Saturday, December 2, 2023

वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर घेऊन आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. तसंच या शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवण्यात आली. या आरोपांना आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "अजित पवारांनी आता एक राजकीय निर्णय घेतला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. पण माझी फक्त एकच तक्रार आहे की, त्यांनी हा निर्णय आता घेण्याऐवजी ज्यावेळी त्यांनी निवडणुकीला फॉर्म भरला, तो फॉर्म भरताना राष्ट्रवादीच्या नावाचा घेतला, त्यांना जे तिकीट देण्यात आलं ते माझ्या किंवा जयंत पाटील यांच्या सहीने आणि मान्यतेने देण्यात आलं आणि त्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या नावावर मतं मागितली. मग आता पक्षाशी विसंगत भूमिका घेणं योग्य नाही, एवढंच माझं म्हणणं आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करताना शरद पवार म्हणाले की, "ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते, तो आम्हा लोकांना मान्य नव्हता. विधानसभा निवडणुकीत आम्ही जी मते मागितली होती, ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. तेव्हा आम्ही जी भूमिका मांडली, त्याविरोधात जाणं ही लोकांची फसवणूक ठरली असती. आजही आमची भूमिका भाजपविरोधात आहे."

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा पुन्हा मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना स्वत:च आंदोलन करायला सांगितलं, असा घणाघात काल अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला होता. त्यावर पवार यांनी म्हटलं की, "मला राजीनामा द्यायचा किंवा मागे घ्यायचा असेल तर कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्याबाबतचा निर्णय घेण्याची माझी कुवत आहे." 

दरम्यान, मी पुस्तक लिहून अनेक गोष्टी उघड करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. त्यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. "प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची मीही वाट बघत आहे. लोक पक्ष सोडून कसे जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं," असा टोला पवारांनी लगावला आहे.

अजित पवारांची रोहित पवारांवर बोचरी टीका ; म्हणाले...आयुष्यात कधी संघर्ष केला नाही...आणि ,कसली संघर्ष यात्रा काढता ?

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जत येथील शिबिरात आज बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर अनेक आरोप केले. तसेच शरद पवार समर्थक नेत्यांनाही त्यांनी सोडले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी आजच्या भाषणात आमदार रोहित पवार यांनाही सोडले नाही. विशेष म्हणजे काका असलेल्या अजित पवारांवर टीका करणे पुतण्या रोहित पवार यांनी नेहमीच टाळले आहे. मात्र, आज काकांनीच टीकेचा पहिला वार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सध्या संघर्ष यात्रा सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्याहून निघालेली ही युवा संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूरला पोहचणार आहे. या यात्रेवर टीका करताना अजित पवार म्हणाले, काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?

तर शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, मागे एकदा आमचे वरिष्ठ पावसात भिजले होते, तसे आता त्यांचा एक सहकारीही पावसात भिजला. अरे कशासाठी? त्याच्यावर एकदा हल्ला झाला होता, तेव्हा मीच आधार द्यायला गेलो होतो. मी सगळ्यांच्या पाठीशी उभा राहिलो.
कारण आपल्यात तशी हिंमत आहे.

आगामी निवडणुकांबद्दल अजित पवार म्हणाले, यापुढे मी आठवड्याच्या सात दिवसांपैकी तीन दिवस मुंबईला, एक दिवस पुण्याला आणि उर्वरित तीन दिवस महाराष्ट्रभर फिरणार आहे. पक्षवाढीसाठी मलाही जास्त काम करावे लागेल.
तसेच प्रदेशाध्यक्ष, सगळ्या सेलचे प्रमुख आणि मंत्र्यांनाही काम करावे लागेल. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडवाव्या लागतील.

नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना आवाहन करताना अजित पवार म्हणाले, मागे एक बातमी आली की,लोकसभेला भाजप २६ जागा लढवणार आहेत. पण तुम्ही काळजी करू नका. जी काही ताकद आहे, त्यानुसार व्यवस्थित जागा मिळतील. सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी शिदोरी
घेऊन आपआपल्या भागात काम करण्यासाठी जाऊया.

कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर चाकूने वार करून खून ; हल्लेखोर फरार...

वेध माझा ऑनलाइन। कराड येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने वार करून खून झाला असून हल्लेखोर संशयित फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खुनाचे कारण समजू शकले नाही. शुभम रविंद्र चव्हाण असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

कराडच्या कार्वे नाका येथे शनिवारी दुपारी तीन च्या सुमारास शुभम चव्हाण याच्यावर अज्ञाताने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोर संशयित घटनास्थळावरून पसार झाला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस उपरिक्षक राजू डांगे यांच्यासह कर्मचारी तात्काळ धाव घेतली अशी माहिती मिळाली आहे

Friday, December 1, 2023

कराडसह तालुक्यात आजपासून साखळी उपोषणास सुरूवात ; मराठा आरक्षणासाठी तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

वेध माझा ऑनलाइन।  सकाळ मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी तीव्र लढा उभारला आहे. त्यासाठी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी राज्यातील गावागावात एक डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कराड येथील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शुक्रवार, दि. एक डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.

या साखळी उपोषणात मराठा समाजातील जेष्ठ नागरिकांसह तरुण, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांही उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले. उपोषणस्थळी आंदोलकांनी एक मराठा कोटी मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आधी. घोषणा दिल्या.
दरम्यान, जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवार, दि. 1 डिसेंबरपासून कराड तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये साखळी उपोषणे सुरु झाली आहेत. यामध्ये कृष्णाकाठच्या वडगाव हवेली, कोडोली व खुबी गावामध्ये सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. या गावातील गणेश व नवरात्र उत्सव मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपोषणाचे नियोजन आखले आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा तीव्र करत एक डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारपासून तालुक्यातील वडगाव हवेली, कोडोली व खुबी येथील सकल मराठा समाजाने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. दरम्यान, वडगाव हवेली येथील साखळी उपोषणस्थळ कराड-तासगाव मार्गावर रस्त्यानजीक असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणारे मराठा बांधव सदर उपोषणस्थळी भेट देत आहेत.

डॉ अतुल भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; ४००० एकर क्षेत्र पूर्णत: ओलीताखाली येणार ! काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।  म्हासोली मध्यम प्रकल्पातून कराड दक्षिणमधील गावांसाठी वितरित केले जाणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरित करावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून गेली अनेक वर्षे केली जात होती. भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी हा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला असता, त्यांनी या महत्वाकांक्षी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. 

या बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पामुळे ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या परिसरातील गावांमधील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध असून, सुमारे ४००० एकरहून जास्त क्षेत्र पूर्णत: ओलीताखाली येणार आहे.

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १९९४ साली येवती – म्हासोली मध्यम प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या अंतर्गत दक्षिण मांड नदीच्या तिरावरील येवती येथील धरणातून डाव्या कालव्यातून पाण्याचे वितरण केले जाते. हा डावा कालवा आणि त्याच्या लघुवितरिका बहुतांश डोंगराळ भागातून जातात. शिवाय या कालव्याच्या कामाला सुमारे ३० वर्षे उलटल्याने अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. ज्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने पोहचत नाही. 

वास्तविक या धरणातून वर्षातून केवळ २-३ वेळाच पाणी सोडले जाते. त्यातही अनेक ठिकाणी पाणी पाझरत असल्याने व त्याचा अपव्यय होत असल्याने, पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्याने या भागातील शेतीसमोर गंभीर संकट उभे राहते. अशावेळी धरणातून होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंदिस्त पाईपलाईनद्वारे केल्यास शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी थेटपणे अपव्यव न होता पूर्ण क्षमतेने पोहचू शकते. त्यामुळे याठिकाणी बंदिस्त पाईपलाईन करावी, अशी मागणी अनेक वर्षे ग्रामस्थांतून होत होती. 

या गावातील ग्रामस्थांनी हा प्रश्न भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे मांडला असतात, डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, बंदिस्त पाईपलाईनसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली. या बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पासाठी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले असून, याबाबतचे सुमारे ३२ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. 

या निधीला मंजुरी मिळाल्यास हा प्रकल्प ताबडतोब साकारणे शक्य असून, यामुळे या भागातील सुमारे ४००० एकरहून अधिक जमीन पूर्णत: ओलीताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या कामास मंजुरी द्यावी, अशी मागणी डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. याची दखल घेत, उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले असून, येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. 

डॉ. अतुल भोसले यांनी याप्रश्नी पाठपुरावा केल्याने या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असून; ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या गावांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. याबद्दल या गावांमधील ग्रामस्थांनी डॉ. अतुल भोसले यांचे अभिनंदन करत, शासनाचे आभार मानले. 

यावेळी ओंडचे माजी उपसरंपच भीमराव थोरात, भरत थोरात, कृष्णत थोरात, माजी ग्रा.पं. सदस्य भाऊसो थोरात, ॲड. दीपक थोरात, अभिजीत कोठावळे, राजेंद्र थोरात, व्ही. टी. थोरात, सुनील मोरे, सुनील जाधव, इंद्रजीत हणबर, दिलीप जाधव, आबासो सुतार,  टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


वेध माझा ऑनलाइन। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. “सगळ्यांच्या टॉच चालू करा. एकही टॉर्च बंद ठेवू नका. आता ते काही झोपत नाही गड्या. हिंगोलीत येऊन गप्पा हाणतो. इकडे येतो आणि जातीवाद करतो. घटनेच्या पदावर बसतो, सरकारसोबत राहतो, आणि महापुरुषांच्या जाती काढणारा, भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गुण्यागोविंदाने जगत असताना त्यांच्यामध्ये दंगली घडवण्याचं काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

स्वत:चं वय झालेलं असताना, कायद्याच्या पदावर बसलेला असताना, कायदा पायदडी तुडवणारा, इतक्या खालच्या दर्जाचा माणूस आतापर्यंत कधी झाला नाही. या भारत देशात आणि महाराष्ट्रात महापुरुषांच्या जाती काढणारा आतापर्यंत एकही व्यक्ती झाला नाही. यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या, राजद्रोह सारखा प्रकार हा माणूस करायला लागला आहे. जाती-जातीत दंगली भडकवण्याचा प्रकार करायला लागला आहे”, असा आरोप मनोज जरांगेंनी केला.

लोकसभेच्या जागा बारामतीसह कुठे कुठे लढवणार ; काय म्हणाले अजित पवार ?

वेध माझा ऑनलाइन। पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता लोकसभेसाठी सर्व पक्ष तयारीला लागल्याचं दिसत आहे. अजित पवार यांनी कर्जतमधील शिबीरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जागावाटपाबाबत आणि लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघासह चार ठिकाणी जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. समान नागरी कायद्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागेल. सातारा, शिरूर, बारामती, रायगड जागा लढवायच्या आहेत. जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे. केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असा आरोप होतो पण आरोप सिद्ध व्हावे लागतात. विकासकामांची गती रेंगाळल्याने भाजपसोबत गेलो होतो. आता मंत्रालयात भेटीसाठी जिल्हाध्यक्षांनाही प्राधान्य देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मी 32 वर्ष राजकारणात काम करीत आहे. आम्ही बोललो तसं वागतो आणि करतो. डीपीडिसी संदर्भात माझ्यावर कुणीही आरोप करू शकत नाही. मंत्री,खासदार आणि आमदार आणि आता जिल्ह्याध्यक्षांना आता माझ्याकडे कामाची संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादी युवतीमध्ये मतभेद आहेत, ते दूर करण्याची गरज आहे. भाजपबद्दल याआधी वेगळं बोललं जातं होतं, त्यामुळे आपनही अंतर ठेवून काम करत होतो. मात्र आता काळ बदलला, आपणही सेक्युलर आहोत आपली भूमिका बदलली नाही. एकापक्षाचे सरकार नसताना सर्वांचा विचार करावा लागतो. काही वेळेस काही निर्णय घ्यावे लागतात, आपला मूळ पक्ष आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, समान नागरी कायद्याबाबत अनेक गैरसमज आहेत. मी तुम्हाला सांगतो की, समान नागरी कायद्यामुळे कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. भाजपसोबत जे गेले त्यांची भूमिक बदलली का? असा सवाल करत अजित पवार यांनी मेहबुबा मुफ्ती आणि नितीश कुमार यांची नावं घेतलीत.