Monday, September 25, 2023

तांबवेत मुस्लीम समाजाच्यावतीने श्री गणेशाची आरती ; तांबवेतील उपक्रम आदर्शवत ; पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर ;

वेध माझा ऑनलाइन। हिंदु-मुस्लीम समाजाचे समाजाचे एेक्य कायम रहावे या हेतुने तांबवे (ता. कराड) येथील संगम गणेश मंडळाने राबवलेला उपक्रम सातारा जिल्ह्यासह राज्यासमोर आदर्श ठेवणार आहे. प्रत्येक मंडळाने असे उपक्रम राबवल्यास भविष्यात समाजीक सलोखा बिघडणार नाही असे प्रतिपादन पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांनी केले. 

मुस्लीम समाज आणि पोलिस उपाधिक्षक ठाकुर यांच्यावतीने तांबवेतील संगम गणेश मंडळाच्यावतीने आरती घेण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. 

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील, राष्ट्रीय खेळाडु प्राची देवकर, अथर्व ताटे, डॉ. एम. एन. संदे, शंकर पाटील, आनंदराव ताटे, बी. बी. शिंदे, तात्यासाहेब पाटील, गुणवंत पाटील, वसंत बाबर यांच्यासह गावातील ग्रामस्थ, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिस उपाधिक्षक ठाकुर म्हणाले, पुसेसावळी तांबवे गावापासुन खुप दुर नाही. ती घटना व्हायरल झाली. अनेक अफवा उठवल्या गेल्या. ती घटना ताजी असतानाच तांबवेत मुस्लीम समाजाच्यावतीने श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन केले जाते ही खुप मोठी गोष्ट आहे. हा उपक्रम जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी आदर्शवत आहे.

यावेळी किरपे येथील राष्ट्रीय खेळाडु प्राची देवकर आणि तांबवेतील अथर्व ताटे यांचा पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या दोन खेळाडुंनी गावचे नाव राज्यपातळीवर पोहचवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना यापुढे सहकार्य करु अशी ग्वाही यावेळी पोलिस उपाधिक्षक ठाकुर यांनी दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील, डॉ संदे यांनी मंडळाच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. अॅड. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. हेमंत पवार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment