Tuesday, September 30, 2025

साताऱ्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत 7 ऑक्टोबरला ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सभापती पदांची आरक्षण सोडत दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडणार असून, त्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, पंचायत समित्यांचे कार्यकाळ सुरु झाल्यानंतर अडीच वर्षांनंतर सभापती पदांचा फेरबदल होत असतो. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व 11 पंचायत समित्यांसाठी नवीन सभापती निवड प्रक्रियेसाठी ही सोडत काढण्यात येत आहे.

सोडतीची प्रक्रिया व नियमावली

ग्रामविकास विभागाने 9 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले आहे.

सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांसाठी खुला कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

सोडतीनंतर तत्काळ निकाल जाहीर करून पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समित्यांना सूचना दिल्या जाणार आहेत.

प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या (११ पदे)

अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला) – 1 पद

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – 2 पदे

नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला) – 1 पद

सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) – 3 पदे

सर्वसाधारण प्रवर्ग (खुला) – 4 पदे

एकूण: 11 पदे

महिला नेतृत्वासाठी सकारात्मक चित्र

साताऱ्यातील पंचायत समित्यांमध्ये महिला नेतृत्वासाठी मोठी संधी खुली झाली आहे. एकूण 11 पैकी 6 सभापती पदे महिलांसाठी आरक्षित असल्याने तालुकास्तरावर महिलांचा प्रभाव आणि सहभाग अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील ११ पंचायत समित्या

सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्या पुढीलप्रमाणे आहेत –

1. कराड
2. सातारा
3. कोरेगाव
4. खटाव
5. फलटण
6. माण
7. पाटण
8. वाई
9. महाबळेश्वर
10. जावली
11. खंडाळा
या सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीच ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

सभापती पदांचा तालुकास्तरावर राजकीय व विकासात्मक निर्णयांवर मोठा प्रभाव असतो.
आरक्षण सोडतीनंतर स्थानिक गटबाजी, नेत्यांचा वर्चस्व संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

काही पंचायत समित्यांत सत्ताधारी गटांना धक्का बसू शकतो, तर काही ठिकाणी विरोधकांना संधी मिळू शकते.
सोडतीत कोणत्या पंचायत समितीवर कोणता प्रवर्ग लागू होणार, याची उत्सुकता सर्व तालुक्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. अनेक पंचायत समित्यांमध्ये सभापती पदे गटबाजी, राजकीय समतोल व सत्ताधाऱ्यांच्या प्रतिमेवर अवलंबून असतात. त्यामुळे 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोडतीकडे केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर नागरिकांचेही डोळे लागले आहेत.


Saturday, September 27, 2025

.. चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू अस का म्हणाले अजितदादा... दादा पुन्हा चर्चेत, काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाईन।
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या थेट वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चुलत्या-पुतण्याचं मला नका सांगू असे म्हणत त्यांनी एका कार्यकर्त्याला थांबवले आणि यावर बोलण्यास महत्त्व न देण्याचे आवाहन केले. माध्यमांना २४ तास कार्यक्रम चालवण्यासाठी असे विषय लागतात, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या बदललेल्या भूमिकेवर बोलताना अजित पवारांनी सांगितले की, पूर्वी साहेब (शरद पवार) त्यांच्या चुकांवर पांघरूण घालायचे, पण आता सर्व काही स्वतःच सांभाळावे लागते. पक्षात कोणीही वाईट विधान करू नये आणि जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तींनाच पक्षात घ्यावे, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
दरम्यान पुणे येथे अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एका स्वच्छता करणाऱ्या आजीबाईंच्या ई-केवायसी संबंधित तक्रारीची दखल घेतली. सुरुवातीला काहीसे संतापलेले असले तरी, त्यांनी आजींची समस्या शांतपणे ऐकून घेतली आणि डीबीटीच्या पैशांसाठी ई-केवायसी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांचा हल्ला ; खळबळजनक प्रकार

वेध माझा ऑनलाईन
ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक प्रकार घडला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे. 

आज सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभा साठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला.

अभिनेत्यापासून नेते बनलेल्या विजय यांच्या सभेत प्रचंड गर्दी ; 33 लोक चेंगरून मृत्युमुखी ; अनेकजण पडले बेशुद्ध ;

वेध माझा ऑनलाईन
तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम (टी व्ही के)प्रमुख आणि अभिनेत्यापासून नेते बनलेले विजय यांच्या मोठ्या राजकीय सभेत प्रचंड गर्दी झाली. हजारो लोक जमल्याने परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यात किमान 33 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेकजण बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासली. या घटनेत 58 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गर्दीमुळे त्यात काही मुलेसुद्धा, काही लोक बेशुद्ध पडली. विजय यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं आणि “पोलिसांनी मदत करा” अशी हाक दिली. लोक बेशुद्ध पडल्यावर त्यांनी पाणी बाटल्या प्रेक्षकांत टाकल्या आणि रुग्णवाहिका बोलावून श्वास गुदमरलेल्या लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.

पुण्यात स्टेजवर जाऊन गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला : भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी कमालीच्या संतापल्या:

वेध माझा ऑनलाईन
देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. ठिकठिकाणी गराब आणि रास दांडियाचं आयोजन केलं आहे. तरुण आणि तरुणी गरबा खेळण्यात दंग आहे. पण पुण्यात मात्र गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी कमालीच्या संतापल्या.' आवाजाची मर्यादा आणि धार्मिकतेची बंधन ओलांडली आहे. त्यामुळे या पुढे या मैदानात असे कार्यक्रमात होऊ देणार नाही', असं म्हणत गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला.

पुण्यात ठिकठिकाणी नवरात्री निमित्ताने गरबा आणि दांडियाचं आयोजन केलं आहे. कोथरूडमध्ये गरब्याचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणांनी प्रचंड गर्दी केली. शुक्रवारी रात्री कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं. खुद्द भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची तक्रार पोलिसांकडे केली होती. पण, तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडला. त्यानंतर कार्यक्रमाच्या स्टेजवर जाऊन मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम बंद पाडला.

हवामान विभागाचा आज (दि 28 )मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा: कुठे दिलाय ऑरेंज अलर्ट ,आणि कुठे रेड अलर्ट ... वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन।
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने 28 सप्टेंबर रोजीही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पाहुयात 28 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथील नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कराडच्या मंगळवार पेठेतील चेतना पाटील यांना पीएचडी प्रदान ;

वेध माझा ऑनलाईन
कराडच्या मंगळवार पेठ येथील चेतना ज्ञानदेव पाटील (चव्हाण)याना नुकतीच शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली 

चेतना पाटील या मंगळवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांच्या भगिनी आहेत

डॉ विजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी संधीवात या विषयावर केलेल्या संशोधनासाठी ही पदवी त्यांना मिळाली त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे 
त्यांचे शिक्षण होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कुल एस जी एम कॉलेज तसेच कराड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, आप्पासाहेब बिरणाळे कॉलेज सांगली आणि डी वाय पाटील फार्मसी कॉलेज पिंपरी या ठिकाणी  झाले आहे
शांत आणि संयमी स्वभाव असणाऱ्या चेतना पाटील यांच्या या यशामुळे कराडचा गौरव वाढला आहे