कराड
काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. उद्या चव्हाण विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा असून 28 डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद कुणाकडे देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काँग्रेसमधून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, यात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव या पदासाठी फिक्स झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.
आ पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय कारकीर्द...
1991-1995, 1995-1998 या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. ते कराड लोकसभा मतदारसंघातून तीनदा विजयी झाले आहेत. त्यांना सायन्स व टेक्नॉलॉजीच्या मंत्रालयाचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 1992-93मध्ये ते इलेक्ट्रॉनिक अॅटोमिक एनर्जी मंत्रालयाचे सल्लागार सदस्य होते. 1994-1996मध्ये त्यांनी विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन खात्याच्या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. 1998-99मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2002मध्ये त्यांची पुन्हा राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अर्थ नियोजन समितीचे सल्लागार सदस्य, संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सल्लागार सदस्य म्हणून काम पाहिले होते. 2000-2001मध्ये ते काँग्रेसचे प्रवक्तेही होते. त्यानंतर 2004 ते 2009पर्यंत ते पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते.
पृथ्वीबाबांनी 11 नोव्हेंबर 2010 रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 28 एप्रिल 2011 रोजी ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. चार वर्षे ते मुख्यमंत्रीपदी होते. 26 सप्टेंबर 2014 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
No comments:
Post a Comment