Thursday, December 30, 2021

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता...

वेध माझा ऑनलाईन - भाजपला सिंधुदुर्गात खूप मोठा झटका बसला आहे. सेशन कोर्टाने भाजप आमदार नितेश राणे  यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टात गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब  यांच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. विशेष म्हणजे कोर्टाने याप्रकरणी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

कोर्टाची सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "हायकोर्टात जाण्याचा नक्कीच एक पर्याय आहे. आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ. शक्यतो आम्ही हायकोर्टातच जाऊ. मोबाईल फोन जप्त करायचे आहेत. त्यासाठी कस्टडीची गरज असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं आहे. या व्यतिरिक्त कोणतंही कारण सांगितलेलं नाही. हायकोर्टात याप्रकरणी उद्या अर्ज दाखल करु. मध्ये शनिवार-रविवार सुट्टी असल्याने निश्चितच सोमवारी किंवा मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी होईल. अटकपूर्व जामीनासाठी आम्ही कोर्टात अर्ज केला आहे. त्यामुळे आम्हाला अटकेपासून दूर राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे. हायकोर्टात जायचं नसेल तर आमच्याकडे सरेंडर होण्याचा पर्याय आहे. याशिवाय नितेश राणे यांनी पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. यापुढेदेखील आम्ही मदत करु", असं वकील संग्राम देसाई यांनी सांगितलं

No comments:

Post a Comment