Monday, September 25, 2023

पंकजा मुंडेना केंद्राचा झटका ; पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त ;

वेध माझा ऑनलाइन। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे यांनी राज्यात नुकतीच शिवशक्ति परिक्रमा यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. या यात्रेतून त्यांनी राजकीय शक्तिप्रदर्शन केल्याच्या चर्चा रंगत असतानाच केंद्राकडून त्यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता केंद्रीय जीएसटी विभागाने जप्त केली आहे.

सन 2014 साली राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यातच त्यांचा चिक्की घोटाळा देखील गाजला. त्यामुळे पंकजा मुंडे बॅकफुटवर गेल्या होत्या. दरम्यान सन 2019 साली पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर विधान परिषदेवर त्यांना घेतले जाईल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र विधान परिषदेवर देखील त्यांना संधी मिळाली नाही. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय पातळीवर सचिवपद देण्यात आले.
मात्र राज्यातील राजकारणातून पंकजा मुंडे यांना दूर करण्याचे प्रयत्न होत असल्याची कार्यकर्त्यांची धारणा होती. पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात स्थान मिळत नसल्याने कार्यकर्ते सभांमध्ये आक्रमक होत असत. त्यातच नुकतीच पंकजा मुंडे यांनी राज्यात शिवशक्ति परिक्रमा यात्रा काढून राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. यावेळी राज्यात कार्यकर्ते, समर्थकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान पंकजा मुंडे याच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारवाई केली आहे. मागील एप्रिल महिन्यात जीएसटी आयुक्तालयाने कारखान्यावर छापे टाकले होते. त्यानंतर आज कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कारखान्याने बेकायदा 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणी जीएसटी आयुक्तालयाकडून चौकशी सुरु होती.

तांबवेत मुस्लीम समाजाच्यावतीने श्री गणेशाची आरती ; तांबवेतील उपक्रम आदर्शवत ; पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर ;

वेध माझा ऑनलाइन। हिंदु-मुस्लीम समाजाचे समाजाचे एेक्य कायम रहावे या हेतुने तांबवे (ता. कराड) येथील संगम गणेश मंडळाने राबवलेला उपक्रम सातारा जिल्ह्यासह राज्यासमोर आदर्श ठेवणार आहे. प्रत्येक मंडळाने असे उपक्रम राबवल्यास भविष्यात समाजीक सलोखा बिघडणार नाही असे प्रतिपादन पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांनी केले. 

मुस्लीम समाज आणि पोलिस उपाधिक्षक ठाकुर यांच्यावतीने तांबवेतील संगम गणेश मंडळाच्यावतीने आरती घेण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. 

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील, राष्ट्रीय खेळाडु प्राची देवकर, अथर्व ताटे, डॉ. एम. एन. संदे, शंकर पाटील, आनंदराव ताटे, बी. बी. शिंदे, तात्यासाहेब पाटील, गुणवंत पाटील, वसंत बाबर यांच्यासह गावातील ग्रामस्थ, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिस उपाधिक्षक ठाकुर म्हणाले, पुसेसावळी तांबवे गावापासुन खुप दुर नाही. ती घटना व्हायरल झाली. अनेक अफवा उठवल्या गेल्या. ती घटना ताजी असतानाच तांबवेत मुस्लीम समाजाच्यावतीने श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन केले जाते ही खुप मोठी गोष्ट आहे. हा उपक्रम जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी आदर्शवत आहे.

यावेळी किरपे येथील राष्ट्रीय खेळाडु प्राची देवकर आणि तांबवेतील अथर्व ताटे यांचा पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या दोन खेळाडुंनी गावचे नाव राज्यपातळीवर पोहचवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना यापुढे सहकार्य करु अशी ग्वाही यावेळी पोलिस उपाधिक्षक ठाकुर यांनी दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील, डॉ संदे यांनी मंडळाच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. अॅड. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. हेमंत पवार यांनी आभार मानले.

कराडच्या मनोऱ्यास कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांची भेट ;

वेध माझा ऑनलाइन। कराड शहरात अनेक एतिहासिक वास्तू आहेत. त्यामध्ये सर्वाधिक एतिहासिक जामा मशीद येथील मनोरे आहेत या मनोऱ्यास आज कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मनोऱ्यामध्ये सर्वात वरच्या मजल्यापर्यंत जाऊन पाहणी केली. तसेच एतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा व त्याच्या डागडुजी संदर्भात माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी जामा मस्जिद ट्रस्टचे प्रमुख अल्ताफ शिकलगार मझहर कागदी साबीरमिया व इतर मान्यवर उपस्थित होते. पुरातन वास्तुशास्त्र आणि इतिहास हा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचा अभ्यासाचा विषय आहे. तसेच प्राचीन व मध्ययुगीन वास्तु शैली यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यामुळे आपल्या शहरातील पुरातन वास्तू जतन करणे यासाठी त्यांनी ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा व त्याच्या डागडुजी संदर्भात माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

मनोरा संदर्भात बैठकीमध्ये सर्व मान्यवरांनी मनोरा वास्तू जतन करण्यासंदर्भात आपली मते व्यक्त केली व त्याकरिता पुढील उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. हा उपक्रम शहरातील सर्व ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भात हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व इतिहास प्रेमी व आवड असणाऱ्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे तसेच मदत करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

अजित पवार गटाकडून ऑफर्स येत आहेत ; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा ;

वेध माझा ऑनलाइन। २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी आठ आमदारासह राष्ट्रवादीत बंड करून राज्य मंत्रीमंडळात स्थान मिळवले. यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गट फोडण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून ऑफर्स येत आहेत, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे हे रावेर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार मानले जातात.

‘मला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा अजित पवार यांच्या वतीने फोन आला होता आणि त्यांनी मला त्यांच्या गटात येण्यास सांगितले होते. मी शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याने मी त्यांना  सोडणार नाही; असे मिटकरी यांना बोललो होतो,’ असे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.

खडसे हे ४० वर्ष भाजपामध्ये होते. शिवसेना भाजपा सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. नंतर ते राज्याचे विरोधी पक्षनेतेही होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांचे खच्चीकरण करण्यात आले होते. पक्षात डावलले जात असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी २०२० मध्ये भाजपा सोडून राष्ट्रवादीची वाट धरली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड झाली

या मुद्द्यावर भाष्य करताना, खडसेंचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन म्हणाले, ‘खडसे अजित पवारांच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला समजले, पण माझा त्यांना सल्ला आहे की शरद पवारांना सोडू नका. त्यांनी ज्येष्ठ पवारांच्या सोबत राहावे.’ अजित पवार आणि इतर आठ आमदार या वर्षी जुलैमध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक/ अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पक्ष फुटला नसून आमचीच  खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दोन्ही गट सांगत आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतून रावेर लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी उभे केले जाण्याची शक्यता आहे. सध्या या मतदार संघाच्या खासदार त्यांची सून रक्षा निखिल खडसे या आहेत. एकनाथ खडसे यांचे जळगाव जिल्ह्यात प्रस्थ आहे. त्यामुळेच की काय रक्षा खडसे दोनदा या लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या आहेत. आता सासरा (एकनाथ खडसे ) यांना रावेर लोकसभेची जागा मिळाल्यावर सून (रक्षा खडसे) निवडणूक लढवणार का, हे पहावे लागणार आहे. पण भाजपने यंदा राज्यातील ४८ पैकी ४८ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा चंग बांधला असताना रक्षा खडसे यांना भाजपा तिकीट देणारच, त्यामुळे खडसे कुटुंबात आगामी काळात काय राजकारण होणार हे पहावे लागणार आहे.

Sunday, September 24, 2023

कराडचे भाजपचे युवा नेते दीपक पाटील यांचा वाढदिवस दणक्यात साजरा ; भाजपचे कराड दक्षिणचे नेते डॉ अतुल भोसले यांच्याकडून दीपक पाटील यांना खास शुभेच्छा ;

वेध माझा ऑनलाइन। कराड येथील सोमवार पेठ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शहरातील भाजपचे  युवा नेते दीपक पाटील यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कराड दक्षिण चे भाजप चे नेते डॉ अतुल भोसले यांनी सोमवार पेठेतील दीपक पाटील यांच्या बाल गणेश मंडळ येथे येऊन भेट देऊन तेथील मंडळाच्या गणेश आरतीला उपस्थीती लावत दीपक पाटील यांना शुभेछ्या दिल्या व त्यांचे अभिष्टचिंतनही केले
सोमवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते व शहरातील भाजप चे युवा नेते दीपक पाटील यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला श्री बाल गणेश मंडळाचे उपाध्यक्ष पदावर राहून ते आपले सामाजिक कार्य करत आहेत त्यांचा मित्रपरिवार आणि लोकसंग्रह खूप मोठा आहे त्यांनी गेली दहावर्षे विविध आरोग्य शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक विषयक उपक्रम राबवत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे भाजप च्या शहरातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग दिसला आहे दक्षिण चे भाजप नेते डॉ अतुल भोसले यांच्याशी त्यांचे खूप जवळचे सम्बन्ध आहेत कराडच्या सोमवार पेठे पाण्याची टाकी परिसरातून यावेळी होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी ताकदीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे 

आज त्यांचा वाढदिवस सोमवार पेठ पाण्याची टाकी परिसरात दणक्यात साजरा झाला दिवसभर शहरातील भाजप सहित अनेक राजकीय नेत्यांनी व मान्यवरांनी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या येथील बाल गणेश मंडळाच्या गणेश आरतीसाठी तसेच मंडळाचे सर्वेसर्वा युवा नेते दीपक पाटील याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास डॉ अतुल भोसले उपस्थित राहिले त्यांनी दीपक पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी देखील त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

छगन भुजबळांनी केला मोठा गौप्यस्फोट ; म्हणाले...रोहित पवारांनी मंत्रीमंडळात जायचं असा निर्णय घेत सह्या केल्या... :

वेध माझा ऑनलाईन।   अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं, असा निर्णय घेत या पत्रावर सह्या केल्या असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. विरोधी पक्षात असल्यावर हे बोलायला पाहिजे, नाहीतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कसं सिद्ध होईल? यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील  संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्यासह इतर आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर अनेक घडामोडी समोर आल्या. मात्र गेल्या काही दिवसात रोहित पवार आणि अजित गटातील नेत्यांचा संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले. काही नेत्यांचा ब्लॅकमेलिंग सुरू आहे तू सही कर नाहीतर काम होणार नाही, असं कदाचित सांगितलं जात असा आरोप रोहित पवार यांनी केला. यावर भुजबळ यांनी रोहित पवार यांचा समाचार घेत मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह सगळ्यांच्या सह्या पत्रावर करण्यात आल्या होत्या, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे. 


भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखांची बैठक ;

वेध माझा ऑनलाइन। भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. कराड दक्षिण मतदारसंघातील ३०८ बुथचे प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते.

व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, मुकुंद चरेगावकर, अजय पावसकर, प्रदीप जाधव उपस्थित होते.

डॉ. भोसले पुढे म्हणाले, की भाजपच्या पक्ष संघटनेत बूथ प्रमुख हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. बूथ समितीने केलेल्या दमदार कामामुळेच गुजरात निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या होत्या. हाच विचार मध्यवर्ती स्थानी ठेवून भाजपाने देशभरात बूथ सशक्तीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ प्रमुखांनी गावागावात पक्ष संघटन अधिक मजबूत करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या योजना, तसेच राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी बूथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांनी कंबर कसावी.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील यांनी पक्ष संघटनात्मक वाढीसाठी महत्वपूर्ण सूचना बूथ प्रमुखांना केल्या. तसेच सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चंद्रकांत कणसे व शैलेश गोंदकर यांचा सत्कार करण्यात आला. एकनाथ बागडी यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी कराड दक्षिण मतदारसंघातील बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.