वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल्सची चर्चा सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना पाहायला मिळाला. तसेच, अनेक राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमका निकाल काय लागणार? याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. त्यामुळेच शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर येणाऱ्या एक्झिट पोल्सकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण हे एक्झिट पोल्स किती खरे ठरतात? गेल्या तीन निवडणुकांमध्ये हे अंदाज किती खरे आणि किती खोटे ठरले?
२०१४ आणि २०१९ या दोन निवडणुकांमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं. २०१४ च्या निवडणुका ७ एप्रिल ते १२ मे २०१४ या कालावधीत घेण्यात आल्या, तर १६ मे रोजी निकाल जाहीर झाले. २०१९ च्या निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत घेण्यात आल्या. तर २३ मे रोजी मतमोजणी होऊन निकालांची घोषणा करण्यात आली.
२००९ च्या निवडणुकांवेळी काय होती एक्झिट पोल्सची स्थिती?
२००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय घडलं?
२००९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणीत यूपीएला बहुमत मिळालं होतं. त्या निवडणुकीत सरासरी चार एक्झिट पोल्सनं विजयी बाजूला मिळणाऱ्या जागा कमी दर्शवल्या होत्या. या एक्झिट पोल्सच्या सरासरी आकडेवारीनुसार यूपीएला १९५ जागा तर एनडीएला १८५ जागा वर्तवल्या होत्या. पण प्रत्यक्षात यूपीएला २६२ जागा तर एनडीएला १५८ जागांवरच विजय मिळवता आला. या जागांमध्ये काँग्रेस आणि भाजपाला अनुक्रमे २०६ आणि ११६ जागा मिळाल्या होत्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय घडलं?
१० वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही एक्झिट पोल्सचे आकडे काही प्रमाणात चुकले होते. पण त्यावेळी कोण जिंकणार, याचा अंदाज खरा ठरला होता. २०१४मध्ये सरासरी आठ एक्झिट पोल्सनं भाजपाप्रणीत एनडीएला २८३ जागा तर काँग्रेसप्रणीत यूपीएला १०५ जागांचा अंदाज वर्तवला होता. पण त्या वर्षी आलेल्या मोदी लाटेमुळे एनडीएला ३३६ जागा तर यूपीएला अवघ्या ६० जागा देशभरात मिळाल्याचं दिसून आलं. यापैकी अनुक्रमे भाजपाला २८२ तर काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला होता.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी काय घडलं?
दरम्यान, २०१९ च्या निवडणुकांवेळीही एनडीएला मिळालेल्या जागांपेक्षा कमी जागा एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आल्या होत्या. पाच वर्षांपूर्वीच्या या निवडणूक निकालांआधी जाहीर झालेल्या सरासरी १३ एक्झिट पोल्समध्ये भाजपाप्रणीत एनडीएला ३०६ जागा तर काँग्रेसप्रणीत यूपीएला १२० जागा वर्तवण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात एनडीएला तब्बल ३५३ तर यूपीएला ९३ जागाच जिंकता आल्या. यापैकी अनुक्रमे भाजपाला ३०३ तर काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता.
No comments:
Post a Comment