वेध माझा ऑनलाइन - ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशके विराजमान असलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. यामुळे ११ सप्टेंबरला भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
एलिझाबेथ द्वितीय या ९६ वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय दुखवटा गृहमंत्रालयाने जाहीर केला आहे. भारतातील दररोज तिरंगा फडकवत असलेल्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. या दिवशी कोणतेही सरकारी काम होणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. राणीच्या सन्मानार्थ भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे यामध्ये म्हटले आहे.
वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थामुळे एलिझाबेथ यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. त्या मोजक्याच कार्यक्रमात उपस्थित राहत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावत गेली होती. आज दुपारी बाल्मोरलमध्ये महाराणीचे निधन झाले. किंग व क्वीन कंसोर्ट आज रात्री बाल्मोरलमध्ये राहतील. ते उद्या लंडनमध्ये परततील. महाराणीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे राजघराण्यातील सदस्य येथे दाखल झाले होते. मृत्यूच्यावेळी त्यांच्या कन्या प्रिन्सेस ॲने त्यांच्याजवळ होत्या.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या देशाला कायम प्रेरणा दिलेली आहे. त्यांचे नेतृत्व कधीही न विसरता येणारे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. यासह जगभरातील अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment