Sunday, September 3, 2023

अजितदादा बोलायला उठले, आणि देवेंद्र फडणवीस निघून गेले...काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचीही तिथे स्वाक्षरी लागेल, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम स्वाक्षरी नंतर तो निर्णय अंमलात येईल, असा नियम शिंदेंनी बनवला. याशिवाय अजित पवार यांनी साखर कारखान्यांबद्दल काढलेला जीआर देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करत नवा जीआर काढला. कारण त्या जीआरमुळे भाजपचे अनेक नेते अडचणीत आले होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आजही आहे.या दोन घटनांमुळे महायुतीत एकमेकांवर कुरघोडी केली जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच जाहीरपणे भाष्य केलं आहे. महायुतीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “अजित दादा बोलायला उभे राहिले आणि देवेंद्र फडणवीस निघून गेले, अशाप्रकारची बातमी होऊ नये यासाठी मी स्पष्टीकरण देतो. नेवीचे चीफ महाराष्ट्रात आले होते. आपण डिफेन्स मॅनिफॅक्चुरिंगसाठी त्यांची वेळ मागितली होती. नेमकी त्यांची वेळ साडेतीनची आल्यामुळे मी 15 मिनिट त्यांची वेळ घेऊन परत आलो”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

ही फेविकॉलची जोड आहे’
“आताच्या परिस्थितीत आपल्या विरोधकांच्या माध्यमातून एकच गोष्ट चालली आहे. तुम्ही कुणाची मनधरणी करु शकणार नाही तर त्यांना गोंधळात टाका, असा विरोधकांचा प्रयत्न सुरु आहे. एक विसंवाद तयार करण्याचा प्रयत्न, कुठेतरी वाद सुरु आहे, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे आपण समजून घेतली पाहिजे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व मित्रपक्ष सर्वांची फेविकॉलची जोड आहे ती सहजासहज तुटणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमच्यात पूर्ण संवाद’
“पेपरमध्ये कधीतरी वाचायला मिळतं याने त्याच्यावर कुरघोडी केली, याने त्याच्या संदर्भात असं सांगितलं. तुम्ही त्यांची काळजी करु नका, मुख्यमंत्री, मी आणि अजित दादा आमच्यात पूर्ण संवाद आहे. पूर्ण एका विचाराने आणि एका दिशेने आम्ही चाललो आहोत. सर्व निर्णय एकत्रितपणे घेतोय. शंभर टक्के समन्वय आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमची परिस्थिती इंडिया आघाडीसारखी नाही. 
या मंचावर आलेल्या कुणालाही प्रश्न पडला नाही की माझी जागा कुठे आहे. समोर बसलेले दिग्गजांनाही वाटलं नाही की आपली जागा कुठे आहे?”, अशी टीका फडणवीसांनी केली.


उद्या कराडच्या सोमवार पेठेत राबवले जाणार शासन आपल्या दारी अभियान ; आरोग्य शिबिराचेही आयोजन ; युवा नेते अजय पावसकर मित्र परिवाराच्या वतीने केले आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना कराड व परिसरातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी उद्या ( सोमवार दि 4 रोजी ) सोमवार पेठेतील नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय याठिकाणी सकाळी  ९-०० ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत “ शासन आपल्या दारी ” हे अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती युवा नेते अजय पावसकर मित्र परिवाराने दिली आहे . 

सोमवार पेठेतील युवा नेते अजय विनायक पावसकर यांनी या अभियानाचे आयोजन केले असून मा श्री डॉ अतुलबाबा भोसले यांच्या शुभहस्ते या योजनेचे उदघाटन होणार आहे विक्रम पावसकर(बाबा) (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य) धैर्यशील कदम(सातारा जिल्हाध्यक्ष भाजपा) विनायकपावसकर(आण्णा) (ज्येष्ठ नगरसेवक कराड नगरपरिषद कराड) मा श्री एकनाथ बागडी (शहर अध्यक्ष भाजपा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे
या अभियानामध्ये रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती , सिटी सर्व्हे उतारा आणि नकाशा व फेरफार , प्रधानमंत्री किसान योजना माहिती , सर्व प्रकारचे दाखले, सात बारा उतारे, फेरफार, जन्म-मृत्यू दाखले , बचत गट स्थापना , प्रधानमंत्री आवास योजना इ. , नवीन वीज कनेक्शन, मीटर दुरुस्ती, वीज बिल तक्रार निवारण,  ड्रायव्हिंग लायसन्स, विवाह नोंदणी, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती,संजय गांधी निराधार योजना, मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती , आयुष्यमान  भारत कार्ड काढणे व इतर सरकारी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना आणि सुविधा यांचा लाभ घेता येणार आहे.

वरील सुविधांबरोबरच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून  रक्तदाब, मधुमेह, आणि नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. सोमवार दि. दिनांक ४ सप्टेंबर २०२३   सकाळी  ९-०० ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत हे अभियान सुरू असणार आहे. 
जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी होऊन शासनाच्या वेगवान अंमलबजावणीचा लाभ घ्यावा असे आवाहन अजय  पावसकर मित्र परिवाराने केले आहे 

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल :

वेध माझा ऑनलाइन। काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी  यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानं सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील  सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडियाच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यापूर्वी मार्चमध्येही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना ताप येत होता. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बऱ्या होऊन ती घरी परतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस दलाने सतर्क रहा ; पालकमंत्री देसाई यांच्या पोलिसांना सूचना ; घेतला जिल्हा पोलीस दलाचा आढावा ;

वेध माझा ऑनलाइन।  जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दलाने सतर्क राहावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. 

सातारा पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, सहायक पोलीस अधीक्षक मिना यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करून पालकमंत्री देसाई म्हणाले, समाज माध्यमांमधून अफवा पसरवल्या जातात त्यावर विशेष लक्ष ठेवावे. समाजामध्ये शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहचवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. 
बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक शेख यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.

Saturday, September 2, 2023

पालकमंत्री देसाई आणि उदयनराजे यांची भेट ; मराठा आरक्षण संदर्भात झाली चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च  न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. 

यावेळी पालकमंत्री देसाई व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये पालकमंत्री देसाई यांनी न्यायालयामध्ये सुरू असलेली प्रक्रिया या विषयी माहिती दिली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजला देण्यात येणाऱ्या सवलतींविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. 

यावेळी मराठा समाजाने शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व आरक्षणाच्या बाबत शासनास सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्री देसाई व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च  न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. 

शरद पवार आंदोलनकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत ; मराठा आरक्षण घालवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा राजीनामा पवारांनी का घेतला नाही ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा समाज आरक्षणावरून पेटलेल्या घटनेचा राजकीय लाभ उठवत आहेत. आंदोलनकर्त्यांना ते भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शरद पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारही नाही. आरक्षण घालवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा त्यांनी घ्यायला हवा होता, असा प्रति टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

पुण्यात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जालना जिल्ह्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या अहवालात नेमके काय असेल ते स्पष्ट होईलच. मात्र, त्यापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना शांतता ठेवावी. यापूर्वी मराठा आरक्षण संदर्भात काढण्यात आलेल्या ५८ मोर्चांमध्ये शांतता कायम राहिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोग नेमून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे लढवला. याबाबत त्यांनी सकारात्मक आणि खंबीर भूमिका घेतली होती, म्हणूनच आरक्षण मिळाले होते. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीने हे आरक्षण घालविण्याचे काम केले. आता तीच मंडळी राजकारण करत आहेत. महाविकास आघाडीचे नेते नकारात्मक भूमिका घेऊन आंदोलनकर्त्यांना भडकावत आहेत. हा राजकीय श्रेयाचा मुद्दा नाही. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर आहे. रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र बंदला सरकारचा विरोध नाही. मात्र, विरोधी पक्षांनी राजकारण थांबवावे.

शरद पवार यांनी जालना येथील घटनेसंदर्भात गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर विखे यांनी पवार यांना, ज्या महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण घालविले त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा का घेतला नाही, असा प्रति सवाल केला. यावेळी विखे यांनी पवार यांच्यावर आंदोलनकर्त्यांना भडकावीत असल्याचा आरोप केला. दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पवार आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना भडकावत आहेत. त्यांनी त्यांना आधार देण्याची गरज आहे. फडणवीस यांचा राजीनामा घेण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. हे आरक्षण घालवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच राजीनामा त्यांनी का घेतला नाही असा संवाल त्यांनी या वेळी केला. आरक्षण गेल्यानंतर पवार त्यावेळी का गप्प राहिले, सोयीची घटना असल्यास ते बोलतात. जालन्यातील घटनाही त्यांच्यासाठी सोयीची असल्याने ते आता राजकारण करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पवार यांचा हा पारंपारिक स्वभाव असल्याचे त्यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात संसदेच्या येत्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने वटहुकूम जारी करावा, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली. त्यावर विखे म्हणाले, हा केंद्र व राज्य सरकारचा प्रश्न असून त्यांनी त्यात नाक खुपसू नये. आरक्षण का गेले याचा खुलासा त्यांनी करावा. ठाकरे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. आरक्षणासंदर्भात नेमलेल्या वकिलांची फी तसेच कागदपत्रे देखील तत्कालीन सरकारने पुरवली नाहीत,  आरोप वकिलांनीच केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच प्रायश्चित्त करावे. 

महाविकास आघाडीचे नेते बोलघेवडे असून त्यांनी प्रश्न सोडविण्याऐवजी पेटवण्याचे काम केले आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तोडगा काढायला सरकार तयार ; आंदोलने थाबवा ; मराठा आरक्षण मुद्यावरून अजितदादांचे आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन।  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. तसेच, मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्या, बांधवांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.  

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तात्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राहिल, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करुया, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले.