वेध माझा ऑनलाइन - कराड शहर व तालुक्यातील शिवशंभु प्रेमींनी कराडात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा सुरू असून सोमवार दिनांक २६ रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर या भव्य स्मारकाच्या प्रतिकृतीचे (क्ले मॉडेल) अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती स्मारक समितीचे सचिव रणजीत पाटील यांनी दिली.
कराड शहरातील जुन्या भेदा चौकात हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाची उंची ५५ फूट नियोजित आहे. त्यासाठी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करून त्या समितीच्या वतीने शासन स्तरावर सर्व विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. या स्मारक उभारणीच्या सर्व परवानगी मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान हे स्मारक कसे असावे याबाबत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. त्याचे अनावरण सोमवार दिनांक २६ रोजी सकाळी११:३० वाजता अर्बन बँकेच्या शताब्दी सभाग्रहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याबरोबरच स्मारक समितीने गेले वर्षभर केलेल्या कामाची माहिती तसेच नियोजित स्मारक उभारणीचा संकल्प याची माहिती कराड शहर व तालुक्यातील तमाम शिवशंभू भक्तांना व्हावी यासाठी या कार्याची चित्रफीत कार्यक्रम स्थळी उपस्थितांना दाखवण्यात येणार आहे. यात सर्व कामाचा आढावा घेण्यात येणार आहे .
कराड शहर व तालुक्यातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रतिकृतीचे अनावरण होणार आहे. कराड तालुक्यातील सर्व शिवशंभू प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने रणजीत( नाना) पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment