कराड
कराड विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघिय क्षेत्रात बांधकामे आणि झाडे लावण्याबाबत असलेल्या निर्बंधांबाबत राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधून या निर्बंधांबाबत अधिक स्पष्टीकरण व निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर दीपक कपूर यांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणला (एएआय) पत्र पाठवून सदरचे निर्बंध शिथिल करण्याबाबत विनंती केली आहे.
कराड विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघिय क्षेत्रात बांधकामे व झाडे लावण्याबाबत निर्बंध असल्याचे पत्र एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी जिल्हाधिकाऱयांना पाठवले होते. जिल्हाधिकाऱयांनी हे पत्र कराड नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवले होते. या पत्रानंतर कराड नगरपालिकेने शहरातील बांधकाम परवानग्या देणे थांबवले होताते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट घेऊन सदरचे निर्बंध मारक असून यात लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी याबाबत दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधून निर्बंधांबाबत चर्चा करत लवकरात लवकर यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. तर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनाही याबाबत एमएडीसीशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिले होते.
पालकमंत्र्यांशी झालेली चर्चा आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर एमएडीसीतर्फे दीपक कपूर यांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणचे चेअरमन संजीव कुमार यांना 8 डिसेंबरला पत्र दिले आहे. या पत्रात कराड विमानतळाचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. कराड विमानतळ हे विना लायसन आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणने आतापर्यंत जे अध्यादेश काढलेले आहेत, त्यात कराड विमानतळाचा उल्लेख नाही. या विमानतळाचा कलर कोडींग झुमिंग मॅप बनवण्यासाठी सांगण्यात आले असले तरी विना लायसन असणाऱया या विमानतळासाठी हे आदेश आवश्यक आहेत का, याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी कपूर यांनी या पत्रात केली आहे.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणने 2015 मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करताना या ब्लँकेट एनओसी 5 वर्षांसाठी लागू केली होती. त्या परिसरातील विकसनासाठी ही एनओसी लागू केली होती. ती आता 5 वर्षे वाढवून मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशी कोणतीही ब्लँकेट एनओसी कराड विमानतळाबाबत लागू केलेली नाही. कराड विमानतळाचा कलर कोडींग झुमिंग मॅप बनवताना ठरावीक उंचीपर्यंत बँकेट एनओसीबाबत निर्देश द्यावेत, असे या पत्रात म्हटले आहे. आपण स्वत: लक्ष घालून हे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दीपक कपूर यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्या मुख्य सचिवांनाही माहितीसाठी दिले आहे. सदरच्या पत्राची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही दिली आहे.
No comments:
Post a Comment