Monday, September 19, 2022

रेठरे बुद्रुक येथील कृष्णाघाटाच्या सुशोभीकरणाला मिळणार पुन्हा चालना ; डॉ. अतुल भोसले यांनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट...

वेध माझा ऑनलाइन - रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदी घाटाच्या सुशोभीकरणासाठी भाजप सरकारच्या काळात सन २०१९ मध्ये मंजूर करण्यात आलेला २ कोटी ८ लाखांचा निधी, नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. हा निधी पुन्हा मिळावा, या मागणीसाठी आज भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी मुंबई येथे पर्यटनमंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. त्यावेळी ना. लोढा यांनी हा निधी पुन्हा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याने, रेठरे बुद्रुक येथील कृष्णाघाटाच्या सुशोभीकरणाला पुन्हा चालना मिळणार आहे.

रेठरे बुद्रुक गावातून वाहणारी कृष्णा नदी ही गावासाठी जीवनदायिनी आहे. या नदीशेजारी असणाऱ्या घाटाला ऐतिहासिक महत्व असून, घाटावर असणाऱ्या विविध देवतांच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असतात. कराड आणि वाळवा तालुक्याच्या मध्यावर असणाऱ्या या गावातील सुसज्ज नदीघाटावरील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी नदीघाटाचे सुशोभीकरण आवश्यक होते. या अनुषंगाने डॉ. अतुल भोसले यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत रेठरे बुद्रुक येथील नदीघाटाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव राज्याचे तत्कालीन पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे दाखल केला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सन २०१९ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २ कोटी ८ लाख रूपयांचा निधी रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीच्या घाट बांधकामासाठी व सुशोभीकरणासाठी मंजूर केला होता. त्यानुसार प्रत्यक्ष कामालाही प्रारंभ झाला होता. मात्र त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा निधी रद्द केल्याने, अनेक वर्षे हे काम रखडले आहे. या कामाला पुन्हा चालना देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा निधी मंजूर करावा, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी ना. लोढा यांच्याकडे आज केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, हा निधी पुन्हा मंजूर करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही ना. लोढा यांनी डॉ. भोसले यांना दिली. यामुळे आता लवकरच नदीकाठी विकासकार्य सुरू होऊन, रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीघाटावरील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रेठऱ्याच्या पर्यटनाला मिळणार चालना

रेठरे बुद्रुक हे गावाला मोठी ऐतिहासिक परंपरा असून, कृष्णा नदीमुळे या गावाचे स्थान पर्यटनदृष्ट्याही अत्यंत महत्वाचे आहे. नदीघाटाच्या सुशोभीकरणामुळे रेठरे बुद्रुकच्या पर्यटनाला चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल.
- डॉ. अतुल भोसले
सदस्य, भाजपा प्रदेश कार्यकारिणी


No comments:

Post a Comment