Wednesday, September 7, 2022

कोल्हापूर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? नितेश राणे यांनी उपस्थित केला प्रश्न...

वेध माझा ऑनलाइन - कोल्हापूर शहरात गणेश विसर्जनाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हापूर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी अनोखी व्यवस्था केली असून इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्र उभारलं आहे. यंत्राद्वारे गणेश मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यात येत आहे. हा वेगळा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असून तब्बल 83 लाख रुपये खर्चून ही यंत्रणा इराणी खण येथे बसवण्यात आली आहे. कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करावं, असं आवाहन यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं आहे. मात्र, यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे.

नितेश राणे यांचा आक्षेप काय आहे?
भाजप आमदार नितेश राणे यांनी कोल्हापूर विसर्जन व्यवस्थेचा हा व्हिडीओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत यावर आक्षेप नोंदवला आहे. याला विसर्जन म्हणत नाही. कोल्हापूर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. नितेश राणे यांनी कोल्हापूर प्रशासनाला सक्त ताकीद दिली असून सदरचा प्रकार वेळेस थांबवण्याची मागणी केली आहे. यावर अद्याप प्रशासनाने किंवा पालिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सामान्य कोल्हापूरकरांनी दान केलेल्या हजारो गणेशमुर्तींची विटंबना होईल अशा प्रकारे केल्या गेलेल्या विसर्जनास जबाबदार महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने गेले काही वर्षे सातत्याने राबविलेल्या गणेशमूर्ती दान उपक्रमास पुरोगामी कोल्हापूरकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत. परंतु या दान केलेल्या मूर्तींचे प्रशासन ज्याप्रकारे विसर्जन करते. त्यामुळे दरवर्षी या मूर्तींची विटंबना होते आहे. यावर्षी तर या दान केलेल्या मूर्ती काठावरून इराणी खणीत फेकण्यात येत असल्याचा व्हीडिओ काल समाजमाध्यमांवर पसरला आहे. मुळात मोठा गाजावाजा करून आणि माजी पालकमंत्र्यांच्या हातून उदघाटन केलेल्या स्वयंचलित यंत्रणेवरून हे विसर्जन का केले नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे आणि त्यामुळे सामान्य कोल्हापूरकरांच्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शहरवासीयांच्या भावना अक्षरशः पायदळी तुडवून दान केलेल्या घरगुती मूर्तींची विटंबना होईल अशा प्रकारे झालेल्या विसर्जनास जबाबदार महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी भाजपाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ई मेल द्वारे करण्यात आली आहे.

कशी आहे योजना?
मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती गोळा होत असल्याने रात्री उशीरपर्यंत या मूर्ती खाली सोडण्याचे काम सुरू असते. यामुळे कामाला गती यावी व सुरक्षितरित्या मूर्तीचे विसर्जन व्हावं, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने येथे गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी स्वयंचलित यंत्र बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी तब्बल 83 लाख रुपये किंमतीचे हे स्वयंचलित यंत्र असून याद्वारे गणेश मूर्ती पाण्यात सोडण्यात येत आहेत. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. यामुळे गणेश मूर्तींचे जलद गतीने व सुरक्षितरित्या विसर्जन होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
या स्वयंचलित यंत्राद्वारे खाणीत 35 फूट अंतरापर्यंत विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशा आधुनिक टेलीस्कोपिक कन्व्हेअर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या बेल्टची लांबी कमी-जास्त करता येत असून 180 अंशापर्यंत मशीन फिरू शकते. या तंत्रज्ञानामुळे 'एक सेकंदाला एक गणेश मूर्ती विसर्जित' करता येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.



No comments:

Post a Comment