Tuesday, September 13, 2022

आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ; सदा सरवणकर यांचे पिस्तुल दादर पोलिसांनी केलं जप्त ; घटनास्थळावरुन गोळी केली जप्त...

वेध माझा ऑनलाइन -  मुंबईतील प्रभादेवी येथे शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणात आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सदा सरवणकर यांचे पिस्तुल दादर पोलिसांनी जप्त केलं आहे. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करुन घटनास्थळावरुन गोळी जप्त केली आहे

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाचे समर्थक समोरासमोर आल्याने मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी दोन्ही गटाचे समर्थक आमनेसामने आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर वाद टळला होता. मात्र, शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर सदासरवणकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलाचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. यानंतर सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment