वेध माझा ऑनलाइन। भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. कराड दक्षिण मतदारसंघातील ३०८ बुथचे प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, मुकुंद चरेगावकर, अजय पावसकर, प्रदीप जाधव उपस्थित होते.
डॉ. भोसले पुढे म्हणाले, की भाजपच्या पक्ष संघटनेत बूथ प्रमुख हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. बूथ समितीने केलेल्या दमदार कामामुळेच गुजरात निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या होत्या. हाच विचार मध्यवर्ती स्थानी ठेवून भाजपाने देशभरात बूथ सशक्तीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ प्रमुखांनी गावागावात पक्ष संघटन अधिक मजबूत करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या योजना, तसेच राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी बूथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांनी कंबर कसावी.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील यांनी पक्ष संघटनात्मक वाढीसाठी महत्वपूर्ण सूचना बूथ प्रमुखांना केल्या. तसेच सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चंद्रकांत कणसे व शैलेश गोंदकर यांचा सत्कार करण्यात आला. एकनाथ बागडी यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी कराड दक्षिण मतदारसंघातील बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment