वेध माझा ऑनलाइन - कराड नगर परिषदेचे कर्मचारी अनिरुद्ध लाड यांच्या कुटुंबीयांची माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्याच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने तातडीने दहा लाख रूपयांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन देत कुटुंबातील सदस्याला सेवेत घेण्याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर तातडीने निर्णय घेण्याबाबत सूचना करू असेही त्यांनी कुटुंबीयांना आधार देत सांगितले. तसेच जखमी कर्मचारी अमोल चंदनशिवे यांना सुद्धा उपचार खर्च पूर्णपणे शासनाने करावा अशा स्पष्ट सूचना मुख्याधिकारी यांना आ. चव्हाण यांनी यावेळी दिल्या. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सचिव प्रदीप जाधव, कराड शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, इंद्रजीत गुजर, फारूक पटवेकर, अशोकराव पाटील, इंद्रजित चव्हाण, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून सफाई कामगार शहराच्या स्वास्थ्यसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असतात अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना मानसिक व आर्थिक आधार देण्याची गरज असल्याचे हि यावेळी आ. चव्हाण यांनी सांगितले. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. सफाई कामगारांना योग्य ते प्रशिक्षण देण आवश्यक तर आहेच तसेच आधुनिक यंत्रणा नगरपरिषदेला देण्यात याव्यात याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment