Thursday, December 30, 2021

राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याबाबत अजितदादांनी दिले संकेत...

वेध माझा ऑनलाईन-कोरोनाचा धोका जास्त वाढल्याने महाविकास आघाडी सरकार आता कडक पाऊल उचलणार आहे. राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोरोना बाधित आणि कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध कडक करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळले नाही तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यानंतर कोविड नियमाबाबत पुढेचे पाऊल उचलण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी कडक नियम करण्याचे संकेत दिलेत.
मुंबई, पुण्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी लागेल. राजकीय नेत्यांनीही कोविड नियमांचं पालन करणे गरजेचे, असे अजित पवार म्हणाले. तसेच जोपर्यंत कोरोनाचे संकट दूर होत नाही तोपर्यंत महापालिका निवडणूक न घेण्याचा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतला आहे.
कोरोनाच्या केसेस वाढल्या नंतर निर्बंध हे कडक करावेच लागतील. संसर्ग आधीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे .केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. ओमायक्रोनचा समूह संसर्ग सुरू झालाय, अशी चर्चा आहे. मात्र त्याबद्दल ठोस माहिती नाही. या विषयात तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment