वेध माझा ऑनलाइन - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांनी बारामती मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केलाय. तसेच बारामतीतील पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करू, असं विधान केलंय. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ यांनी भाजपाने बारामतीच्या नादाला लागू नये, असं खोचक विधान केलं आहे. ते शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, “भाजपाने बारामतीच्या नादाला लागू नये. हे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. वेळेची आणि उर्जेचा अपव्यय आहे. त्यांनी तेवढा वेळ आणि शक्ती दुसरीकडे कुठेतरी लावावी. भलत्यासलत्या ठिकाणी कुठं जात आहात.”“तुमची उंची किती आहे, त्यांची उंची किती आहे काही तरी विचार करा. मग त्यावर डोकं आपटा,” असं म्हणत छगन भुजबळांनी भाजपावर टीका केली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईत १५० चा नारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणपती मंडळांना भेटीचा सपाटा लावला आहे. याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “आता उत्सवांमध्येही प्रचाराचे नारळ फोडले जात आहेत. नक्की गणेशदर्शन सुरू आहे की निवडणुकीचा प्रचार सुरू आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे.”
No comments:
Post a Comment