Friday, May 15, 2020

कृष्णा हॉस्पिटलमधून आज 3 जण झाले कोरोनामुक्त ; उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या हस्ते रुग्णांचा सत्कार

कराड, ता. 15
 येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच यावेळी कृष्णा हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांकडून 'कोरोना वॉरियर्स'ना मानवंदना देण्यात आली.

कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये कराड रुक्मिणीनगर येथील 28 वर्षीय महिला, मलकापूर येथील 55 वर्षीय महिला आणि वनवासमाची येथील 74 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

या सगळ्यांवर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांचे हॉस्पिटलच्या प्रांगणात आगमन झाल्यावर सुरक्षा रक्षकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये रुक्मिणीनागर कराड येथील 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे. कॉटेज हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी ही महिला दाखल झाली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यावेळी त्या महिलेला कॉटेजमधून कृष्णा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. आता ती कोरोनामुक्त झाली आहे. आज तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या काळजीमुळे मी पूर्णपणे बरी झाले असून, आता समाजाने आमच्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता, आम्हालाही आपल्यात सामावून घ्यावे, असे भावनिक आवाहन या महिलेने केले.


विलीगिकरण कक्षातील 2 व कोरोना केअर मधील 1 असे 3 जण आज पॉझिटिव्ह सापडले

सातारा दि. 15 (जिमाका)
 सातारा येथील बाधिताचे निकट सहवासीत म्हणून विलगीकरणात दाखल असलेले दोघे वय वर्षे 40 आणि 47 यांचे आणि मुंबई वरून  प्रवास करून आलेला कोरेगाव तालुक्यातील एक 29 वर्षीय युवक  11 तारखे पासून कोरोना केअर सेंटर मध्ये होता. या तिघांचे
अहवाल हे कारोनाबाधित आल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
29 वर्षीय युवक विनापरवानगी मुंबई येथून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते.
आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 128 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्णांची संख्या 65 आहे. तर कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण 61 असून कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.
000

सातारा जिल्ह्यातून आत्तापर्यंत 61 जण झाले कोरोनामुक्त ; आज 16 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 15 (जिमाका)
 क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक आरोग्य कर्मचारी, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथील 12 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 3 असे एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सध्या क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 26 असे एकूण 61 जण उपचार घेत आहेत. यापैकी 60 रुग्ण लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित एका रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.
*47 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह*
तसेच उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 6 व  क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 41 एकूण 47 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
*28 नागरिक विलगीकरण कक्षात*
क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 17, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 11 असे एकूण 28 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 62, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 61, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.
00000

श्री कालिका देवी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द

कराड
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कराड  यांच्या वतीने मुख्यमंत्री सहयत्ता निधी (कोविड 19) साठी रुपये १,००,००० चा धनादेश  महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.*

याप्रसंगी *नगरसेवक अरुण जाधव, अशोकराव चव्हाण सर, मुनिर बागवान(सावकार), डॉ.संतोष मोहिरे, शाम वेळापुरे, संजय मोहिरे, विवेक वेळापुरे* उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे.  सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्याबरोबर राज्यातून अनेक सामाजिक व्यवसायिक संघटना व व्यक्तिगत दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपूर्द करीत आहेत. त्याचप्रमाणे श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कराड यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधी कोविड 19 साठी रुपये १,००,००० चा धनादेश संस्थेचे  महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

Thursday, May 14, 2020

एक जण कोरोना बाधित ; 115 जण निगेटिव्ह

सातारा दि. 15 (जिमाका) : सातारा जिल्हा कारागृहातील निकट सहवासित 26 वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*115 जणांचा अहवाल निगेटिव्ह*
तसेच वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 99, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 14 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
*8 जण विलगीकरण कक्षात दाखल*
काल दि. 14 मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 78, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 45, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.

0000

कराडच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणीताई शिंदे यांच्या हस्ते कोरोना योध्याना रोगप्रतिकार करणाऱ्या आयुर्वेदिक काढ्याचे वाटप

अजिंक्य गोवेकर
कराड
कराड शहराच्या नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे यांच्या हस्ते आज गुरुवार  दिनांक 14 मे रोजी कराड नगरपालिकेच्या प्रांगणात कोरोना योद्ध्यांना प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदिक काढ़ाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे.

याप्रसंगी जनकल्याण समितीचे श्री संदीप कुलकर्णी, रा. स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांतजी एकांडे, सुखायु फाऊंडेशन चे अध्यक्ष वैद्य नचिकेत वाचासुंदर यांसह वैद्य संजय सबनीस, श्री देवदत्त फलटणकर तसेच नगरपालिका प्रशासनाचे विविध अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

या उपक्रमा अंतर्गत कराड व मलकापूर नगरपालिकेचे स्वच्छता दूत, सुरक्षा कर्मी, आरोग्य विभागाचे कर्मचारी , घरगुती गैस सिलेंडर वितरण व्यवस्थेमधील कर्मचारी या सर्व करोना योद्ध्यांना या काढ्याचे दररोज वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचे शहर व परिसरातून कौतुक होत आहे.इतरांनीही यातून आदर्श घ्यावा व असे उपक्रम राबवावेत अशा प्रतिक्रिया शहरातील लोकांनि व्यक्त केल्या आहेत.

कृष्णा हॉस्पिटल पाठोपाठ आता सह्याद्री हॉस्पिटल मधून देखील सहा जण झाले कोरोना मुक्त ; आज दिला डिस्चार्ज

सातारा दि. 14 ( जि. मा. का )
सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 6 कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.
 6 रुग्णांची 14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  6 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 6 जणांना आज घरी सोडण्यात आले. 6 कोरोना मुक्त झालेल्यांमध्ये 5 परिचारिका तर 10 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
  कोरोना मुक्त झालेल्या 6 जणांचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगिता देशमुख, सह्याद्री हॉस्पीटलचे संचालक अमित चव्हाण, वैद्यकीय प्रमुख व्यकंटेश मुळे या सर्वांनी  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी   परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 27 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 व सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 6 असे जिल्ह्यातील  एकूण 45 रुग्ण कारोना मुक्त  झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
0000