वेध माझा ऑनलाईन - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या तीन जानेवारीपासून वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केलीय. याचपार्श्वभूमीवर दहावी-बारावी विद्यार्थ्यांचं परीक्षेआधी प्राधान्यानं लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी बोर्डासह शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे. महाराष्ट्रात 15 मार्चला इयत्ता दहावी आणि 4 मार्चला बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातून दहावी आणि बारावीचे 26 लाखांच्यावर विद्यार्थी बसणार आहेत.
राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार आहे. यामुळं इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचं प्राधान्यानं लसीकरण करावं, अशी मागणी बोर्डाकडून करण्यात आली. त्यानंतर शिक्षक आणि पालकांनी सुद्धा बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी केलीय.
राज्यात बोर्ड परीक्षेच्या कामात सहभागी होणाऱ्या दोन ते अडीच लाख शिक्षकांना प्राधान्यानं बूस्टर डोस देण्यात द्यावा, जेणेकरून बोर्ड परीक्षा सुद्धा सुरळीत पार पडतील असं शिक्षकांचं म्हणणे आहे. राज्यातील साधारणपणे 26 लाख विद्यार्थी हे दरवर्षी दहावी बारावी बोर्ड परीक्षा देतात. त्यामुळं परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं लसीकरण होणं गरजेचं आहे, असंही मत शिक्षकांनी मांडलंय. दरम्यान, मुंबई महापालिकेनं शाळांकडून 15 ते 18 वयातील विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. विद्यार्थीसुद्धा लस घेण्यासाठी तयार आहेत. तसेच लसीकरण सुरू केल्यास पालकांच्या संमतीनं प्रशासनाच्या सहकार्यानं शाळेत लस देण्यास सुद्धा शाळा तयार आहेत.
No comments:
Post a Comment