Tuesday, September 13, 2022

एक लाख नोकऱ्या देणारा उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला का नेला? ; महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपत आहे ; तरुणांचा रोजगार गेल्याने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माफी मागणार का ? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल..

वेध माझा ऑनलाइन - तब्बल 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणि सुमारे एक लाख रोजगार निर्माण करणारा उद्योग महाराष्ट्राच्या हातून निसटल्याने महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिंदे सरकारवर आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकारावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. एक लाख नोकऱ्या देणारा उद्योग राज्याबाहेर गेला आहे. पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला, असा आरोप जयंत पाटील  यांनी केला आहे.दरम्यान,महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपत आहे राज्यातील बेरोजगार तरुणांचा यानिमित्ताने रोजगार गेल्याने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जनतेची माफी मागणार का ? असा सवाल देखील जयंत पाटील यांनी केला आहे

याबाबत जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे 20 बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख 58 हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.
महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment