Tuesday, June 4, 2024

डॉ अतुल भोसलेंचा पृथ्वीराज बाबांना टोला, म्हणाले- साताऱ्यात कधीच भाजपचा खासदार निवडून येणार नाही, असे म्हणणाऱ्या प्रवृत्तींना, जिल्ह्यातील जनतेची चपराक ; उदयनराजे यांचे केले अभिनंदन-



वेध माझा ऑनलाइन।
सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत साताऱ्याचे नूतन खासदार म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे या जिल्ह्याला काँग्रेस - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटले जायचे याला छेद देत जिल्ह्यातील जनतेने असे म्हणणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक दिली आहे अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे प्रभारी डॉ अतुल भोसले यांनी दिली आहे आ पृथ्वीराज चव्हाण यांना हा टोला मारल्याची चर्चा सध्या सुरू आहे अतुल भोसले यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजे यांचे अभिनंदन केले आहे

यावेळी प्रतिक्रिया देताना डॉ भोसले म्हणाले... लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा झालेला विजय, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा विजय आहे. सातारा लोकसभेतील उदयनराजेंच्या विजयामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेने नरेंद्र मोदींना देशात पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी पाऊल उचलले आहे. तसेच साताऱ्यात कधीच भाजपचा खासदार निवडून येणार नाही, असे म्हणणाऱ्या प्रवृत्तींना, जिल्ह्यातील समस्त जनतेने या निकालाने सणसणीत चपराक दिली आहे.


Sunday, June 2, 2024

कराड नगरपालिकेचे आरोग्य अभियंता रफीक भालदार सेवानिवृत्त : पालिकेत त्यांचा सपत्नीक झाला सत्कार: पालिकेतील चार जण झाले निवृत्त :

वेध माझा ऑनलाइन। 
कराड नगरपालिकेत काम करताना स्व. पी. डी. पाटील यांनी माझी मुलाखत घेऊन सेवेत घेतले. नगरपालिका अधिनियम 1965 लागू करण्याच्या अभ्यासगटात साहेबांचा समावेश होता. त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम करता आले. कराड नगरपालिकेत काम करण्याची संधी मिळणे हे आपणासाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार आरोग्य अभियंता रफीक भालदार यांनी काढले.

कराड येथील नगरपालिकेचे आरोग्य अभियंता रफीक भालदार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार नगरपालिकेत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य कर्मचारी मिलिंद कांबळे, दत्तात्रय मोरे, शिपाई रामचंद्र जाधव हेही सेवानिवृत्त झाले. या सर्वांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील होते. माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, विनायक पावसकर, ऍड. मानसिंगराव पाटील, फारूक पटवेकर, सुहास जगताप, ए. एन. मुल्ला, जयंत बेडेकर, एम. एच. पाटील, ए. आर. पवार यांची उपस्थिती होती.
भालदार म्हणाले की, सेवा कालात सर्वांचे सहकार्य मिळाले. नवनवीन कामे करण्याची संधी मिळाली. पालिकेच्या विविध विभागात काम केले. स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर त्याचे मॉनेटरिंग करण्याची संधी मिळाली. नगरपालिकेला यश मिळाले पाहिजे, या निर्धाराने काम केले. सर्वांना प्रेरित केले. त्यामुळे नगरपालिकेने देशपातळीवर यश मिळवले. ही कामे करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी, महिला कर्मचारी, विविध विभागांनी मेहनत घेतली.  
सुभाषराव पाटील म्हणाले, आपण ज्या गावाचे नागरिक आहोत, त्या गावच्या नगरपालिकेत काम करायला मिळणे हे भाग्य आहे. हे भाग्य रफिक भालदार यांयासह निवृत्त होणाऱ्या कर्मचार्यांना लाभले आहे. भालदार यांनी आरोग्य विभागात झोकून काम केले. त्यांया काळात नगरपालिकेला देश पातळीवर यश मिळाले.  

माणिक बनकर यांनी प्रास्ताविक केले. आनंदा खवळे यांनी आभार मानले.

एक्झिट पोल्स किती खरे ठरतात? गेल्या निवडणुकांचे अंदाज किती खरे आणि किती खोटे ठरले? : वाचा सविस्तरपणे...

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल्सची चर्चा सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना पाहायला मिळाला. तसेच, अनेक राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमका निकाल काय लागणार? याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. त्यामुळेच शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर येणाऱ्या एक्झिट पोल्सकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण हे एक्झिट पोल्स किती खरे ठरतात? गेल्या तीन निवडणुकांमध्ये हे अंदाज किती खरे आणि किती खोटे ठरले?

२०१४ आणि २०१९ या दोन निवडणुकांमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं. २०१४ च्या निवडणुका ७ एप्रिल ते १२ मे २०१४ या कालावधीत घेण्यात आल्या, तर १६ मे रोजी निकाल जाहीर झाले. २०१९ च्या निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत घेण्यात आल्या. तर २३ मे रोजी मतमोजणी होऊन निकालांची घोषणा करण्यात आली.

२००९ च्या निवडणुकांवेळी काय होती एक्झिट पोल्सची स्थिती?
२००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय घडलं?
२००९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणीत यूपीएला बहुमत मिळालं होतं. त्या निवडणुकीत सरासरी चार एक्झिट पोल्सनं विजयी बाजूला मिळणाऱ्या जागा कमी दर्शवल्या होत्या. या एक्झिट पोल्सच्या सरासरी आकडेवारीनुसार यूपीएला १९५ जागा तर एनडीएला १८५ जागा वर्तवल्या होत्या. पण प्रत्यक्षात यूपीएला २६२ जागा तर एनडीएला १५८ जागांवरच विजय मिळवता आला. या जागांमध्ये काँग्रेस आणि भाजपाला अनुक्रमे २०६ आणि ११६ जागा मिळाल्या होत्या.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय घडलं?
१० वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही एक्झिट पोल्सचे आकडे काही प्रमाणात चुकले होते. पण त्यावेळी कोण जिंकणार, याचा अंदाज खरा ठरला होता. २०१४मध्ये सरासरी आठ एक्झिट पोल्सनं भाजपाप्रणीत एनडीएला २८३ जागा तर काँग्रेसप्रणीत यूपीएला १०५ जागांचा अंदाज वर्तवला होता. पण त्या वर्षी आलेल्या मोदी लाटेमुळे एनडीएला ३३६ जागा तर यूपीएला अवघ्या ६० जागा देशभरात मिळाल्याचं दिसून आलं. यापैकी अनुक्रमे भाजपाला २८२ तर काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी काय घडलं?
दरम्यान, २०१९ च्या निवडणुकांवेळीही एनडीएला मिळालेल्या जागांपेक्षा कमी जागा एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आल्या होत्या. पाच वर्षांपूर्वीच्या या निवडणूक निकालांआधी जाहीर झालेल्या सरासरी १३ एक्झिट पोल्समध्ये भाजपाप्रणीत एनडीएला ३०६ जागा तर काँग्रेसप्रणीत यूपीएला १२० जागा वर्तवण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात एनडीएला तब्बल ३५३ तर यूपीएला ९३ जागाच जिंकता आल्या. यापैकी अनुक्रमे भाजपाला ३०३ तर काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता.

Saturday, June 1, 2024

कराड शहर भाजपाध्यक्ष एकनाथ बागडी यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा ; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा ;


वेध माझा ऑनलाइन।
भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांचा वाढदिवस आज साधेपणाने साजरा करण्यात आला आज यांच्या वाढदिवसानिमित्त कराडच्या  वेणूताई चव्हाण उपजिल्हारुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले

एकनाथ बागडी हे सामान्य कुटुंबातुन राजकारणात आलेले व्यक्तिमत्व आहे मात्र जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने अप्लावधीत भाजप नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांना संपूर्ण राज्यात मानले जाते अजातशत्रू असेही त्यांचे व्यक्तिमत्त्व जिल्ह्याच्या राजकारणात राहिले आहे स्पष्टवक्तेपणा शिस्त आणि कर्तबगारी या त्यांच्या जमेच्या बाजू नेहमीच पहायला मिळतात राजकिय विरोधक देखील त्यांच्याविषयी सन्मानाने बोलतात ही त्यांची खरी राजकीय ताकद आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही दोस्तीच्या दुनियेतील अशा या राजा माणसाचा वाढदिवस साध्या पद्धतीने आज  साजरा करण्यात आला

याप्रसंगी भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद शिंदे,अनुसूचित शहराध्यक्ष विवेक भोसले,अल्पसंख्याक अध्यक्ष प्रितेंश मेहता,सरचिटणीस विश्वनाथ फुटाणे,केमिस्ट आघाडी अध्यक्ष,संजय शहा,महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा सोनवणे,राजश्री कारंडे,सुधीर कांबळे,संतोष कांबळे,सुनील नाकोड भास्कर टेळे इ पदाधिकारी हजर होते.

दरम्यान दक्षिण कराडचे नेते डॉ अतुल भोसले राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर आमदार जयकुमार गोरे शिवेंद्रसिंहराजे भोसले कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे श्री वेताळ जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह राज्यभरातील अनेक भाजप नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी आज त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत 

जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार ; शरद पवारांची साथ सोडणार ?दाव्याने खळबळ;

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूनच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये जाणार आहेत, त्यांनी त्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली आहे असा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला आहे. तर जयंत पाटील काँग्रेसमध्ये नक्कीच जाऊ शकतात असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही सुरज चव्हाण यांच्या दाव्यात हवा भरली आहे. आता यावर जयंत पाटील काय उत्तर देतात ते पाहायला हवं

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील. जयंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली आहे. त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे ४ जूननंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा रिकामा होईल आणि तिकडचे अनके लोक अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली पक्षप्रवेश करतील असं सुरज चव्हाण यांनी म्हंटल आहे. सुरज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.
दुसरीकडे , भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही सूरज चव्हाण यांच्या दाव्यात हवा भरली आहे. जयंत पाटील हे यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होते परंतु या बोलण्याला त्याठिकाणी अर्थ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भविष्य जयंत पाटील याना माहित आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटल.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडखोरीनतर अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली मात्र जयंत पाटील यांनी मात्र एकनिष्ठेने शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आजही जयंत पाटील हेच शरद पवार गटाकडून किल्ला लढवताना दिसतात. मात्र अधून मधून त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा प्रसारमाध्यमात सुरु असतात. यापूर्वी सुद्धा जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असून अमित शाह आणि त्यांची भेट झाली असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांनी या बातमीचे खंडन करत आपण कधीच शरद पवारांची साथ सोडणार नाही असं ठणकावून सांगितलं होते. आता सुरज चव्हाण यांच्या दाव्यानंतर जयंत पाटील काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

आज लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात वाराणसी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी  सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

सातव्या टप्प्यात केंद्रशासित प्रदेश चंदीगड, पंजाबमधील सर्व 13 लोकसभा, हिमाचल प्रदेशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6 आणि झारखंडमधील 3 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. ओडिशाच्या उर्वरित 42 विधानसभा जागांसाठी आणि हिमाचल प्रदेशच्या सहा विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकाही एकाच वेळी होणार आहेत. सातव्या टप्प्यात जवळपास 5.24 कोटी पुरुष, 4.82 कोटी महिला आणि 3574 हजार तृतीयपंथीसह एकुण 10.06 कोटी लोक आज मतदान करण्यासाठी पात्र आहेत. 

 दिग्गज  नेते मैदानात-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री राजकुमार सिंग आणि अनुराग ठाकूर हे रिंगणात आहेत. या टप्प्यात चार कलाकार रिंगणात आहेत, ज्यामध्ये कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हे देखील निवडणूक लढवत आहेत.

पुणे अपघात प्रकरण चिघळले ; आता मुलाच्या आईला देखील झाली अटक '


वेध माझा ऑनलाइन ।
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंबाचा पाय आणखी खोलात गेला आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला म्हणजेच शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवाल याना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे आधी वडील, मग आजोबा आणि आता आईला अटक झाल्याने अग्रवाल कुटुंबाभोवतीचा फास आवळला जात आहे.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते एका महिलेचं होतं. आता ते रक्त त्याची शिवानी अग्रवाल यांचं होतं का? हे आता चौकशीत समोर येईल. आधीच या रक्त बदलाच्या प्रकरणात ससून मधील २ डॉक्टरना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, भरधाव कारच्या धडकेत दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. मात्र आपल्या पोराचा गुन्हा लपवण्याच्या नादात अख्खं कुटुंबच पोलिसांच्या चौकशीत अडकलं आहे. सर्वात आधी मुलाच्या वडिलांना म्हणजे विशाल अगरवाल याना अटक करण्यात आली होती. त्यानंतर चालकाचे अपहरण आणि चालकाला धमकावल्याच्या आरोपाखाली मुलाच्या आजोंबाना म्हणजे सुरेंद्रकुमार अगरवाल याना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. आता ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. एकूणच काय तर मुलाच्या कारनाम्याचा फटका संपूर्ण अग्रवाल कुटुंबाला बसताना दिसत आहे.