Sunday, May 21, 2023

समीर वानखेडेची सीबीआय कडून 5 तास कसून चौकशी ; बाहेर पडताच वानखेडेने उच्चारले दोन शब्द ; वाचा सविस्तर ;

वेध माझा ऑनलाइन । कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटींची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा आरोप आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा दिवस होता. शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली.

समीर वानखेडेंनी उच्चारले फक्त दोन शब्द
सीबीआयची आजची चौकशी संपल्यानंतर समीर वानखेडे प्रतिक्रिया देतील अशी आशा माध्यमांना होती. मात्र समीर वानखेडे बाहेर आले. मीडियाने त्यांना प्रश्न विचारले त्यावर सत्यमेव जयते! एवढेच दोन शब्द उच्चारत समीर वानखेडे तिथून निघून गेले.

Saturday, May 20, 2023

2000 रुपयांच्या नोटांबद्दल माजी प्रधान सचिवांचा मोठा गौप्यस्फोट; काय म्हणाले ? ;

वेध माझा ऑनलाइन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते, परंतु ते त्यांच्या टीमच्या सल्ल्यानुसार गेले', असा गौप्यस्फोट पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी केला आहे. मिश्रा यांनी 2016 मध्ये नोटाबंदीचे निरीक्षण केले होते. 

नृपेंद्र मिश्रा यांनी एका चॅनेल शी बोलताना सांगितले की, 'ही नोटाबंदी नाही तर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेणे आहे. नोटाबंदीच्या वेळी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याची सूचना करण्यात आली होती, जी पंतप्रधानांना आवडली नाही. मात्र, कर्णधार म्हणून आपल्या टीमच्या सल्ल्याने त्यांनी या नोटांना परवानगी दिली. तेव्हा ते अगदी स्पष्ट होते आणि आम्हीही होतो की ही एक अल्पकालीन व्यवस्था असेल.'
यासोबतच ते म्हणाले, 'गरीब आणि मध्यमवर्गीय लोक 2000 रुपयांच्या नोटा वापरत नाहीत, ते 500 आणि 100 रुपयांच्या छोट्या नोटा वापरतात आणि पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, गरीबांना याचा फटका बसू नये अशी त्यांची इच्छा आहे. '

एका माजी नगरसेवकाने फोडला पेपर ; शिक्षण क्षेत्रातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर ; शिक्षण क्षेत्रात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन। बातमी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी आहे. राज्यातील पेपर फुटीचं सत्र काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत चक्क 300 ते 500 रुपयात मासकॉपी करून दिली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच आता आणखी एका प्रकरणाने शिक्षण क्षेत्रातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी 2023 परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाच्या चौथ्या सत्राचा मोबाईलद्वारे व्हाट्‌सअपवर पेपर लीक करण्यात आला. धक्कादायक म्हणजे यात एका भाजपच्या माजी नगरसेवकाचा हात आहे.

याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक प्रणीत सोनी, भूषण किसन हरकुट, किशोर पिंपळकर या तिघांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर भाजपचे माजी नगरसेवक प्रणित सोनी यांनीच हा पेपर फोडल्याची धक्कादायक बाब पुढ आली आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत शनिवारी सकाळी 9 ते 12 या दरम्यान विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा फोर्थ सेमिस्टरचा पेपर होता. मात्र, पेपर सुरू होण्यापूर्वीच तो मोबाईलवर पोहोचला. तसेच या विषयाच्या झेरॉक्स सुद्धा या तिघांकडे आढळल्याचे बोलले जात आहे. पोलीस याप्रकरणी तपास करीत असून लॉ ट्रस्टचा पेपर लीक झाल्याची माहिती मिळताच अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे व अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य भैय्यासाहेब मेटकर यांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली.

Friday, May 19, 2023

शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांचे मोबाईल चॅटिंग आले समोर ; मोठी अपडेट ;

वेध माझा ऑनलाइन । अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कॉर्डेलिया ड्रग्ज क्रूज प्रकरणी  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे.  आर्यन खानला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरूख खान आणि त्याच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपये खंडणीची मागमी करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या संबंधी तपास सुरू असताना समीर वानखेडे यांनी महत्त्वाची दिली आहे. समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यात अनेकदा बोलणं झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे व्हॉट्स अँप चॅट्सचे त्यांनी शेअर केलेत. 

शाहरूख  खाननं समीर वानखेडे यांच्याकडे मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी विनंती केल्याचं चॅटमधून समोर आलं आहे. या चॅटमध्ये शाहरूख खानने समीर वानखेडेंना म्हटलं आहे की, "मी एक बाप आहे आणि तुम्ही देखील बाप आहात. माझा मुलगा चुकला असेल पण त्याला सांभाळून घ्या. याबाबत आपल्याला काय करता येईल ते सगळं आपण करू", अशी विनंती शाहरूखनं केली आहे. एकदा नाही तर शाहरूखनं अनेकदा अशाप्रकारची विनंती समीर वानखेडे यांना केली आहे.
अभिनेता शाहरूख खान हा प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो एक बाप आहे आणि हाच बाप या चॅटमधून दिसत आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बापाची धडपड दिसून येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात शाहरूख आणि समीर वानखेडे याचे चॅट समोर आल्यानंतर  मोठी घडामोड घडली आहे.




















2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार


वेध माझा ऑनलाइन । 2000 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार आहे. आरबीआयने याबाबत निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटांची वैधता असणार आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.

नोटा कधीपासून बदलता येणार?

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे. बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

पुतण्याला वाटतय ,की हे म्हातारं आपल्या हातात कारभार देत न्हाई, म्हणून पुतण्या खळखळ करतोया... शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची अजितदादा पवारांवर टीका ;

वेध माझा ऑनलाइन । अजितदादा पवार व शरद पवार यांचा राजकारणाचा फंडा राज्याला काही नवीन नाही... पुतण्याला वाटलं असावं की आपल्या हातात हे म्हतारं काय कारभार देत न्हाई...म्हणून पुतण्या खळखळ कर्तुया... मग म्हातारं...हातात घुंगराची काठी घेऊन वाजवत... वाजवत येतया...मग त्या काठीच्या घुंगराचा आवाज ऐकून बाकी काही जण म्हणत्यात... म्हाताऱ्याच सगळं ह्यो पुतण्या एकटाच हाणील ...अस सगळं त्यांचं राजकारण चाललया...  अस म्हणत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण बाजमध्ये पवार काका-पुतण्यावर टीका केली... त्यावेळी त्याठिकाणी एकच हशा पिकला...

राज्यातील शेतकरी ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या 22 मे ला कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ... त्यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि शरद पवार यांच्या भाजप बद्दलच्या मधल्या काळातल्या भिन्न- भिन्न दिसणाऱ्या भूमिकेविषयी पत्रकारांनी सदाभाऊंना विचारले असता सदभाऊनी आपल्या खास शैलीत काका- पुतण्यावर खरमरीत टीका करत उत्तर दिले...

दरम्यान, काढण्यात येणाऱ्या पडयात्रेविषयी माहिती देताना सदाभाऊ म्हणाले... शेतकरी सध्या खूप अडचणीत आहे त्याच्या व्यथा सरकारने समजून घेतल्या पाहिजेत यासाठी आमचा हा प्रयत्न आहे या पदयात्रेमध्ये ऊस उत्पादक काजू उत्पादक द्राक्ष उत्पादक तसेच प्रत्येक वंचीत घटक सामील होणार आहे...कराड येथील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन व कृष्णामाईचा आशीर्वाद घेऊन या पदयात्रेची सुरुवात होणार आहे... साताऱ्यात ही पदयात्रा पोचल्यानन्तर वाहनांने आम्ही पुढे मुंबईत सरकार दरबारी शेतकरीवर्गाच्या व्यथा मांडण्यासाठी पोचणार आहोत... हजारोंच्या संख्येने शतकरी वर्ग पोराबाळांसहित या यात्रेत भर उन्हातून सहभागी होणार आहे... असेही त्यांनी सांगितले...

कराड प्रांत कार्यालयातील दोघेजण लाच घेताना रंगेहात सापडले ;

वेध माझा ऑनलाइन । कराड तालुक्यातुन एक महत्वाची बातमी समोर येत आहे.येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आज केलेल्या कारवाईत रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70 वर्षे, नोकरी –  लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत फीस कराड) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय- 70 वर्षे, नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा प्र फीस कराड) या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघाकरिता प्रत्येकी 10 हजार रूपयांची मागणी करून असे 20 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात सापडले.

येरवळे (ता. कराड) गावच्या नऊ शेतकरी यांचेकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध कार्यालयात पाठपुरावा प्रतिज्ञापत्र घेतलेले होते. त्या प्रतिज्ञापत्रात मूल्यांकन प्रक्रिये बाबत पाठपुरावा करण्याकरीता तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड कार्यालय येथे गेले असता, त्यांना आरोपी लोकसेवक एक व दोन यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले.