Saturday, September 3, 2022

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार!अशोक चव्हाण म्हणतात ; मी सध्या काँग्रेससोबत...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार भाजपच्या संपर्कात असून लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचं वृत्त आलं होतं. याच भेटीत राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं म्हटलं जात होते. यानंतर यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत होत्या. आता मात्र स्वतः अशोक चव्हाण यांनीच या भेटीविषयी आणि राजकीय चर्चांवर स्पष्ट उत्तर दिलं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, की या सर्व गोष्टींवर मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. मी सध्या काँग्रेससोबत आहे आणि दिल्लीला जात आहे. जिथे मी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. अशोक चव्हाण भाजपमध्ये चर्चा करणार असल्याच्या चर्चांदरम्यान त्यांनी स्वतःच आपण काँग्रेससोबत असल्याचं सांगितलं आहे.
यासोबत फडणवीसांसोबतच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. गणपती दर्शनासाठी निमंत्रण येतं आणि आपण लोकांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतो. अशात अनेकदा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होतात. मात्र, याचा अर्थ ही राजकीय चर्चा करण्यासाठीची भेट आहे असं नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले. चव्हाण आणि फडणवीस यांची भेट आशिष कुलकर्णी यांच्या घरी झाल्याची तसेच त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्येही काँग्रेसचे दोन माजी मंत्री शपथ घेणार असल्याची माहितीही समोर येत होती. यावरही अशोक चव्हाणांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. ते म्हणाले की 'या सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला जास्त काही माहिती नाही आणि मला यावर काही बोलायचंही नाही. मात्र, यात माझी काहीच भूमिका नसेल, हे स्पष्ट करतो.'


No comments:

Post a Comment