Saturday, September 25, 2021

महाविद्यालये सुरू करण्याबावत लवकरच निर्णय ; ना उदय सामंत यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील काही महाविद्यालयांच्या संकुलात करोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष असल्याने, महाविद्यालय सुरू करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत येत्या आठवड्यात आढावा घेउन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. त्याचप्रमाणे तासिकातत्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) वेतनात २५ टक्के वेतनवाढ होणार असून, त्याचा निर्णय लवकर जाहीर होईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

खासगी कार्यक्रमानिमित्त सामंत पुण्यात आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरू करण्याबाबत विचारल्यावर सामंत म्हणाले की, विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यामध्ये विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा अहवाल काही दिवसांत सादर करण्यात येईल.

अहवाल मिळाल्यानंतर साधारण दिवाळी झाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्यात येतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. टीचर्स ट्रेंनिग ऍकॅडमीच्या बांधकाम ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. याचा आढावा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. या ऍकॅडमीचा फायदा उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबतच शालेय शिक्षण विभागालाही होणार आहे. येत्या काही दिवसात ऍकॅडमीचे उद्घाटन होईल, असे सामंत यांनी सांगितले.

राज्यात कॉलेजांमधील रिक्त प्राचार्यांची पदे लवकर भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कॉलेजांमध्ये कोणत्या विषयांसाठी प्राध्यापक नाहीत, याची माहिती गोळा करण्यात येत आहे. या पदांचा विचारही प्राध्यापक भरतीत करण्यात येईल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

सीएचबीच्या प्राध्यापकांना २५ टक्के वेतनवाढ
राज्यात तासिकातत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या वेतनात २५ टक्के वेतनवाढ होणार आहे. ही वेतनवाढ शासकीय, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना लागू राहणार आहे. त्याबाबत निर्णय येत्या दोन ते दिवसांत प्रसिद्ध होईल. या निर्णयामुळे प्राध्यापकाला दरमहा साधारण २५ ते ३० हजार रुपये वेतन मिळणार आहे. राज्यात प्राध्यापक भरती होणार आहे. एकदा अर्थ विभागाची मान्यता मिळाली की, भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.




No comments:

Post a Comment