कराड
कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनच्या दोन केसेस सापडल्यानंतर महाराष्ट्राची डोकेदुखी वाढलीय. त्यातच आता महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित असल्याची माहिती प्रशासनानं दिलीय. हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे ह्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. तशीच ही तिनही शहरं गर्दीची आहेत हे विशेष. संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण आहेत तर इतर 18 जण हे विविध शहरात आहेत. हे सर्व जण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. यातले 25 जण हे परदेशी प्रवास करुन आलेत तर 3 जण हे त्यांच्या संपर्कातले आहेत. ह्या सर्वांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आलेत. ओमिक्रॉनची एस जिन चाचणीही करण्यात आलीय. त्याचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्याभरापासून परदेशातून मुंबईत जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त जण दाखल झालेत. हे सर्व जण हाय रिस्क अशा 40 देशातून आलेत. त्या सर्वांची यादी तयार केली गेलीय. त्यांचा शोध सुरु आहे. जे आतापर्यंत सापडलेत त्या 861 जणांची आरटीपीसीआर टेस्टही करण्यात आलीय. त्यापैकीच 25 जण हे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. हे 25 जण ज्यांच्या संपर्कात आले त्यांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही चाचणी केली गेलीय. त्यापैकी 3 जण पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच परदेशी प्रवास केलेले 25 जण आणि संपर्कात आलेले पण प्रवास न केलेले 3 जण ओमिक्रॉन संशयित आहेत. हे सर्व संशयित मुंबई,ठाणे, पुण्यात आहेत.
मुंबईतला संशयितांचा आकडा पाचने गेल्या चोवीस तासात वाढलाय. जे पाच नवे संशयित आहेत, त्यापैकी एक जण हा लंडनहून आलेला आहे तर इतर चार जण हे दक्षिण आफ्रिका, पोर्तूगाल, मॉरीशस, जर्मनीहून आलेले आहेत. संशयित हे 69, 34, 45, 38 अशा वयाची आहेत. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट केलं गेलंय. जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि ओमिक्रॉनचे संशयित आहेत त्यांना माईल्ड लक्षणं आहेत आणि घरीच क्वारंटाईन करण्यात आलंय.
No comments:
Post a Comment