा
- शिक्षणसेवक, ग्रामसेवक आदिना मिळणाच्या मानधनात वाढलेल्या महागाईचा विचार करुन वृद्धि करण्यात यावी
- शासकीय विभागात कोणत्याही स्वरुपाच्या खाजगीकरण/कंत्राटीकरणास सक्त मज्जाव करण्यात यावा
- पाचव्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटींचे निराकरण करण्यास बक्षी समितीला अपयश आले आहे. त्यामुळे याबाबत सखोल पुनवचार करुन सर्व संबंधित प्रवर्ग कर्मचारी-शिक्षकांना न्याय देण्यात यावा.

एकाच रुममध्ये 2 तरुणांची आत्महत्या ; एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्याने घेतला गळफास ; सातारा जिल्हा हादरला ;

वेध माझा ऑनलाईन - सातारा जिल्ह्यामध्ये गोळीबाराची घटना ताजी असताना एकाच रुममध्ये 2 तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कोरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सी मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यामध्ये एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्या‌ने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोघांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोरेगाव पोलीस दाखल झाले दोन्ही तरुणाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल ; राऊतांच्या अडचणी वाढणार! ते प्रकरण अंगलट येणार !

वेध माझा ऑनलाईन - ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका प्रकरणात संजय राऊत यांनी पीडित मुलीचा फोटो ट्विट केला होता. यामुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानं राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 
बार्शीमध्ये काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेतील पीडितेचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला होता. पीडिता ही अल्पवयीन होती, आणि या फोटोद्वारे तिची ओळख पटत असल्यानं संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संजय राऊत यांच्यावर कोणत्या कलमातर्गंत गुन्हा दाखल झाला आहे यांची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. संजय राऊत यांच्याविरोधात पोक्सो 23,  जुवेनाईल जस्टीस 74, आयपीसी 228 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे 
संजय राऊत यांनी या मुलीचा फोटो ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. 'देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप पुरस्कृत गुंडांनी हा हल्ला केला आहे. पाच मार्चला हा हल्ला झाला आहे. आरोपी अद्याप मोकाट आहेत' असं राऊत यांनी म्हटलं होतं. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

पाटण गोळीबार प्रकरण ; सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले यामागचे कारण ;

वेध माझा ऑनलाईन - रविवारी पाटण तालुक्यात एका ठाण्याच्या माजी नगरसेवकाने तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून तसेच गाडीचा झालेल्या एका अपघातावरून  वाद सुरु होता. यानंतर याप्रकरणी गोळीबार झाला. या प्रकरणातील आरोपींवर 302 कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेही यावेळी समीर शेख म्हणाले

समीर शेख म्हणाले की, पाटण तालुक्यातील मोरणा खोर्‍यात रविवार, दि. १९ रोजी शिद्रुकवाडी येथे काही कारणांनी युवकाची भांडणे झाली होती. तसेच काही दिवसापूर्वी गाडीच्या अपघातावरून भांडणे सुरु होती. हा वाद सुरु असताना काल पुन्हा गाडीच्या अडवण्यावरून देखील भांडणे झाली.यावेळी झालेल्या वादावादीत आरोपीचे साथीदार त्या ठिकाणी आले असता मुख्य आरोपी मदन कदम याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये दोन लोकांना गोळ्या लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी एक व्यक्ती जखमी झाली असून त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आता त्या व्यक्तीची प्रकृती ठीक आहे.या गोळीबार प्रकारणी मुख्य आरोपीवर 302 कलमान्वये हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sunday, March 19, 2023

पाटण तालुक्यात गोळीबार ; 2 जण ठार ; एकच खळबळ ; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात ;

वेध माझा ऑनलाईन - पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी येथे गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये 2 जण जागीच ठार झाले अशी माहिती मिळाली आहे या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हल्लेखोर मदन कदम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोळीबार केल्याची माहिती समजताच पाटण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करित आहेत. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात झालेल्या गोळीबारामुळे तालुक्यातील तणावाचे वातावरण आहे. 

माझ्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? खेड च्या सभेत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ;

वेध माझा ऑनलाईन - काहीच दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली होती, याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा झाली. या जाहीर सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत एकनाथ शिंदे यांनी मागचं सर्व उकरुन काढत ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युती असताना महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलेल्या टीकेची आठवण करत माझ्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असा थेट सवाल केला आहे.

तुमच्या डोक्यात पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला : मुख्यमंत्री शिंदे
तुमच्या डोक्यात पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळंच बिघडलं. सगळे वाईट होते ते चांगले झाले, सगळं विसरून गेलात. अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं असं तुम्ही म्हणालात, मग त्यांच्या पंगतीत बसून तुम्ही काय खात आहात, सांगा? कोण कोणाला डोळा मारत होता, ते आपण पाहिलं. गळ्यात गळे घालत आहेत ते कधी गळा दाबतील कळणार नाही. त्यांचा पूर्व इतिहास तपासून बघा. आम्हाला तुम्ही मिंधे म्हणताय. एकनाथ शिंदे वफादार आहे, मी गद्दार नाही खुद्दार आहे. बेईमानी माझ्या रक्तात नाही, असं एकनाथ शिंदेंनी सुनावलं. शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, केसेस अंगावर घेतल्या त्यांना तुम्ही गद्दार आणि खोके म्हणता, तुम्हाला बोलताना थोडंतरी काही वाटलं पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असं एकनाथ शिंदे म्हणाले.
येत्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीच्या राज्यभरात सभा होणार आहेत, यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. सर्कशीप्रमाणे राज्यभरात त्यांचे शो होणार आहेत असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

बावनकुळेंच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक ; बावनकुळे यांच्या एका विधानामुळे भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 वेध माझा ऑनलाईन - आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधीच भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. याला कारणीभूत ठरलंय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान. आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन बावनकुळे यांनी नुकतंच पक्षाच्या प्रवक्त्यांना केलं आहे. या वक्तव्यावरून शिवसेनेच्या शिंदे गट आक्रमक झाला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांना बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही काय मुर्ख आहोत का : संजय शिरसाट
शिवसेना आमदार संजय शिरसाट यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्टेटमेंटमध्ये दम नाही. त्यांना एवढे अधिकार कोणी दिले, हे माहिती नाही? अशा वक्तव्यामुळे युतीमध्ये वाद निर्माण होतो, याची जाणीव बावनकुळे यांना असायला पाहिजे. आम्ही काय मुर्ख आहोत का फक्त 48 जागा लढवायला? दोन्ही पक्षातील जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, अशी तिखट प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजप-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे.”, असं म्हणत बावनकुळे यांनी आम्ही महत्त्व देत नाही अशीच काहीशी त्यांची प्रतिक्रिया होती.