वेध माझा ऑनलाइन - बँकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पंकज मल्टीपर्पज हॉल येथे बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव आणि सर्व संचालकांसह सभासदांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती.
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पूर्वार्धामध्ये कोरोनाची तीव्रता कमी झाली आणि यामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यवसायांना पुन्हा गती मिळाली असली तरी व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी वर्षातील मोठा कालखंड खर्ची पडला. यामुळे मार्च - २०२२ अखेर संपलेल्या वर्षातील एकंदर वाटचाल समाधानकारक राहिली असून बँकेने एकूण व्यवसाय रू. ४५५२ कोटींचा टप्पा दिमाखदारपणे पार केला आहे. यामध्ये रू. २८६९ कोटींच्या ठेवी तर रू. १६८३ कोटींची कर्ज व्यवसाय आहे. बँकेस रू.४६ कोटीचा ढोबळ तर ९.३१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच चालू वर्षात भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी. आर. ए. आर) १६.९१% इतका राखून बँकेने आपली सक्षमता व सदृढता कायम राखली असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले. ज्या सभासदांची भागधारण रक्कम रू. १,५००/- पेक्षा कमी आहे त्या सभासदांनी किमान रू. १,५००/- चे भागधारण करणे आवश्यक आहे तसेच ज्या सभासदांचे बँकींग व्यवहार सुरू नाहीत. अशा सभासदांनी बँकींग व्यवहार सुरू ठेवावेत व बँकेच्या यशस्वी वाटचालीत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी केले.
कराड अर्बन बँकेच्या भविष्यकालीन वाटचालीच्या दृष्टीने आणि नवीन पिढीला बँक संचलनाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचे धोरण अवलंबत नवीन १२ व्यक्तींना जून- २०२२ मध्ये सुरू झालेल्या संचालक मंडळ निवडणूकीच्या प्रक्रियेद्वारे नवीन संचालक मंडळामध्ये स्थान देण्यात आले आहे. १७ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट असले तरी शासनाच्या आदेशान्वये अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे निवडणूका सप्टेंबर-२०२२ अखेर स्थगित केली आहे. ऑक्टोंबर - २०२२ मध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येणार असून संचालक मंडळाच्या कामकाजावरील विश्वास सभासदांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. अशी कृतज्ञता अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी व्यक्त केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी नोटीस वाचन केले. सभेपुढे संचालकांनी सादर केलेल्या सर्व विषयांना सभासदांनी मान्यता देवून सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
No comments:
Post a Comment