Saturday, December 16, 2023

तेव्हा काहींनी फडणवीसांची जात काढली ; महिला आमदारांनी सांगितले फडणवीसांचे मराठा आरक्षणासाठीचे योगदान ;

वेध माझा ऑनलाइन।  राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रस्त्यावर आणि सभागृहात वातावरण तापलं आहे. अनेकदा या मुद्द्यावरुन, मुद्द्याआडून राजकारणही केलं जातं. त्यामुळेच, मराठा आरक्षणाच विषय अधिक गंभीर बनला असून एकीकडे सरकार आरक्षणा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत आहे. दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे, सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा सभागृहात चर्चेला आला आहे. यावेळी, बोलताना भाजपा आमदार श्वेता महाले यांनी मराठा आरक्षणासाठीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं योगदान सांगितलं.

आमदार श्वेता महाले यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात निघालेल्या ५८ मोर्चांचा संदर्भ देत मत मांडलं. ''मराठा आरक्षणासाठी जेव्हा मोर्चे निघाले, तेव्हा त्यांचे मनसुबे वेगळे होते. देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देऊच शकत नाही. त्यामुळे, आपण शांत राहा, केवळ आपली ताकद दाखवा, १०० टक्के फडणवीस सरकार अडचणीत येणार आहे. अध्यक्ष महोदय, त्या काळात फडणवीस साहेबांच्या जातीवरही काही लोकं गेले, केवळ जातीवरच नाही तर त्यांच्या वैयक्तिक कुटुंबापर्यंत गेले. मला सभागृहात शब्दही घेऊ वाटत नाहीत, इथपर्यंत काही नेत्यांनी बोलून दाखवलं,'' असे म्हणत आमदार श्वेता महाले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा काहींचा आकस विधानसभा सभागृहात बोलून दाखवला. 

हे सगळं राजकारण आहे, हे राजकारण कोण करंतय, हे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले, त्याला कोणी फंडींग केलंय हे सगळं महाराष्ट्राला कळतंय. कोणीही काहीही बोलून दाखवलं नाही. कारण, प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आणि प्रत्यक्षात ते कार्य त्यांनी करुन दाखवलं. त्यासाठी, मराठा समाजाच्या समन्वय समितीसोबत फडणवीस साहेब स्वत: मुख्यमंत्री असताना पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत बैठका घेत. हायकोर्टात हे आरक्षण टिकवण्यासाठी समन्यवकांसोबत चर्चा करुन युक्तीवाद कसा केला पाहिजे, कशारितीने हे आरक्षण हायकोर्टात टिकलं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच, हायकोर्टात आरक्षण टिकलं. म्हणूनच, २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला मराठा समाजाने मतदाररुपी आशीर्वाद दिला, असेही आमदार महाले यांनी विधानसभेत बोलताना म्हटले.

Friday, December 15, 2023

अनौपचारिक चर्चेत विधानसभा अध्यक्ष म्हणाले... ,ऐतिहासिक निकाल देणार’ , विकेट कुणाची पडणार? राज्यात चर्चा सुरू...

वेध माझा ऑनलाइन। ऐतिहासिक निकाल देणार, हे देशासाठी उदाहरण असेल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान दिली. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता विधानसभा अध्यक्ष कोणता निकाल देणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिलीये. 

सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी होत आहे. त्यातच आता आमदार अपात्रतेची सुनावणी ही अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आहे. विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात हा चेंडू असून त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय. सध्या राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्यासाठी मुदतवाढ सुप्रीम कोर्टाकडे मागितली होती. त्याची पूर्तता करत सुप्रीम कोर्टाने आता 10 जानेवारीपर्यंतचा वेळ विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. 

10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी मान्य केले  आहे. विधानसभा अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणीचा निर्णय 10 जानेवारीपर्यंत येईल असे सांगितले. यावेळी तुषार मेहता यांनी म्हटलं की, सकाळपासून विधानसभेचे कामकाज सुरू होईपर्यंत  आणि त्यानंतर संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत अध्यक्षांनी सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला आहे.  28 डिसेंबर 2023 पर्यंत सुनावणी पूर्ण होईल यात शंका नाही . विधानसभा अध्यक्षांना निवाडा करायला वेळ द्यायला हवा. यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी विरोध केला. अध्यक्ष सुनावणी पूर्ण करत आहेत त्यांना आदेश लिहायला आपण वाजवी वेळ द्यायला हवा, असं मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला. 

वेळापत्रकात बदल
शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने आमदार अपात्रता प्रकरणावर पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे. आता, अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. 12 डिसेंबर रोजी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष नोंदवण्यात आली. आता, 13 डिसेंबरपासून ते तीन दिवस अर्थात 15 डिसेंबरपर्यंत  लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मोठी बातमी! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित पर्वाचा अस्त

वेध माझा ऑनलाईन। मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.  हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांमध्ये मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधार होणार.. अशी चर्चा होती. पण आता मुंबईने यावर अधिकृत माहिती दिली आहे. 2013 पासून रोहित शर्माने मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा संभाळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावले होते.  

मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबईने दिलेल्या संधीचे हार्दिक पांड्याने सोने केले. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने शानदार कामगिरी केली. आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याला टीम इंडियातही संधी मिळाली. त्याने ही संधी दोन्ही हातानी घेतली. मागील काही महिन्यापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे भारतीय टी 20 संघाची धुराही दिली जातेय.

रोहित शर्मा मागील आयपीएलपासून एकही टी 20 सामना खेळला नाही. गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृ्त्वात मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच मुंबईने भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचे बोलले जाते. मुंबईच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी कौतुक केलेय.  मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईने हा निर्णय घेतलाय. 

 
 
 
 
 

आ पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून गरजूंना 21 लाखाची मदत ; कराड दक्षिण मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यासाठी पृथ्वीराजबाबांनी केली होती शिफारस :

वेध माझा ऑनलाइन। नेहमीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष देणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यासाठी शिफारस केली होती. आ. चव्हाण यांच्या शिफारशीनुसार २१ लाख १५ हजार रुपयांची गरजूंना मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथून याबाबतचे पत्र आ. चव्हाण यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.

सदरच्या पत्रात म्हंटले आहे की, १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी. अशी शिफारस असणारे पत्र मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आ. चव्हाण यांना दिले होते. गरजू रुग्णांची यादी व त्याप्रमाणे २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आ. चव्हाण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेत. त्यांनी गावोगावी विकासाचा निधी पोहचवत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवली आहे. विकासाबरोबर ते मतदरसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडे गतवर्षी गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी, याकरिता विनंती केली होती. सदरच्या गरजू रुग्णांची यादी जोडत आ. चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीसाठी शिफारस केली होती. यावर नुकतेच ना. शिंदे यांनी २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आ. चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. हा निधी प्राप्त झाल्याने गरजूंना मोलाची मदत होणार आहे.

चुलत्याचे मुंडके कुऱ्हाडीने तोडले, ते मुंडके घेऊन तो गाडीवरून गावभर फिरला ; वाचा काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन। सोलापूरमधील माढा तालुक्यात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी कुऱ्हाडीचे घाव घालून चुलत्याचा खून करून मुंडकं दुचाकीवर घेऊन एक माथेफिरू फिरत होता. त्याला अटक करण्यात आलीय. शिवाजी जाधव असं नराधमाचं नाव आहे. त्याने जमिनीच्या वादातून त्याचे काका शंकर जाधव यांचा खून केला. त्यांचं मुंडकं तोडून ते बाईकवर ठेऊन तो बाईकवर फिरत होता. अखेर अकलूज रोडवर माळीनगर इथे तो शरण गेला. या प्रकारामुळे माढा तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेय.

माढा तालुक्यातील शेवरे येथे जमिनीच्या तुकड्यासाठी एकाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, चुलत्याचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून करून मुंडके दुचाकीवर घेऊन तो गावभर फिरला. त्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या वादातून त्याने चुलत्याचे थेट मुंडके धडावेगळे केले आणि तेच मुंडके घेऊन तो दुचाकीवर फिरत होता . यानंतर त्याने अकलूज रोडवर माळीनगर येथे मुंडके व दुचाकी सोडून अकलूज पोलिसात शरण गेला. या प्रकाराने मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. 

शंकर प्रल्हाद जाधव (वय-65) (शेवरे, माढा) असे खून झालेल्या वृद्ध इसमाचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी नराधम शिवाजी जाधव या पुतण्याने हत्या केल्याचे समजताच त्याच्या तपासला विविध पथके पाठवण्यात आली. आता पोलिसांचा सासेमिरा चुकवणं अवघड असल्याचे लक्षात येताच या नराधमाने माळीनगर जवळ चुलात्याचे मुंडके आणि मोटार सायकल टाकून दिली. त्यानंतर अकलूज पोलीस ठाण्यात शरण गेला. दरम्यान अकलूज पोलिसांनी चुलत्याचे मुंडके , दुचाकी ताब्यात घेतले आहे. याबाबत मयताचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर (वय-२३) रा.कुरण वस्ती-शेवरे,ता.माढा याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या राजकीय भवितव्याचा निकाल संक्रांतीपूर्वीच लागणार!

वेध माझा ऑनलाइन।  मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर  सुप्रीम कोर्टाने  वेळ वाढवून देण्यात आली आहे. अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 डिसेंबर पूर्वी निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते.  मात्र निकाल लेखनाला लागणारा वेळ लक्षात घेता वेळ वाढवून द्या, अशी मागणी अध्यक्षांनी केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ न देता 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

 शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी मान्य केले  आहे. विधानसभा अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणीचा निर्णय 10 जानेवारीपर्यंत येईल असे सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या 31 जानेवारी पर्यंतच्या निर्णयावर कोणतेही भाष्य केलेले नाही. 10 जानेवारी किंवा 10 जानेवारीच्या आत शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय येणार आहे. शिवसेना संदर्भातील निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारी ही  डेडलाईन दिली आहे. 

काय झाले कोर्टात?

तुषार मेहता: सकाळपासून विधानसभेचे कामकाज सुरू होईपर्यंत  आणि त्यानंतर संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत अध्यक्षांनी सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला आहे.  28 डिसेंबर 2023 पर्यंत सुनावणी पूर्ण होईल यात शंका नाही . विधानसभा अध्यक्षांना निवाडा करायला वेळ द्यायला हवा

 ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी  विरोध केला

सरन्यायाधीश: अध्यक्ष सुनावणी पूर्ण करत आहेत त्यांना आदेश लिहायला आपण वाजवी वेळ द्यायला हवा. रिझनेबल टाईम म्हणजे किती असावा तुम्ही सांगा

सरन्यायाधीश: आम्ही 10 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत आहोत. अध्यक्षांना आदेश देण्यासाठी 10  जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत आहे.

विधानसभेत  अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत पूर्ण होणार आहे.  21 ते 31 डिसेंबर कालावधीत निकालाचे लेखन अशक्य आहे. निकालाचे लेखन करण्यासाठी मात्र  अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. एक हजारांहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे वाचन करण्याचे आवाहन विधीमंडळासमोर आहे. नागपूरवरून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठी ही वेळ लागणार आहे. परिणामी या पार्श्वभूमीवर  निकाल लावण्यासाठी अधिक वेळ मागण्यात आला होता.

Wednesday, December 13, 2023

शेतकरी अडचणीत असताना कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याच्या बांधावर जायला वेळ नाहीखासदार शरद पवार यांची कृषिमंत्री धनंजय मुंडेंवर पहिल्यांदाच टीका ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन।  शरद पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. अवकाळी झाली. पिके नष्ट झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण कृषीमंत्री शेताच्या बांधावर फिरकायला तयार नाही, असं शरद पवार यांना विचारण्यात आलं.

त्यावर शरद पवार यांनी मश्किल टिप्पणी केली. त्याचं उत्तर मी काय देणार? एक काळ असा होता की, त्यांच्या बद्दल निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला होता. पण ते आम्हाला सोडून गायब झाले. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.
शरद पवार हे चांदवडमध्ये होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीवर जोरदार टीका केली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कांद्याचं रोप कुजलेलं आहे. त्याचंही नुकसान झालं आहे. कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी आहे. सरकारचं धोरण धरसोड असेल तर त्याला जबरदस्त किंमत मोजावी लागते. आज ती अवस्था देशात झाली आहे. त्याची सर्वाधिक किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि सातारच्या काही भागाला हा फटका बसत आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

आज जेएनपीटी असेल किंवा अन्य पोर्ट असेल त्या बंदराच्या बाहेर माल येऊन थांबला आहे. काही माल परदेशात पाठवायचा आहे. पण किंमतीच्या धोरणामुळे निर्यात थांबली आहे. धोरण धरसोडीचं आहे. त्यामुळे इतर देश आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, असं सांगतानाच शरद पवार यांनी ते केंद्रीय कृषी मंत्री असतानाचा एक किस्साही सांगितला.

माझ्याकडे शेती खात्याची जबाबदारी होती.
श्रीलंकेला निर्यात करायची होती. तेव्हा कांद्याचं ज्यादा उत्पादन झाले होते. मी कोलंबला गेलो होतो. त्यावेळी राजपक्षे पंतप्रधान होते. आम्ही त्यांना सांगितलं आमच्याकडचा कांदा घेतला पाहिजे. ते विनम्रपणे म्हणाले, आम्ही घेणार नाही. मी विचारला का घेणार नाही? कांद्याची गरज नाही का? त्यावर ते म्हणाले, भारत सरकार लोकांचा दबाव आल्यावर निर्यात बंदी घालते. त्यामुळे आमच्या देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होतो. आमचे लोक आम्हाला शिव्या घालतात. त्यामुळे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही सतत धोरण बदलता. तुम्ही विश्वासू व्हा, असा किस्सा पवारांनी सांगितला. तसेच आपण विश्वास गमावत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली प्रतिमा चुकीची झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन अधिक होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यास सांगितलं. त्याला प्रोत्साहन द्यायलाही सांगितलं. असं असतानाही 7 डिसेंबर रोजी ऊसाचा रस आणि साखरेच्या सीरपवर केंद्राने बंदी घातली. त्यामुळे त्याची किंमत ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना मोजावी लागली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. त्यात नाशिकचा उल्लेख करावा लागेल, असंही ते म्हणाले.