Sunday, June 9, 2024

मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे गटाच्या खासदाराला फोन ;अजितदादा गटाला मंत्रिपद नाही?काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
दिल्लीत एनडीएने सरकार स्थापनेसाठी जोरदार तयारी केली आहे. आज 9 जूनरोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी 3.0 सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन करण्यात आले आहेत.

अशात महाराष्ट्रातील कुणा-कुणाला मंत्रिपद दिलं जाणार, याबाबत सर्वांचंच लक्ष लागून होतं. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रामधून पाच जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यांचा समावेश झालाय, त्यांना दिल्लीतून फोन केले जात आहेत यामध्ये महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर, आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीत मंत्रीपदाच्या यादीत एकनाथ शिंदे गटाला देखील संधी मिळाली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रि‍पदासाठी फोन केला असल्याचं म्हटलं जातंय दुसरीकडे अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांना अजूनही फोन आला नाहीये. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. पण, अजूनही त्यांच्यात कुणालाही मंत्रिपदाबाबत फोन आलेला नाही.

अजित पवार गटाला मंत्रीपद नाहीच?
त्यामुळे शिंदे गटाला तर जागा मिळाली पण, अजित पवार गट अजूनही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आहे. रायगड येथे अजित पवार गटाचा उमेदवार जिंकून आला आहे. पण, मोदींच्या मंत्रीमंडळात  अजूनही या गटातील कुणालाच संधी देण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

दरम्यान महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे.

Friday, June 7, 2024

गिरीश महाजन होणार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन  ।
 लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. फडणवीस हे आपल्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे तर मग महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असणार ...हा  सवाल आता उभा आहे मात्र भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्रीपदी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत. महाजन यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ओळख आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे अधिकृत निर्णय काय येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शशिकांत शिंदे का पडले ? जयंत पाटलांनी सांगितलं कारण ...

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह होते.तर निवडणूक आयोगाकडे त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी हे खुले चिन्ह होते. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला. परिणामी,संपूर्ण राज्यात पिपाणीला दीड लाख मते गेली असून,साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हच कारणीभूत आहे असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले... आमच्या पक्षात निवडून आलेल्या आठ खासदारांपैकी बहुतांश खासदार नवे चेहरे आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही अधिकाधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

Thursday, June 6, 2024

साताऱ्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना लाखाची लाच घेताना सांगलीत अटक ;

वेध माझा ऑनलाइन
६० लाखाच्या अनुदानासाठी एक लाख रुपयांची लाच घेत असताना सातारा जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे यांना बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात सांगलीत अटक केली. त्यांच्यासोबत धनादेशसाठी १० हजार लाच मागणी केल्याबद्दल एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदार यांच्या संस्थेस शासनामार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमांना नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत ५९ लाख ४० हजाराचे अनुदान मंजूर करण्यात आलेले होते. सदर अनुदानाचा पहिला हप्ता २९ लाख ७० हजार रूपये शाळेस अदा करण्यात आलेला असून सदर रक्कम दिलेचा मोबदला म्हणून १० टक्के व दुसरा हप्ता २९, हजार ७० हजार रूपये देणेसाठी १० टक्के असे एकुण  सुमारे ६ लाख रूपये लाचेची मागणी अनुदान मंजूर करण्यासाठी केली असल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती.

Wednesday, June 5, 2024

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबतचे पवार साहेबांचे वक्तव्य राष्ट्रवादीबद्दल नव्हतं, तर इतर पक्षांबद्दल होत ; रोहित पवारांचे कराडात वक्तव्य ;

वेध माझा ऑनलाइन।
बच्चा बडा हो गया है!’ असे आपण ट्विट केले आहे. नेमके हे तुम्हाला कोणाला सांगायचे आहे? असा प्रश्न विचारताच बच्चा म्हणून ज्यांनी आम्हाला या निवडणूक प्रचारात हिणवले होते. त्यांच्यासाठी माझे ते मत आहे. आता तर लोकांनी आम्हाला पाठिंबा देऊन निकालातून दाखवून दिले आहे की बच्चा कोण आहे ते. आम्ही तर स्वतःला आजही कार्यकर्ता समजतो. पण युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. असच मला सांगायचे आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना चांगलीच चपराक दिली दरम्यान  शरद पवार यांनी राज्यातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नव्हतं तर ते इतर पक्षांबद्दल होत असंही रोहित पवार यावेळी म्हणाले...त्यामुळे इतर पक्षाची भूमिका काय हे असेल हे सांगण्याचा अधिकार पवार साहेबांना आहे का? अशी आता चर्चा आहे...
दरम्यान  लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार परतीच्या वाटेवर आहेत. तर ११ ते १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी  यावेळी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या लोकसभेतील यशानंतर आ. रोहित पवार यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, यु्वा नेते सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजित पाटणकर, प्रशांत यादव, मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार बटाणे,जशराज पाटील, सौरभ पाटील आदिंची उपस्थिती होती. 

रोहित पवार म्हणाले की, अजित पवार राष्ट्रवादीत आता एकटेच राहतील बाकी 12 ते 13 जण भाजपसोबत जातील आणि उर्वरित आमदार आमच्या सोबत येतील. याबाबत लवकरच कळेल. साताऱ्यात आमचा उमेदवार हा विजयी झाला असता, तो निवडून येणारच, या विचारात व विश्वासात आम्ही होतो.कारण आम्ही पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललो होतो. उदयनराजे भोसले यांचा विजयी झाला. ते जिंकले त्याबद्दल व्यक्तिगत मी त्यांना शुभेच्छा देतो पण पार्टी म्हणून आम्हाला ते पटलेलं नाही. कारण ज्या पार्टीने नेहमी महाराष्ट्राला पाण्यात बघितले. खाली आणण्याचा प्रयत्न केला. पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भाजप यांचा या ठिकाणी विजय होणं हे या परिसराला पटणार नाही, पण जी काही कारणे असतील त्याचा नक्कीच अभ्यास करावा लागेल, असे रोहित पवार यांनी म्हंटले
यशवंतराव चव्हाण यांचे विचार हे फोटो लावून मिळत नसतात. खऱ्या अर्थाने ते विचार जपावे लागतात कि ते पवार साहेबांनी जपले आहेत. त्यामुळे अनेकवेळा महत्वपूर्ण जो दिवस असतो त्यावेळेला मी व पवार साहेब त्यांच्या परिवारातील लोक या ठिकाणी येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. तत्व हे चव्हाण साहेबांची महत्वाचे होतेच. संतांनी सुद्धा तत्वाचे महत्व आपल्या सर्वांना सांगितले आहे. त्या तत्वाच्या गोष्टी चव्हाण साहेबांनी जपल्या. पवार साहेब देखील त्या गोष्टी जपत आहेत. म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते त्या गोष्टी जपत आहोत. फोटो लावून तत्व आत्मसात केले जाऊ शकत नाहीत त्यासाठी संघर्ष करावा लागतो, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार व भाजपला लगावला.
बारामतीकरांनी आत्याला निवडून दिलं आणि काकीला नाकारलं यावर रोहित पवार म्हणाले, बारामतीकरांनी आजपर्यंत विचाराला पाठिंबा दिला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना आजपर्यंत बारामतीकरांनी पाठिंबा दिला आणि भाजपच्या विचाराला नाकारलं आहे. भाजपकडून प्रत्येक ठिकाणी महापुरुषांच्या विचारांचा अवमान होत गेल्यामुळे त्यांना महाराष्ट्राने दाखवून दिला आहे.
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पराभवबद्दल व सुप्रिया सुळे यांच्या यशाबद्दल रोहित पवार यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खरे सांगायचे झाले तर या ठिकाणी विचाराची हार झाली हे महत्वाचं आहे. भाजपने जो प्रयत्न केला होता. कुटुंब फोडून पुरोगामी विचार कुठेतरी पायाखाली तुडवायचा. ते लोकांनी होऊ दिलेले नाही विचार जिंकला हे आमच्यासाठी जास्त महत्वाचे असल्याचे रोहित पवार म्हणाले.

पराभवाची जबाबदारी माझी, उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा ; वरिष्ठांना फडणवीसांनी केली विनंती;

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यांनी भाजपचा पराभव का झाला? त्याचे कारणे माध्यमांना सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.  नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.

देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे सांगताना म्हटले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात महत्वाचा ठरला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला. तसेच विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो.शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूस याचे दर कमी झाले. त्यानंतर आम्ही मदत केली. परंतु आचारसंहितेमुळे तो निर्णय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नेऊ शकलो नाही असेही ते म्हणाले .

शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरवात ; 25 जून पर्यंत अर्ज स्विकारणार : पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ.के,एम बागवान यांची माहिती :

वेध माझा ऑनलाइन।
दहावीच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर राज्यातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. अभियांत्रीकी डिप्लोमाच्या प्रथम वर्षासाठी 29 मे पासून ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून 25 जून पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्याता व आसपासच्या विद्यार्थांसाठी कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ.के.एम.बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने 2024-25 शैक्षणीक वर्षासाठी होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, उप प्राचार्य जयश्री पाटील, प्रवेश समितीचे अध्यक्ष रजनीस पिसे, प्रा.आनंद पेंढारकर, प्रा.ज.ल.गवांडे, प्रा.एस.जे.माने, प्रा.स्वाती साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. बागवान म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील एकुण 17 पॉलिटेक्नीक मध्ये जवळपास 4 हजार विद्यार्थांची प्रवेश क्षमता आहे. यासाठी जिल्ह्यात एकुण 11 प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सदरची प्रवेश प्रक्रिया हि केंद्रीभूत पद्धतीने होत असल्याने संपुर्ण राज्यातील तंत्रनिकेतनसाठी एकच अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थांना ऍप व लिंक उपलब्द करूण देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थांना संगणक अथवा मोबाईलवर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
 कराडचे शासकीय तंत्रनिकेतन हे 1957 मध्ये स्थापन झाले असून येथे सिव्हिल, कॉम्प्यूटर, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशन, इंस्टुमेंशन, मेकॅनिकल, व मेकॅट्रॉनिक्स आदी अभ्यासक्रम शिकवले जातात. संस्थेतील इलेक्ट्रीकल व कॉम्प्यूटर या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय पातळीवरील एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांना पात्र विद्यार्थांसाठी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्द आहेत. विद्यार्थांसाठी सुसज्ज प्रयोग शाळा, संगणक व इंटरनेट सुविधा, सर्व शाखेत तज्ञ व अनुभवी प्राद्यापक वर्ग, जिमखाना तसेच क्रिडा स्पर्धा, अद्यावत ग्रंथालय, विद्यार्थी सहकारी भांडार, विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची सोय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.