वेध माझा ऑनलाइन
कराड
चरेगांवकर ब्रदर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने आगाशिव डोंगराच्या पायथ्याला विकसित होत असलेल्या श्रीकृष्ण व्हॅली या प्रकल्पातील विविध उपक्रमांचा शुभारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा सन्मान यावेळी चरेगांवकर बंधूंच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शेखर चरेगांवकर यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगून या प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली. ग्रामीण भागात नवे व्यवसाय सुरु व्हावेत, तरुण वर्गास रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग सुरु व्हावेत, यासाठी त्यांना या प्रकल्पात घरे व जागा उपलब्ध करून दिली गेली आहे. देशातील प्रत्येकाला स्वतःचे परवडणारे घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने केलेली एक कृती म्हणजे हा प्रकल्प आहे, असे चरेगांवकर म्हणाले.
६ लाखांमध्ये घर या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ६० घरांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ५ घरांच्या चाव्या श्रीकांत कांबळे, संजय पाटील, रामेश्वर रोडे, व्यंकेश वाघमारे व भगवान वरेकर या घरमालकांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी सर्व सोयींनी युक्त अशी जागा व उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी यासाठी श्रीकृष्ण व्हॅली या प्रकल्पात व्यावसायिक जागा असणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन यावेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील युवकांकडे उत्तम क्रीडा कौशल्य असते, पण त्यांना ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सरावास आवश्यक सुविधा उपलब्ध नसतात. याचीच दखल घेवून या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे टर्फची निर्मिती करण्यात आली आहे. याचेही उद्घाटन यावेळी गडकरी यांनी केले. याठिकाणी सराव करून हे खेळाडू नक्कीच जागतिक स्पर्धेतील पदकांना गवसणी घालू शकतील.
कृषी पर्यटन, कृषी विभाग, रिसॉर्ट, लॉन, चिल्ड्रेन पार्क, ओपन जीम, रेन डान्स, ट्रेनिंग हॉल, मॅजिक गार्डन, धबधबा यासारख्या सोयींमुळे श्रीकृष्ण व्हॅली हा प्रकल्प ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रोल मॉडेल ठरेल असा विश्वास यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर आ.चंद्रकांतदादा पाटील, खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, डॉ.अतुल भोसले, सुभाषराव जोशी, विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
#%कोल्हापूर नाका, कराड येथे भराव पुलाच्या ऐवजी उड्डाण पूल करणे तसेच जुना कोयना पूल ते नवीन कृष्णा पूल यांना जोडणारा नवीन रस्ता (रिव्हर लिंक रोड) करणे या कामाची मागणी यावेळी चरेगांवकर यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली...%#
No comments:
Post a Comment