Saturday, September 2, 2023

कृष्णा कारखान्याकडून पुढील ऊसबिल प्रतिटन १०० रुपये जाहीर ; चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार वर्ग

वेध माझा ऑनलाइन।  रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन २०२२-२३ या हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे पुढील ऊसबिल देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. 

कृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने सन २०२२-२३ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. या हंगामात कारखान्याने १३० दिवसांमध्ये १० लाख ६० हजार मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, ११ लाख ८० हजार क्विंटल साखर पोती निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.६१ टक्के इतका राहिला आहे.

कृष्णा कारखान्याने यापूर्वी शेतकऱ्यांना ३००० रुपयांचे ऊसबिल अदा केले आहे. तर आता पुढील ऊसबिल प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

उदयनराजेंकडून उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवारांचे तलवार भेट देत अभिनंदन ; विविध विषयांवर केली चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन। राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल पवारांचे तलवार भेट देत अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्हयामध्ये जुन्या असलेल्या ब्रिटिशकालीन धोकादायक पुलांच्या ठिकाणी नवीन पर्यायी पूल उभारणी करण्याची मागणी यावेळी उदयनराजेंनी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल पवारांचे तलवार भेट देत अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्हयामध्ये जुन्या असलेल्या ब्रिटिशकालीन धोकादायक पुलांच्या ठिकाणी नवीन पर्यायी पूल उभारणी करण्याची मागणी यावेळी उदयनराजेंनी केली.
उदयनराजे भोसले यांनी अजितदादा पवार यांच्या भेटीवेळी अनेक मुद्यांवर चर्चा केली. यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा करत त्यांनी काही महत्वाच्या मागण्याही केल्या. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनवाढीसाठी खूप मोठा वाव आहे निसर्गाने सातारा जिल्ह्यावर मुक्तहस्त उधळण केली आहे पर्यटन वाढीच्या माध्यमातून स्थानिकांना व गरजूंना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा व स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकतो असे उदयनराजे भोसले म्हणाले.
यावेळी अजितदादांच्या भेटीदरम्यान कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर उदयनराजेंनी चर्चा केली. संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती पाहता व धरणांतील पाण्याचा साठा लक्षात घेता योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवणे गरजेचे झाले आहे यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे उदयनराजे म्हणाले.

उंब्रज येथे सेगमेंटल उड्डाण पुलासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची नितीन गडकरींकडे आग्रही मागणी

वेध माझा ऑनलाइन ।  कराड तालुक्यातील उंब्रज या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या भागातील जनतेच्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. 

उंब्रज हे कराड तालुक्यातील वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ असून एक विकसित गाव आहे. या गावाची लोकसंख्या २५ हजार च्या आसपास आहे. तसेच आसपासच्या ७० ते ८० गावांच्या मध्यवर्ती असलेले हे गाव आहे. उंब्रज येथे मुख्य बाजारपेठ असून विविध सोयी सुविधा या गावात आहेत. या गावातून राष्ट्रीय महामार्ग गेला असून सद्या भराव पूल येथे आहे. हा भराव पूल गावाच्या मधोमध झाल्याने गावाचे दोन भाग झाले आहेत. यामुळे येथील बाजारपेठेचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच याच रस्त्यावर असलेला बस स्थानक वापरा अभावी पडून आहे. येथील नागरिक बस साठी राष्ट्रीय महामार्गावर उभा राहतात त्यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत तसेच भराव पुलाखालील व आसपास वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्गावरील जुना भराव पूल काढून त्याठिकाणी नवीन सेगमेंटल उड्डाण पूल उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असून या उड्डाण पुलासाठी आग्रही राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

आज कराड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने कराडात आंदोलन ; प्रशासनाला दिले निवेदन ; ...अन्यथा, 15 दिवसानी आंदोलन तीव्र करणार ; प्रशासनाला दिला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन।  जालना येथील अंतरवेली सराटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आता राज्यात ठिकठिकाणी आंदोलने तसेच बंदची हाक देण्यात येत आहे.  कराड तालुका मराठा सकल समाजाच्यावतीने शहरात आज निषेध आंदोलन करण्यात आले

यावेळी प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे या काळात आंदोलकांवर टाकलेल्या केसेस मागे घ्याव्यात तसेच आंदोलकांवर लाठीहल्ला करणाऱ्या संबधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा 15 सप्टेंबरनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने आज कराडात देण्यात आला

दरम्यान आज दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन सरकारचा व प्रशासनाचा निषेध नोंदवला तसेच लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली प्रशासकीय इमारत मार्गावर मोर्चाही काढण्यात आला.  प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलकांनी ठिय्या मांडत प्रशासनाला रस्त्यावर बोलवून निवेदन दिले लोकांनी आज बंद ठेवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Friday, September 1, 2023

मराठा आंदोलकांवरच्या हल्ल्याची जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

वेध माझा ऑनलाईन। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा  निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

यापुढे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे.

मराठा आरक्षण देण्याबाबत भाजप ने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे.

मराठा बांधवांच्यावर आज झालेला लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आम्ही करत आहोत.

मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मग ते सर्वोच्च न्यायालयांमध्ये का टिकल नाही याची कल्पना सर्वानाच ; या विषयावरून विरोधकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ नये ; फडणवीसांचा टोला ;

वेध माझा ऑनलाईन। 
आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असेल तर त्यांना घेऊन रुग्णालयात दाखल केले पाहिजे. आंदोलनस्थळावरील लोकांनी शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सरकारने भूमिका घेतली आणि प्रशासन आज पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. दुर्दैवाने आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत जवळपास अधिकाऱ्यांसहित 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. मग त्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज मध्ये कोणीही गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारची काळजी घेण्यात आली. जर लाठीचार्ज झाला नसता तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागला असते.असेही फडणवीस म्हणाले आहेत
दरम्यान मी मुख्यमंत्री असताना तर मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मग हे सर्वोच्च न्यायालयांमध्ये ते आरक्षण का टिकल नाही याची सर्वांना कल्पना आहे असंही फडणवीस म्हणाले... तसेच या विषयावरून विरोधकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ नये असेही फडणवीसांनी विरोधकांना म्हटले आहे

आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः समिती तयार केलेली आहे ती त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि ज्या वेगवेगळ्या मागण्या आल्या त्यावर सुद्धा काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. म्हणून मला सर्वांना आवाहन करायच आहे की मराठा आरक्षण संदर्भात सरकार गंभीर असल्यामुळे कोणीही कायदा आपल्या हाती घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.  या संपूर्ण घटनेची चौकशी देखील केली जाणार असून कोणाचीही चूक असेल तर निश्चितपणे त्याच्यावर ही कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. सगळ्यांनी शांतता पाळण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले. राजकीय पक्षांनीदेखील वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ नये असेही फडणवीसांनी विरोधकांना म्हटले.

जालन्यात मराठा मोर्चावर लाठीचार्ज, फडणवीसांचं नाव घेत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...

वेध माझा ऑनलाईन। जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. यानंतर संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केल्याचंही समोर आलंय. पोलिसांच्या लाठीचार्जवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज एका वृत्त वाहिनीशी बोलत होते 

शरद पवार म्हणाले, “मला जालन्यातून एक दोन लोकांचे फोन आले आणि त्यांनी तिथं काय घडलं ते सांगितलं. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला. त्या चर्चेत सगळं शांततेत सुरू होतं. मात्र, चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करून त्यांना तिथून हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न केला गेला.”
“यात आंदोलकांवर प्रखर लाठीहल्ला केला. खरं म्हणजे एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, हल्ली अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि ते उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी,” असा आरोप शरद पवारांनी केला.
शरद पवार पुढे म्हणाले, “राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. हे चित्र जालन्यात दिसलं आहे. यात पोलिसांना काय दोष द्यायचा. पोलिसांना वरच्या पातळीवरून अशा सूचना आल्या आणि त्यांनी कामगिरी केली. यामुळे पोलीस आणि तरुणांमध्ये कारण नसताना कटुता वाढली. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारला आणि गृहखात्याची जबाबदारी असणाऱ्यांची आहे.”