Tuesday, November 26, 2024

एकनाथ शिंदे झाले नाराज ! काय आहे बातमी ...?

वेध माझा ऑनलाइन। विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आजच (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. यानंतर सर्वांचं लक्ष हे शपथविधीच्या कार्यक्रमाकडे लागलं आहे. महायुतीमध्ये अद्यापही मुख्यमंत्री पदाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे आघाडीवर आहेत. अशातच फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय.

यासंदर्भातील निरोप हा एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याचंही बोललं जातंय. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनाच संधी मिळावी म्हणून आग्रही मागणी केली जात आहे. तर, दिल्लीत फडणविसांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार?
देवेंद्र फडणवीस हे काल, सोमवारीच दिल्लीला रवाना झाले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कुटुंबातील विवाहाच्या समारंभासाठी ते दिल्लीला गेल्याचे समजते. मात्र, याच दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेबाबत त्यांची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment