Monday, April 15, 2024

साताऱ्याचे "तुतारी' चिन्हाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी "मुतारी'चा घोटाळा केला ; माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा घणाघात :

वेध माझा ऑनलाइन। माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे  यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “साताऱ्याच्या तुतारी चिन्हाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा केला आहे. हि गोष्ट खूप लांच्छनास्पद आहे. आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते यावर आम्ही पवार साहेबांना काही बोलूच शकत नाही,” अशा शब्दात माथाडी नेते नरेंद्र पाटलांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी पोटाच्या बेंबीच्या देठापासून मला विरोध केला होता. एका माथाडी चळवळीत आपण काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या कुटुंबीयांनी आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केले. शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदार संघातून झाला.
परंतु २०२९ ला त्यांनी आमच्या ज्या काही सहकार्यांना हाताशी धरून ज्या पद्धतीने आमच्या विरोधामध्ये जे काही कटकारस्थान केले. त्याचे रिटर्न गिफ़्ट म्हणून कुठे तरी देण्याची संधी मला यानिमित्ताने आलेली आहे. निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे. त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू, असा सूचक इशारा देखील यावेळेला नरेंद्र पाटील यांनी दिला.

 उमेदवारी मिळेल !  : नरेंद्र पाटील
यावेळी नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातुन महायुतीतून आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला. भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले, मी स्वतः, धैर्यशील कदम आणि अजून काही उमेदवार इच्छुक आहेत. मला विश्वास आहे कि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे साताऱ्याच्या जनतेचा कौल घेऊन चांगला उमेदवार देतील, असे नरेंद्र पाटील यांनी यावेळी म्हंटले.



Sunday, April 14, 2024

वेध माझा ऑनलाइन।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अनेकजन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. कराड तालुक्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते.

कराडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रात्री बारा वाजल्यापासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली.रात्री बारा वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कराड आणि आसपासच्या गावातील लोक उपस्थित राहत होते. तीच गर्दी सकाळीही दिसून आली.

कराडमध्ये लेखक,पत्रकार अभयकुमार देशमुख यांनी सुद्धा एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांनी स्वतः लिहिलेल्या मुखिया, एल्गार, वी हेट बायोलॉजिकल वॉर, मसनवाट, व्यक्त अव्यक्त भाग १ या कादंबऱ्यांचा हार बाबासाहेबांना अर्पण करत अनोखं अभिवादन केलं.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती कराडचे अध्यक्ष राहुल भोसले, माजी नगरसेवक आनंदराव लादे तसेच समितीचे इतर सदस्य आणि विठ्ठलराव देशमुख, विक्रमसिंह देशमुख आणि  मान्यवरांची उपस्थिती होती.

शशिकांत शिंदे म्हणाले... तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
साताऱ्यामध्ये अद्याप महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. छत्रपती उदयनराजे भोसले हे दावेदार आहेत. असे असले तरी मविआकडून शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माझ्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी आढळलो तर उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे आव्हान शिंदे यांनी महायुतीला दिले आहे.

कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर वाशी येथील एपीएमसीच्या गाळे विक्रीत तब्बल ४००० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदाराला आव्हान दिले आहे. 
मविआकडून मी उद्या अर्ज भरणार आहे. शरद पवार उपस्थित असणार असून लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. जर मी यात दोषी आढळलो तर उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे आव्हान शिंदे यांनी दिले आहे. 


शरद पवार यांचाही भाजपसोबत जाण्याचा विचार होता... 4 जूननंतर काहीही होऊ शकतं, ; अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे धक्कादायक विधान;

वेध माझा ऑनलाईन ।
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही भाजपसोबत जाण्याचा विचार होता. राजकारणात 4 जूननंतर काहीही होऊ शकतं, असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी बैठक झाली होती, अशी माहिती पटेलांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची आमची सर्वांची भूमिका आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले इतकंच नाहीतर शरद पवार यांना भाजपसोबत येण्याची 50 टक्के इच्छा होती, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले, आम्ही दोनवेळा शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना सोबत येण्याची विनंती केली. आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले. तुम्ही सोबत राहिले तर आम्हाला आनंद होईल. तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करु इच्छित आहोत. त्यावेळेस मला तरी ते अनुकूल वाटले...

Breaking...

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानला मुख्यमंत्री शिंदेंचा फोन ; काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाईन।अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाणार आहे. त्याच्या घराबाहेरील सुरक्षासुद्धा वाढवली जाणार आहे. पोलिसांकडून युद्ध पातळीवर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळेपूर्वीच फोनवरून सलमानशी बातचित केली. फोनवरून मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दुसरीकडे या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री काय करत आहेत, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोळीबाराच्या घटनेवर बोलताना राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याबाबतची माहिती आम्हाला मिळेल. आम्हाला जेव्हा अधिक माहिती मिळेल, तेव्हा आम्ही देऊ. यात अटकळबाज्या करण्यात अर्थ नाही.”

नितेश राणे यांची प्रतिक्रिया
“हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, जिथे उद्योजकांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणार आणि मग सचिन वाझे त्याचा हिस्सा होणार. असं व्हायला हे काही उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. आम्ही जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे,” असं नितेश राणे म्हणाले.

Saturday, April 13, 2024

बँकेत न जाता... घरी बसूनच काढा पैसे...ते कसे? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन
अनेकवेळा आपल्याला इमर्जन्सी कॅश पैशाची गरज लागते. परंतु आपल्याला जर पैसे काढायचे असेल, तर आपल्याला एक तर बँकेमध्ये जावे लागते, किंवा एटीएममध्ये जावे लागते. परंतु जर आपल्याला बँकेत किंवा एटीएम मध्ये जायला वेळ नसेल, तर आपल्याला पैसे काढता येणार नाही. परंतु आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी बँकेची एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. कारण आता घरबसल्या हे पैसे एटीएमद्वारे तुम्हाला मिळणार आहे. ही नवीन योजना पोस्ट ऑफिसने सुरु केलेली आहे.

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेले आहे की, “जर तुम्हाला पैशाची तात्काळ गरज भासली आणि तुमच्याकडे बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आम्ही आधार एटीएम एईपीएस या सेवेचा वापर करून तुम्ही घरबसल्या पैसे काढता काढू शकता. पोस्ट मास्टर आता तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे  काढण्यास मदत करेल.

आधार आधारित या पेमेंट बँक प्रक्रियेद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या बायोमेट्रिक्सचा वापर करून रोख रक्कम काढू शकते. किंवा आधार लिंक केलेल्या खात्यातून पेमेंट करू शकते. एटीएम किंवा बँकेला भेट न देता एईपीएस वापरून ग्राहक छोटी रक्कम काढू शकतात. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. यासाठी तुमचे आधार तुमच्या बँक खात्यात लिंक करणे गरजेचे आहे.

दात पडलेला वाघ लोकांना नकोय; किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

वेध माझा ऑनलाईन ।
 मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांच्याविरोधात रान उठवले आहे. राज ठाकरे हे भाजपच्या दबावासमोर झुकले, असा प्रचार मविआच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणजे शक्तीहीन झालेला वाघ आहे. असा वाघ लोकांना नकोय, असे वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले. त्या शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

यावेळी किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेण्याची गरजच काय होती? राज ठाकरे म्हणतात, इतर पक्ष निवडून आल्यावर त्यांच्या भूमिका बदलू शकतात, मग मी का बदलू नये? पण राज ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहेत. 2019 मध्ये त्यांची 'लाव रे तो व्हीडिओ' ही टॅगलाईन लोकप्रिय झाली होती. पण राज ठाकरे यांनी नंतर त्यांची भूमिका बदलली. एवढंच कशाला पक्ष झाल्यापासून राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडाही अनेकदा बदलला. आधी निळा, मग हिरवा, त्यानंतर थोडासा भगवा, असे करत राज ठाकरे यांनी अनेक झेंडे बदलले. त्यामुळे असा दात निघालेला, नखं काढलेला, शक्तीहीन आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नको आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.