Wednesday, June 10, 2026

शरद पवार म्हणाले,... आता महागाईविरोधात पक्ष थेट रस्त्यावर उतरणार ;

वेध माझा ऑनलाईन।
आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी दिनविशेष वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी अनेक विषय अधोरेखित केले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी भाषणाच्या अखेरमध्ये मोठ्या एल्गारााची घोषण केली.

शरद पवार म्हणाले, आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम. मला मोठी गंमत वाटली. पक्षाची जाहिरात सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पाहिली. आजपर्यंत मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर जाहिरात पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत किती असते मला माहित आहे. त्यामुळे मी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण आज जाहिरात पाहिली नाही असे शरद पवार म्हणाले. इतकेच नाही तर त्यांनी अनेक विषय प्रकाश झोतात आणले.

शरद पवार पुढे म्हणाले, आज खतासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहेत. सर्वसामान्य महागाईचा सामना करत आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी (शदर पवार गट) रसत्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे

Sunday, June 7, 2026

कराडमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली ; नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन/

वेध माझा ऑनलाईन।
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कराड शहरात शुक्रवारी सायंकाळी पर्यावरण संवर्धनाचा जागर घडवून आणणारी सायकल रॅली उत्साहात पार पडली. एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लब आणि कराड नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. 

दत्त चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, नरेंद्र लिबे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, फारूक पटवेकर, अतुल शिंदे, अशोकराव पाटील, सुरेश पाटील, अर्बन बँकेचे संचालक समीर जोशी, एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चावडी चौक, कन्या शाळा, नगरपालिका परिसर आणि कॉटेज हॉस्पिटल मार्गे मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी उद्यान येथे झाला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हवामान बदलांविषयी जनजागृती करणारे संदेशफलक हातात घेतले होते. 'एक व्यक्ती-एक झाड, प्रदूषणमुक्त हवा, निसर्गाचा खरा श्वास, स्वच्छ हवा-निरोगी जीवनाचा पाया आणि पर्यावरण जपा, पृथ्वी वाचवा' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

गेल्या १९ वर्षांपासून एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लबकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सातत्याने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. यावर्षीच्या सायकल रॅलीतून इंधन बचत, पर्यावरणपूरक वाहतूक आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. यावेळी आम्ही कागदी पिशवी वापरण्यास कटिबद्ध आहोत, अशा आशयाच्या स्ट्रिप्स दुकानदारांना देऊन त्या दुकानांमध्ये लावण्याचे आवाहन करण्यात आले.

नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. रॅलीत सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, स्केटिंग ग्रुप, विविध सायकलपटू संघटना, पीडिलाईट इंडस्ट्रीज, रॅपटॉक्स इंडस्ट्रीज (तासवडे), अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, शालेय विद्यार्थी तसेच अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत या रॅलीने कराडकरांना हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला.

खासदार उदयनराजे, आमदार अतुलबाबा, मनोज घोरपडे यांच्याकडून पुलाच्या कामाची पाहणी ; अद्यापही काही कामे प्रलंबित ? येत्या 20 तारखेला उद्घाटन होणार का?

वेध माझा ऑनलाईन।
कराड येथील उड्डाणपुलाची  खासदार उदयनराजे यांच्यासह  आमदार अतुलबाबा व मनोज घोरपडे आणि अन्य मान्यवरांनी आज पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.या पाहणीत उड्डाणपुलावरील काही कामे अद्याप सुरू असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले. संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदार कंपनीला कामात गती आणून उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 

मात्र... सदर प्रलंबित कामे वेळेत पूर्ण न झाल्यास उड्डाणपूल वीस जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार की नाही? अशी शंका उपस्थित होत आहे





Saturday, June 6, 2026

बायको आणि मेहुण्याने अभियंता नवऱ्याची सुपारी देऊन केली हत्या ! कराड पोलिसांनी फक्त 12 तासांत केला घटनेचा उलघडा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील शिंदे हॉस्पिटलसमोर शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातामागे थरारक खुनाचे षड्यंत्र असल्याचे उघड झाले आहे. जलसंपदा विभागातील अभियंताच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र कराड शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश करत मृताची पत्नी आणि मेहुण्यालाच कटाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, वैवाहिक वादातून पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने एक महिन्यापूर्वीच पतीच्या खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे. यासाठी दोन जणांना सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहितीही तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि मेहुण्यास अटक केली असून कॉन्ट्रक्ट किलरचा शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी कराड शहर पोलीस ठाण्याची तीन पथके व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत.
लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय 54, रा. मनव, ता. कराड) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. तर पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय 36, रा. मनव, ता. कराड) व मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय 40 रा. सुरूल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत लक्ष्मण मंडले व पत्नी सुरेखा मंडले यांचेमध्ये कौटुंबिक वाद होता. पती आपणास त्रास देत आहे ही बाब मनात ठेवून सुरेखा मंडले हिने एक महिन्यापूर्वी भावाच्या मदतीने मुंबई येथे जाऊन पतीचा काटा काढायचा प्लॅन केला होता. त्यानुसार शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शिंदे हॉस्पिटलसमोर एका व्यक्तीला चारचाकी वाहनाने उडवल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्ष्मण मंडले हे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृताच्या पत्नीने पोलिसांना ही अपघाताची घटना असल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीतून पोलिसांना संशय आला. तपासात असे आढळले की, एक अल्टो कार मंडले यांच्या पाठीमागून आली, त्यांना उडवून दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील बॅग आणि साहित्य घेऊन पळ काढला. इतकेच नव्हे तर काही वेळाने पुन्हा अल्टो कार घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे मृत लक्ष्मण मंडलेची पत्नीस चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिला खाक्या दाखविताच तिने भावाच्या मदतीने पतीला मारण्यासाठी दोघांना सुपारी दिल्याची निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी मृत लक्ष्मण मंडलेची पत्नी व मेहुण्यास अटक केली असून आणखी सुपारी घेणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्या शोधासाठी कराड शहर पोलीस ठाण्याची तीन पथके व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत.
पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत.

Friday, June 5, 2026

मोठी बातमी / महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार! ; पुणे विधान परिषदेमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाने माघार घेतल्याने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट नाराज ;

वेध माझा ऑनलाईन। 

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुणे विधान परिषदेमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाने माघार घेतल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट नाराज झाला आहे.

पुण्यात मविआतून बाहेर पडण्याचा वरिष्ठांकडे प्रस्ताव दिल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. 

तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं नुकसान झाल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग न्युज ...


सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

कराड शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय चन्ने नगरपालिकेच्या इमारतीची"खिडकी' डोक्यात पडल्याने जखमी ; श्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
सामाजिक कार्यकर्ते  संजय चन्ने यांच्या डोक्यात अचानकपणे कराड नगरपालिकेच्या  इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीचा वरचा भाग अचानक सुटून त्यांच्या डोक्यात पडल्याने ते जखमी झाले आहेत 
आज दुपारी साडेचार च्या सुमारास ही घटना घडली आहे 
येथील श्री हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

संजय चन्ने हे आज दुपारी 4 च्या दरम्यान कराड पालिकेच्या आवारात असलेल्या तलाठी कार्यालयात कामानिमित्त आले होते त्यांचे काम आवरून बाहेर पडत असताना तलाठी ऑफिसच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीचा वरचा भाग अचानक खाली कोसळला तो नेमका त्यांच्याच डोक्यात पडला त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे
त्याचवेळी पालिकेत हजर असलेल्या उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे,सौरभ पाटील, (तात्या)प्रसाद माने, नगरसेवक नरेंद्र लिबे, सिद्धार्थ संकपाळ आशिष रैनाक,अमोल पवार, युवराज सावंत, अमित होमकर यानी चन्ने यांना उपचारासाठी तात्काळ श्री हॉस्पिटलमध्ये दाखल  केले सध्या त्यांच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू आहेत

मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मंजूर/राज्य सरकारचा मोठा निर्णय !

वेध माझा ऑनलाईन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या विविध आंदोलनांदरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या वारसांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आठ जिल्ह्यांतील 34 मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनांमध्ये राज्यभरातील एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत राज्य सरकारने यापूर्वी निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एकूण 27 कोटी 50 लाख रुपयांची मदत मंजूर केली असून, त्यापैकी काही वारसदारांना मदत मिळणे प्रलंबित होते.

दरम्यान, 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी रणरणत्या उन्हात उपोषण सुरू केले होते. या उपोषणानंतर शासन स्तरावर तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रलंबित मागण्यांसह उर्वरित वारसांना लवकरात लवकर आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती.

सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार मागील दोन दिवसांत या प्रकरणी कार्यवाही करत विविध जिल्ह्यांतील 34 मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील 15, धाराशिवमधील 5, परभणीतील 4, हिंगोलीतील 4, नांदेडमधील 3, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथील प्रत्येकी एका वारसदाराचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने करण्यात येत आहे. तसेच उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून त्यावर वेगाने कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मंजूर झाल्याने संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केल्याची भावना मराठा समाजातून व्यक्त केली जात आहे.