Friday, March 17, 2023

जत तालुक्यातील भाजपाचे नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या ; 3 ते 4 मारेकऱ्यांनी कट रचून यांची हत्या केल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाईन - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात भाजपाचे नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 3 ते 4 मारेकऱ्यांनी पूर्णपणे कट रचून ताड यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर लाड हे जखमी झाले होते पण तरीही डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय ताड हे आपल्या 4 वर्षांच्या मुलीला शाळेत आणण्यासाठी गेले होते. शाळेपासून 2 मिटर अंतरावर असताना दबा धरून बसलेल्या 3 ते 4 जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी ताड यांच्या इनोव्हा गाडीवर गोळी झाडली. पण ती गोळी लागली नाही. त्यामुळे ताड हे जीव वाचवत शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानावर पळत सुटले. तेव्हा मारेकऱ्यांनी त्यांच्या पाठलाग करून त्यांच्यावर मागून गोळीबार केला. त्यातील दोन गोळ्या ताड यांच्या पाठीत घुसल्या, दोन गोळ्या इतर ठिकाणी आढळून आल्या. एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्यात. गोळी लागल्यानंतर ताड जखमी झाले आणि जागेवरच कोसळले. पण त्यांचा जीव जात नसल्याचे पाहून मारेकऱ्यांनी भल्लामोठा दगड घेतला आणि त्यांच्या डोक्यात घातला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 मारेकरी असण्याची शक्यता आहे. दुचाकीवरून आलेले ताड यांच्या हत्येनंतर मारेकरी सांगोला मार्गाच्या दिशेनं पळून गेले. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सांगली पोलिसांची आता तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जत पोलिसांकडून खूनाचा आढावा घेतला आहे. तसंच तातडीने तपास करण्याच्या सूचना देत तीन पथके तयार करून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती बसवराज तेली यांनी दिली आहे.
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा खून केल्याचा प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून हल्लखोरांना लवकरचं ताब्यात घेतल्या नंतरच खुनाचे कारण स्पष्ट होईल,असे पोलीस अधीक्षक बसवराज तेल यांनी सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment