Sunday, March 19, 2023

विधानसभेला शिंदें गटाला भाजप देणार जोर का झटका ? बावनकुळें काय म्हणाले ? नंतर केली सारवासारव...

वेध माझा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार आहे. मात्र याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रसशेखर बावनकुळे यांच्या एका विधानामुळे भाजप आणि शिवसेना युतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला 240 जागा लढायच्या आहेत असं विधान बावनकुळे यांनी केलं. म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेची अवघ्या 48 जागांवर भाजप बोळवण करणार का? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र नंतर भाजपने सोशल मीडियावरून बावनकुळे त्यांचा हा व्हिडीओ हटवला आहे.

बावनकुळे नेमकं काय म्हणाले ?
भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मार्गदर्शन करताना थेट जागावाटपाचा आकडेच सांगितला. २०२४ मध्ये भाजपचे १५० ते १७० आमदार निवडून येतील. आपण २४० च्या आसपास जागा लढण्याच्या विचारात आहोत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५० पेक्षा जास्त आमदारच नाहीत. त्यामुळे आपण विधानसभा निवडणुकीत 235-240 जागा लढवल्या तर तेव्हा तुम्हाला खूप काम करावे लागेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. त्यामुळे शिंदे गटाला उरलेल्या ४९ जागांवरच समाधान मानावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला.
बावनकुळे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर सर्व अकाउंट वरून तो विडिओ हटवण्यात आला. दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी मी ते वक्तव्य केलं. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जागावाटपाचा कोणताही फॉर्मुला अजून ठरला नाही असं म्हणत बावनकुळे यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल असेही त्यांनी सांगितलं.

आता नवीन आजाराची दहशत ; आधी डोकेदुखी होते त्यानंतर इतर लक्षणं दिसतात आणि रुग्णाचा जीव जातो ...काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाईन - कोरोनाची वाढती प्रकरणं, त्यातर H3N2 चं थैमान आणि आता आणखी एका अज्ञात आजाराने टेन्शन वाढवलं आहे. या रहस्यमयी आजारामुळे सर्वांची झोप उडाली आहे. या आजारात सर्वात आधी डोकेदुखी होते त्यानंतर इतर काही लक्षणं दिसतात आणि रुग्णाचा जीव जातो. टान्झानियात या आजाराने दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत 5 बळी गेले आहेत.

पूर्व आफ्रिकेतील टान्झानियात अज्ञात आजारामुळे एकामागोमाग एक अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 7 रुग्ण आढळून आले आहेत. ही सर्व प्रकरणं कजेरातील आहेत. हा रहस्यमयी आजार काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहे. पण त्याचं गूढ अद्यापही डॉक्टरांना उलगडलेलं नाही.

या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला ताप येतो, त्यानंतर डोकेदुखी होते. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या मृत्यूपूर्वी तीव्र डोकेदुखी झाली आणि नाकातून रक्त आलं होतं.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार टान्झानियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तुमैनी नागू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सरकारने स्थानिक पथकासह या आजाराचा तपास सुरू केला आहे. तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की जर तुम्हाला कुणामध्ये अशी लक्षणं दिसत असतील तर त्यांच्यापासून दूर राहा आणि पॅनिक होऊ नका.
दरम्यान अशीच लक्षणं असलेले रुग्ण जुलै 2022 मध्येही सापडले होते. त्यावेळी तीन जणांचा मृत्यू झाला होता. नंतर हा लेप्टोस्पायरोसिस असल्याचं सांगण्यात आलं. जनावरांच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार पसरतो. यात उंदीर, गाय, डुक्कर आणि कुत्रे यांचा समावेश आहे.

Saturday, March 18, 2023

अक्षय मोहिते विरूद्ध मनीष रायते यांच्यातील लढत बरोबरीत* *आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान ; शंभरहून अधिक चित्तथरारक कुस्त्या.* (छायाचित्र आहे)

 माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काल कराड येथील बैलबाजार मैदानात झालेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांकाच्या अक्षय मोहिते विरूद्ध मनीष रायते यांच्यातील कुस्तीत बराच वेळ घमासान झाले. कुस्ती निकाली होत नसल्याने पंचांनी अखेरीस ती बरोबरीत सोडवली.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकराव चव्हाण, युवा नेते इंद्रजीत चव्हाण व राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात काल झाले. मैदानात शंभरहून अधिक चिमुकल्या मल्लांसह अनेक नामांकित पैलवानांनी चित्तथरारक कुस्त्या केल्याने शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील - उंडाळकर, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, अधिकराव चव्हाण, युवा नेते राहुल चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, गजानन आवळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नरेंद्र नांगरे - पाटील, प्रदीप जाधव, सुभाषराव पाटील, नितीन थोरात, अशोकराव पाटील - पोतलेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अधिकराव चव्हाण, राहुल चव्हाण, आनंदराव पाटील, नजरूद्दीन नायकवडी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. कुस्तीला सुरुवात होताच न थांबता व न थकता दोन मल्लांनी कुस्तीची लढत दिली. मनीष अक्षयवर सतत ताबा घ्यायचा. व अक्षय शिताफीने व चपळाईने मनीषचे डाव धुडकावून लावायचा. बराच वेळ कुस्ती निकाली होत नसल्याने अखेरीस पंचांनी कुस्ती बरोबरीत सोडवली.

दिग्विजय जाधव विरूद्ध बाबा रानगे यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत दिग्विजयने बाबा रानगेला घुटना डावावर आस्मान दाखवले. तिसऱ्या क्रमांकाची शुभम पाटील विरूद्ध भावेश सावंत यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली.

रणजीत राजमाने विरूद्ध सागर काळे यांच्यातील चौथ्या कुस्तीत रणजीतने सागरला एकचाक डावावर काही क्षणातच चितपट केले. पाचव्या कुस्तीतील सोहेब पटेल विरूद्ध अभिषेक घार्गे यांच्यातील कुस्तीत अभिषेक न आल्याने सोहेबला विजयी घोषित करण्यात आले. व सागर सावंत विरूद्ध संग्राम सुर्यवंशी यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

यावेळी भारत पवार, आकाश वेताळ, जगन्नाथ पावणे, आण्णा पाटील यांच्यासह मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या. संतोष जगताप, देवदास माने, जयकर खुडे, धनाजी पावणे, सतीश डांगे, मस्जिद पटेल, सतीश पानुगडे, शशिकांत घोडके, प्रशांत पाटील, युवराज पाटील, शंभूराज थोरात, गणेश माने, विनोद पाटील, दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सुरेश जाधव यांनी समालोचन केले.
--------------------

Friday, March 17, 2023

जत तालुक्यातील भाजपाचे नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या ; 3 ते 4 मारेकऱ्यांनी कट रचून यांची हत्या केल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाईन - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात भाजपाचे नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 3 ते 4 मारेकऱ्यांनी पूर्णपणे कट रचून ताड यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर लाड हे जखमी झाले होते पण तरीही डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय ताड हे आपल्या 4 वर्षांच्या मुलीला शाळेत आणण्यासाठी गेले होते. शाळेपासून 2 मिटर अंतरावर असताना दबा धरून बसलेल्या 3 ते 4 जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी ताड यांच्या इनोव्हा गाडीवर गोळी झाडली. पण ती गोळी लागली नाही. त्यामुळे ताड हे जीव वाचवत शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानावर पळत सुटले. तेव्हा मारेकऱ्यांनी त्यांच्या पाठलाग करून त्यांच्यावर मागून गोळीबार केला. त्यातील दोन गोळ्या ताड यांच्या पाठीत घुसल्या, दोन गोळ्या इतर ठिकाणी आढळून आल्या. एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्यात. गोळी लागल्यानंतर ताड जखमी झाले आणि जागेवरच कोसळले. पण त्यांचा जीव जात नसल्याचे पाहून मारेकऱ्यांनी भल्लामोठा दगड घेतला आणि त्यांच्या डोक्यात घातला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 मारेकरी असण्याची शक्यता आहे. दुचाकीवरून आलेले ताड यांच्या हत्येनंतर मारेकरी सांगोला मार्गाच्या दिशेनं पळून गेले. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सांगली पोलिसांची आता तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जत पोलिसांकडून खूनाचा आढावा घेतला आहे. तसंच तातडीने तपास करण्याच्या सूचना देत तीन पथके तयार करून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती बसवराज तेली यांनी दिली आहे.
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा खून केल्याचा प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून हल्लखोरांना लवकरचं ताब्यात घेतल्या नंतरच खुनाचे कारण स्पष्ट होईल,असे पोलीस अधीक्षक बसवराज तेल यांनी सांगितलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ येणार अडचणीत ? चित्रा वाघ यांची "ती' याचिका कोर्टाने फेटाळली ;

वेध माझा ऑनलाईन - भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याविरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयानं चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून लावली आहे. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात 50 लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या दाव्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत असून, त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कराडमध्ये २ एप्रिलला रंगणार कृष्णा मॅरेथॉनचा थरार ; भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ;

वेध माझा ऑनलाईन -  भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २ एप्रिल रोजी कराड येथे भव्य कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यदायी हृदयासाठी धावा’ असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे. 

कराड येथील शिवाजी विद्यालय येथे आयोजित ही मॅरेथॉन १४ वर्ष  वयोगटाखालील, तसेच १५ ते २०, २१ ते ३०, ३१ ते ४०, ४१ ते ५० आणि ५१ वर्षावरील वयोगट अशा विविध गटांत होणार आहे. ५ कि.मी. स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश फी, १० कि.मी. स्पर्धेसाठी ४०० रुपये प्रवेश फी व २१ कि.मी. स्पर्धेसाठी ५०० रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार असून, सहभागी स्पर्धकांना टायमिंग बिब, टी शर्ट, मेडल, नाष्टा, ई-प्रमाणपत्र यासह आरोग्यविषयक सपोर्ट दिला जाणार आहे.

१० कि.मी. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ३००० रु., २००० रु. व १००० रुपयांचे रोख बक्षीस; तर २१ कि.मी. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ५००० रु., ३००० रु. व २००० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://bit.ly/krishnarun2023 या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी अथवा सतीश चव्हाण (मोबा. ९७६६६०१६७७), ओंकार ढेरे (मोबा. ९०७५२२५६५३) किंवा प्रा. विशाल साळुंखे (मोबा. ९८२२६५४०५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

H3N2 आजारावर उपचार नाहीत ; काळजी घ्या, ; राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन -  महाराष्ट्रातही H3N2 फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्दी, खोकला आणि तापामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत इन्फ्लूएंझाच्या 361 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर येथे H3N2 इन्फ्लूएंझा रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. H3N2 वर उपचार नसल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.

'H3N2 वर उपचार उपलब्ध नाही, काळजी घ्या'
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात H3N2 इनफ्लूएंझा झपाट्याने पसरत आहे, मात्र नागरिकांनी घाबरुन जाऊ नका. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. महाराष्ट्रात H3N2 सह कोविडच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना
H3N2 इनफ्लूएंझा आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. या सर्व प्रकरणांवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आरोग्य विभागाची बैठक पार पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. 

H3N2 इनफ्लूएंझापासून बचाव कसा कराल?
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं की, H3N2 इनफ्लूएंझा या आजारावर औषध नाही. मात्र वेळीच फ्लूवरील उपचार घेतल्यास हा संसर्ग बरा होऊ शकतो. खासगी आणि सरकारी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या हवामानात मोठा बदल होत असून, ही चिंतेची बाब आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी लोकांना मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, हात धुणं आणि योग्य सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सर्दी, तापाची लक्षणे दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

H3N2 इनफ्लूएंझाचे देशात दहा बळी
H3N2 व्हायरल विषाणूमुळे महाराष्ट्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील इनफ्लूएंझाचा पहिला बळी कर्नाटकमध्ये झाला होता. त्यानंतर दुसरा मृत्यू हरियाणामध्ये झाला. दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्येही या व्हायरल फ्लूने एका रुग्णाने प्राण गमावले आहेत. आता देशातील इनफ्लूएंझा संसर्गाच्या मृत्यूची संख्या दहा झाली आहे.